दरोड्याच्या तयारीतील आंतरराज्य टोळीला अटक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 मे 2018

कवठेमहांकाळ - कोंगनोळी (ता. कवठेमहांकाळ) येथील पांडेगाव रोडवरील रेल्वे गेटजवळ आंतरराज्य सशस्त्र दरोड्याच्या तयारीतील पाच जणांच्या टोळीतील चौघांना कवठेमहांकाळ पोलिसांनी जेरबंद केले. त्यातील एकजण पसार आहे.

कवठेमहांकाळ - कोंगनोळी (ता. कवठेमहांकाळ) येथील पांडेगाव रोडवरील रेल्वे गेटजवळ आंतरराज्य सशस्त्र दरोड्याच्या तयारीतील पाच जणांच्या टोळीतील चौघांना कवठेमहांकाळ पोलिसांनी जेरबंद केले. त्यातील एकजण पसार आहे. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे नऊ एमएमची पिस्तूल, पाच जिवंत काडतुसे, सत्तूर, कटावणी, चटणी पूड, एक्‍साब्लेड, कटर असे साहित्य मिळाले. 

पोलिसांनी विजयकुमार ऊर्फ अक्षय शंकर पाटील (वय २२, रा. डफळापूर, ता. जत), सतीश शिवाजी कोळी (२७, रा. घाटनांद्रे), मुकुंद ऊर्फ सोनू श्रीकांत दुधाळे (२६, रा. कोंगनोळी) व राजकुमार पांडुरंग पाटोळे (२२, रा. नांगोळे, सर्व ता. कवठेमहांकाळ) यांना अटक केली असून, दीपक दशरथ पाटील (रा. संबर्गी, ता. अथणी) पसार आहे. याबाबत गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई काल (ता. ५) रात्री पावणेनऊच्या सुमारास करण्यात आली.

सलगरे दूरक्षेत्राचे बीट हवालदार विजय घोलप, तसेच पोलिस नाईक विजय अकूल यांना कवठेमहांकाळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोंगनोळी- पांडेगाव रोडवरील रेल्वे गेटनजीक शेतात दोन मोटारसायकली व पाच संशयित तरुण असून, त्यांच्याजवळ शस्त्र व दरोड्याचे साहित्य आहे, अशी माहिती मिळाली. यावरून घोलप व अकूल यांनी घटनास्थळी जात चौघांना ताब्यात घेतले; तर एकजण मोटारसायकलवरून पळून गेला.

आरोपींना १४ मेपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. टोळीतील दीपक पाटील याच्यावर कर्नाटक व महाराष्ट्रात गुन्हे दाखल आहेत.

Web Title: Sangli News Interstate robbery related Gang arrested