हेल्मेटअभावी १६५ जणांचा अपघाती मृत्यू

घन:श्‍याम नवाथे
मंगळवार, 18 जुलै 2017

सांगली - जिल्ह्यात गतवर्षी एक-दोन नव्हे तब्बल ४४४ जणांचा अपघाती मृत्यू झाला. त्यापैकी १६५ जणांनी हेल्मेट न घातल्यामुळे डोक्‍यास मार लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासात स्पष्ट झाली आहे. हेल्मेट घातले असते, तर संबंधितांचा लाखमोलाचा जीव वाचला असता. हेल्मेटमुळे जीवदान मिळाल्याची अनेक उदाहरणे आपण नेहमीच पाहत असतो.

सांगली - जिल्ह्यात गतवर्षी एक-दोन नव्हे तब्बल ४४४ जणांचा अपघाती मृत्यू झाला. त्यापैकी १६५ जणांनी हेल्मेट न घातल्यामुळे डोक्‍यास मार लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासात स्पष्ट झाली आहे. हेल्मेट घातले असते, तर संबंधितांचा लाखमोलाचा जीव वाचला असता. हेल्मेटमुळे जीवदान मिळाल्याची अनेक उदाहरणे आपण नेहमीच पाहत असतो.

जिल्ह्यातील दुचाकी वाहनांची संख्या सहा लाखांहून अधिक आहे. दररोज किमान शंभर दुचाकी नव्याने रस्त्यावर धावताना दिसतात. प्रति सहा व्यक्तीमागे एक वाहन असे जिल्ह्यातील प्रमाण आहे. एकीकडे वाहनांची संख्या वाढत असताना दुसरीकडे अपघाताची संख्याही प्रतिवर्षी वाढत आहे. अपघाताची कारणे पाहिली तर ती नेहमीचीच आहेत. दारू पिऊन वाहन चालवणे, खराब रस्ते, वाहतूक नियमांचे पालन न करणे, रात्रीच्या वेळेस बेदरकारपणे वाहन चालवणे, वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे आदी कारणे आहेत.

दुचाकी चालवताना हेल्मेट घालणे हे आवश्‍यक आहे. न्यायालयाने देखील हेल्मेटसक्तीचे आदेश दिले आहेत. परंतु त्याची अंमलबजावणी करताना प्रत्येकवेळेस अडथळे येतात. कोल्हापूर परिक्षेत्रात नुकतेच विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी १५ जुलैपासून केली जाईल, असे जाहीर केले. त्याला अनेकांनी विरोध केला. अनेकांनी स्वागत केले. शहरात हेल्मेटला विरोध झाला. विरोध लक्षात घेऊन सक्ती मागे घेतली. तर राष्ट्रीय महामार्गावर प्रबोधन आणि कारवाई सुरू राहील, असे स्पष्ट केले.

दुचाकीवरून प्रवास करताना अपघात झाल्यानंतर  डोक्‍यास मार लागून मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. हेल्मेटमुळे हे चित्र बदलू शकते. जिल्ह्यात गतवर्षी ४४४ जणांचा अपघाती मृत्यू झाला. त्यापैकी तब्बल १६५ जणांचा मृत्यू हेल्मेट न घातल्यामुळे डोक्‍यास मार लागून झाल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. हेल्मेट  घातले असते तर संबंधितांना जीवदान मिळाले असते. त्यामुळे हेल्मेट हा सक्तीचा विषय नाही. दुचाकी चालवताना प्रत्येकाने स्वत:चा आणि इतरांचा जीव वाचवण्याचा विचार केला पाहिजे.

अपघाताचे वाढते प्रमाण 
जिल्ह्यात २०१४ मध्ये विविध अपघातांत ३३३ जणांचा मृत्यू झाला. ८८३ जण जखमी झाले. २०१५ मध्ये ३९४ जणांचा अपघाती बळी गेला. तर ९१८ जण गंभीर जखमी झाले. तर २०१६ मध्ये ४४४ जणांचा अपघाती मृत्यू झाला. ६७७ जण गंभीर जखमी झाले.

६०० रुपयांत हेल्मेट
‘आयएसआय’ मार्क असलेले चांगल्या प्रतीचे हेल्मेट सहाशे रुपयांपासून मिळते. नवीन दुचाकी घेताना दोन हेल्मेटची सक्ती केली जाते. त्यातही खोटी बिले वितरकांना देऊन टाळाटाळ केली जाते. अवघ्या सहाशे रुपयांसाठी लाखमोलाचा जीव धोक्‍यात घातला जातोय.

Web Title: sangli news helmet accident