बंदी असूनही सांगली जिल्ह्यातील अवैध धंदे बिनबोभाट

बलराज पवार
बुधवार, 11 एप्रिल 2018

सांगली - जिल्ह्यात अवैध धंद्यांवर बंदी आहे. तसा दावा तरी केला जातो. मात्र तीन महिन्यांपूर्वी  सांगलीत रुजू झालेले तरुण पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा यांच्या मार्गदर्शनानुसार विशेष पथकाने जिल्ह्यात अवैध धंद्यांवर कारवाईचा बडगा उगारला.

सांगली - जिल्ह्यात अवैध धंद्यांवर बंदी आहे. तसा दावा तरी केला जातो. मात्र तीन महिन्यांपूर्वी  सांगलीत रुजू झालेले तरुण पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा यांच्या मार्गदर्शनानुसार विशेष पथकाने जिल्ह्यात अवैध धंद्यांवर कारवाईचा बडगा उगारला. विशेष म्हणजे बेकायदा दारू अड्डे आणि मटका अड्डे बिनबोभाट सुरू असल्याचे यात दिसून आले. मग हे धंदे बंद असल्याचा दावा का केला जात होता?

श्री. शर्मा यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये जिल्हा पोलिस अधीक्षक पदाची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर शहरात दहशत माजवणाऱ्या गुंडांच्या टोळ्यांवर कारवाईचा धडाका लावला. सचिन सावंत, बाळू भोकरे यांच्यासह तीन टोळ्यांना मोका लावला. यात २६ जणांवर कारवाई  झाली. २२ जणांना हद्दपार केले. सातजणांना स्थानबद्ध केले. हे सर्व करत असताना जिल्ह्यात अवैध धंदे सुरू होतेच. मात्र पोलिस अवैध धंदे बंद असल्याचा दावा करीत होते. कारवाई केलीच तर बेकायदा दारू विक्रीवर कारवाई होत असे. परंतु मटक्‍याचे अड्डे सुरूच होते.

पोलिस अधीक्षक श्री. शर्मा यांची अवैध धंद्यांकडे वक्रदृष्टी पडली आणि विशेष पथकाला अवैध धंद्यांवर कारवाईच्या सूचना मिळाल्या. जिल्ह्यात बिनबोभाटपणे सुरू असलेले अवैध धंदे मोडून काढण्यासाठी त्यांनी कारवाईचे आदेश दिल्यानंतर पथकाने आजवर जिल्ह्यात विविध ठिकाणी मटका, दारू अड्ड्यांवर छापे टाकले. यात मटका बंद असल्याचा दावा करणाऱ्या पोलिसांनाच तोंडावर पडण्याची वेळ आली.  इस्लामपूर, जत, मिरजेसह सांगली शहरातील मटका अड्डे उद्‌ध्वस्त झाले. या पथकाने बेकायदा दारू विक्री प्रकरणी २०३ जणांवर तर मटका, जुगार खेळताना ३६० जणांवर कारवाई केली.

हद्दपार मटकेवाले कुठायत?
गेल्या वर्षी जून महिन्यात तत्कालीन जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी १९३ मटकेवाल्यांना हद्दपार केले होते. त्यांनी २३ टोळ्यांना तडीपार करून मटका व्यवसायाचे कंबरडे मोडले होते. या धडक कारवाईमुळे जिल्ह्यातील मटका व्यवसायाला आळा बसला. परंतु त्यांनी हद्दपार केलेले अनेकजण पुन्हा जिल्ह्यातच  फिरताना आढळले. काहींना पुन्हा पकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. मात्र मटका बंद असल्याचा  दावा फोल ठरला तो ठरलाच. आता तर विशेष पथकाने बदाम चौकसारख्या शहरातील मध्यवर्ती भागातच सुरू असलेल्या अड्डयावर छापा टाकल्याने मटका सुरू असल्यावर शिक्कामोर्तब झाले. गेल्या महिन्यात मिरजेतील एका मटका टोळीस तडीपार केले होते. 

ऑनलाईन मटका जोरात
पूर्वी मटक्‍याच्या चिठ्ठया सापडत. एका चिटोऱ्यावर मटक्‍याचे आकडे लिहून पैशाचे व्यवहार चालत होते. आता मोबाईलच्या जमान्यात मटका व्यवसायही  आधुनिक झाला. मटका बुकींनी मोबाईलवरून ऑनलाईन मटका घेण्यास सुरवात केली. गल्लीच्या कोपऱ्यावर, चौकात, बोळात दिसणारी मटक्‍याची खोकी आता कालबाह्य झालीत. पण, मटका कालबाह्य झाला नाही. त्यामुळेच मटका व्यवसाय जोरात असला तरी तो उघडपणे दिसत नाही. म्हणून पोलिसांना माहिती नाही,  असे होत नाही. ऑनलाईन मटक्‍यामुळे बुकी तडीपार झाले तरी त्यांनी पंटरमार्फत आपला मटक्‍याचा धंदा सुरू ठेवला आहेच.

मटक्‍याला वरदहस्त 
जिल्ह्यात मटका व्यवसाय जोमात सुरू असण्यासाठी कुणाचा वरदहस्त आहे? हा चर्चेचा विषय आहे. अवैध धंद्याला राजकीय वरदहस्त असल्याशिवाय तो चालत नाही, असा पूर्वापार इतिहास आहे. त्यामुळेच शहरात आणि जिल्ह्यातही मटका व्यवसाय कुणाच्या वरदहस्ताने चालतो? आता तर महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. मटकेवाल्यांनाही व्हाईट कॉलर बनण्याची स्वप्ने पडली तर नवल नाही. वरदहस्ताचा वापर करून महापालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठीही काहीजण प्रयत्न करत आहेत.

३६० जणांवर कारवाई
मटका, पत्त्याचा जुगार जोरात सुरू आहे. या अवैध धंद्यांवर पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने केलेल्या कारवाईत ३६० जणांवर कारवाई झाली. मात्र हे जामीनपात्र गुन्हे असल्याने कारवाईने अवैध धंद्यांना  आळा बसेल ही आशा भाबडी ठरले. उलट जामीन मिळाल्यावर ज्यांचे हात ओले करायचे ते दर वाढवून घेतात अशी चर्चा आहे. कारवाईनंतर हे धंदे जोमाने सुरू होत असल्याचा अनुभव आहे.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला कोलदांडा
मटकेवाल्यांना फोडून काढा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन वर्षांपूर्वी जिल्हा दौऱ्यातच दिले.  मात्र अंमलबजावणी झाली नाही. उलट त्या आदेशाला कोलदांडा देत या धंदेवाल्यांवर वरदहस्त ठेवण्यातच काहींनी धन्यता मानली गेली. तसेच एकूण चित्र आहे.

Web Title: Sangli News illegal businesses issue