द्राक्षावर ‘अवेळी’ संकट; विम्याअभावी स्थिती बिकट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

सांगली - वादळी वारा आणि गारपीट झाल्याने तासगाव, मिरज, पलूस, कवठेमहांकाळ पट्ट्यातील द्राक्ष शेतीला मोठा फटका बसला. ७० टक्के बागांची पुढील हंगामात फळधारणेची शाश्‍वती नाही. या ‘अवेळी’ संकटात शेतकऱ्यांची स्थिती बिकट झाली.

सांगली - वादळी वारा आणि गारपीट झाल्याने तासगाव, मिरज, पलूस, कवठेमहांकाळ पट्ट्यातील द्राक्ष शेतीला मोठा फटका बसला. ७० टक्के बागांची पुढील हंगामात फळधारणेची शाश्‍वती नाही. या ‘अवेळी’ संकटात शेतकऱ्यांची स्थिती बिकट झाली. कारण, या काळात द्राक्ष बागांना पीक विमा लागू होत नाही. तो लागू झाला पाहिजे, यासाठी द्राक्ष बागायतदार संघासह स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रयत्न करतेय. त्यासाठी आता शेतकरी रस्त्यावर उतरायला तयार झालेत. 

द्राक्षाची एप्रिल छाटणी (खरड छाटणी) झाली. त्यानंतर फुटवे आलेत. त्याला गारपीटीने मोठा दणका दिला. हे फुटवे पूर्ण वाया गेलेत. या फुटव्यांची ऑक्‍टोबरमध्ये फळ छाटणी होते. त्यानंतर फळधारणा, मात्र आता फुटवेच मोडून पडले तर फळधारणा होणार कशी ? नवे फुटवे घ्यावेत, तर वेळ पुढे जाते. त्यामुळे प्रचंड मोठ्या नुकसानीला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले.

‘स्वाभिमानी’चा बारमाही प्रस्ताव

  •  द्राक्ष विमा सर्व हंगामात लागू करा
  •  पर्जन्यमापक गावनिहाय बसवा
  •  पावसाची मर्यादा कमी करा
  •  गारपीट, अवकाळी, घडकूज, दावण्यासह अन्य कारणांचा समावेश करा
  •  द्राक्ष बाग कोसळली तरी समावेश असावा

यावर राज्य शासनाने वीमा कंपन्यांशी करार करून द्राक्ष बागांना बारमाही विमा संरक्षण देण्याची गरज असल्याचे मत राज्य द्राक्षबागायतदार संघाने सहा वर्षांपासून मांडले आहे. 

‘‘चार पाच वर्षापासून राज्य द्राक्ष बागायतदार संघ प्रयत्न करतोय. विमा कंपन्या म्हणणे ऐकायला तयार नाहीत. राज्य शासनाच्या कृषी विभागापुढे सातत्याने मांडणी केली. सप्टेंबर ते मार्चपर्यंत वीमा संरक्षण मिळते, ते वर्षभरच हवे. सरकारने त्यात गांभीर्याने विचार केलेला नाही.’’
सुभाष आर्वे,
राज्याध्यक्ष, 
द्राक्ष बागायतदार संघटना

दुचाकी, चारचाकी वाहनाला; माणसाला वर्षभर विमा मिळतो. अपघात कुठल्याही महिन्यात झाला तरी भरपाई मिळते. मग पिकाबाबत वेगळे धोरण का? पीक विमा शेतकऱ्यांना लुटणारा आणि कंपन्यांची तुंबडी भरणारा आहे. शेतकऱ्यांना भीतीपोटी लुटण्याचा धंदा न राहता तो कुठल्याही संकटात मदतीचा हात देणारा असला पाहिजे. त्यासाठी २५ मे रोजी रस्त्यावर उतरतोय.
- महेश खराडे, 

जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी

Web Title: Sangli News Grape crisis, Insurable condition worsening