जयंतरावांनी कौतुक केलं अन्‌ विधानसभेतून चौकशी लावली

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 एप्रिल 2018

सांगली - आष्टा येथील शेतकरी तानाजी चव्हाण यांच्या नावे हरितगृह अनुदान घोटाळा झाल्याच्या आरोपाचा कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी प्रत्यक्ष हरितगृहात जाऊन पंचनामा केला. 

सांगली - आष्टा येथील शेतकरी तानाजी चव्हाण यांच्या नावे हरितगृह अनुदान घोटाळा झाल्याच्या आरोपाचा कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी प्रत्यक्ष हरितगृहात जाऊन पंचनामा केला. 

राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांनी हरितगृहाला भेट देऊन कौतुक केले आणि दोन दिवसांनी त्यांनीच विधानसभेत घोटाळ्यावर हल्लाबोल केला, ही बाब सदाभाऊंनी समोर आणली. दरम्यान, या प्रकरणात कुठलाही घोटाळा झाल्याचे कागदोपत्री आढळले नाही, असे स्पष्ट करत सदाभाऊंनी चव्हाण यांना क्‍लीन चिट दिली. उल्लेखनीय शेती कार्याबद्दल त्यांचा सत्कार केला. या प्रकरणात जयंत पाटील यांच्या भूमिकेवर मात्र सदाभाऊंनी बोट ठेवले. तर संबंधित शेतकऱ्यांनी ‘२५ मार्चला जयंतराव आले होते अन्‌ २७ ला विधानसभेत घोटाळ्यावर बोलले. ते आम्हाला कार्यकर्ते मानतात, त्यामुळे त्याचे आश्‍चर्य वाटले’, अशी कबुली दिली.

कृषी अनुदानावरील प्रत्येक आरोपाची शहानिशा होणारच. मात्र एका शेतीनिष्ठ कुटुंबाला नाहक बदनामी सहन करावी लागली. शेकडो लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला. त्यांचा गौरव सोडून विधानसभेत अपमान करणे दुर्दैव आहे.
- सदाभाऊ खोत,
कृषी राज्यमंत्री

बळीराजा संघटनेचे अध्यक्ष बी. जी. पाटील यांनी हरितगृह घोटाळ्याची तक्रार केली होती. त्याची चौकशीही सुरू आहे. आमदार जयंत पाटील यांनी विधानसभेत तर आमदार धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत तो मुद्दा उपस्थित केला होता. त्याची निष्पक्ष चौकशी करा, अशी मागणी करत सदाभाऊंची कोंडी केली. त्याला विधानसभेत उत्तर देताना सदाभाऊंनी मी स्वतः हरितगृहात जाऊन चौकशी करेन, असे सांगितले. त्यानुसार ते आष्ट्यात गेले. संबंधित शेतकऱ्यांकडून अनुदान व हरितगृह उभारणी, विकासाची माहिती घेतली. तानाजी चव्हाण, शांताबाई चव्हाण, अमरसिंह चव्हाण, दीपाली चव्हाण, भगतसिंह चव्हाण, रेखाताई चव्हाण, दिग्विजय चव्हाण अशा एकाच कुटुंबातील सदस्यांच्या नावे अनुदान घेऊन ८१ लाखांचा घोटाळा कला, त्यांनी हरितगृह उभारलेच नाही, असा आरोप होता. त्याची शहानिशा करत सदाभाऊंनी आरोपाचे खंडन केले. 
शेतकरी चव्हाण २०१२-१३ आणि २०१३-१४ मध्ये मिळालेले अनुदान, प्रत्येकाचा वेगळा सातबारा उतारा आणि त्यानुसार झालेली हरितगृह उभारणी याची माहिती व कागदपत्रे सादर केली. नाहक बदनामी होत असल्याबद्दल नाराजीही व्यक्त केली. 

श्री. चव्हाण म्हणाले, ‘‘जयंत पाटील यांना आमची फूलशेती प्रचंड आवडली. त्यांनी तोंडभरून कौतुक केले. भविष्यात शरद पवार साहेबांना इथे येऊन येतो, असेही सांगितले. पण दोन दिवसांत आमच्या नावे घोटाळा झाल्याची माहिती विधानसभेत दिली. याचे आश्‍चर्य वाटले. गैरसमजातून हा प्रकार झाला असावा, असे आम्हाला वाटते.’’

इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील, प्रसाद पाटील, वैभव शिंदे, कृषी अधीक्षक राजेंद्र साबळे, उमेश पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी मनोज वेताळ उपस्थित होते.

 

Web Title: Sangli News Greenhouse Subsidy Scam