इस्लामपूर ते कन्याकुमारी; परत इस्लामपूर २४ तासांत

सुधाकर काशीद
शुक्रवार, 22 डिसेंबर 2017

कोल्हापूर - आपलं गाव कितीही जवळ असूदे, गावाकडे जाऊन यायचं म्हटलं तरी, बघता बघता एक दिवस जातो; पण मानसिंग देसाई यांनी बघता बघता मोटारसायकलवरून २४ तासांत इस्लामपूर ते कन्याकुमारी व परत इस्लामपूर असा २४५३ किलोमीटरचा प्रवास करून एक विक्रम केला. 

कोल्हापूर - आपलं गाव कितीही जवळ असूदे, गावाकडे जाऊन यायचं म्हटलं तरी, बघता बघता एक दिवस जातो; पण मानसिंग देसाई यांनी बघता बघता मोटारसायकलवरून २४ तासांत इस्लामपूर ते कन्याकुमारी व परत इस्लामपूर असा २४५३ किलोमीटरचा प्रवास करून एक विक्रम केला. 

देशातला सर्वात वेगवान मोटारसायकलपटू असा त्यांचा हा विक्रम ठरू शकणार आहे. अर्थात विक्रम जाहीर करण्यापूर्वीच त्याची छाननी बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्डकडून सुरू आहे. १७ डिसेंबर रात्री १२ वाजता सुरू झालेला हा प्रवास १८ डिसेंबरची सुरवात होण्यापूर्वी संपला. 

देसाई हे इस्लामपूरचे. त्यांना मोटारसायकलची जरूर आवड; पण सहकार खात्यात ऑडिटर म्हणून सेवा करत करत त्यांनी मोटारसायकलच्या भन्नाट वेगाचा छंद जपला. वास्तविक सरकारी सेवेत आणि तेही विटा येथे सहकार खात्यातल्या ऑडिटर विभागात नोकरी म्हणजे रोज डोक्‍याचा  भुगा. त्यामुळे छंद जपणे वगैरे लांबच; पण मानसिंग देसाई यांनी नोकरी जरूर पोटापाण्याचे साधन आहे, मात्र त्यासाठी  छंदावर, आवडीवर पाणी सोडायचे नाही असेच ठरवले. मोटारसायकलची आणि त्याच्या वेगाचे त्यांना विलक्षण वेड. त्यामुळे त्यांनी आपल्या जमिनीतील काही गुंठे जमीन विकून ट्रायम्फ टायगर ही आधुनिक मोटार सायकल घेतली. काही दिवस सराव केला. ऐश्‍वर्या रॉयल रायडर्स क्‍लबचे ते सदस्य झाले. त्यामुळे या क्षेत्रातल्या नव्या वाटा त्यांना कळाल्या. आणि त्यांनी इस्लामपूर ते कन्याकुमारी व परत इस्लामपूर असा २४५३ किलोमीटरचा प्रवास २४ तासांत पूर्ण करण्याचा विक्रम करण्याचा निर्णय घेतला. 

अर्थात नेहमीप्रमाणे त्यांच्या या विक्रमास प्रोत्साहन देण्याऐवजी ‘हे कसे काय शक्‍य आहे’ असा प्रश्‍न उपस्थित करणारेच अनेकजण भेटले; पण असा प्रश्‍न म्हणजेच प्रेरणा असे समजून त्यांनी १७ डिसेंबरला रात्री १२ वाजता इस्लामपूर येथून जयदीप पवार व इतर मित्र परिवाराच्या उपस्थितीत आपली ट्रायम्फ टायगर सुरू केली.

इस्लामपूर, कोल्हापूर, बेळगाव, हुबळी, बंगळूर मार्गे तिरुनेलवेली (कन्याकुमारी) व परत त्याच मार्गे २४ तासांत परत येऊन थांबवली. अर्थात मार्गात ठिकठिकाणी त्यांना पेट्रोल भरावे लागले. त्यांच्या मोटारसायकलला जी.पी.एस. यंत्रणा बसवली होती व त्याच्या आय.डी. त्यांनी १५०० जणांना दिला होता. त्यामुळे ते कोठे आहेत हे इतरांनाही कळू शकत होते.  हा सारा प्रवास राष्ट्रीय महामार्गावरून झाला. महामार्गाची स्थिती चांगली असल्याने ताशी वेग १०५ ते ११० ठेवता आला.

संपूर्ण प्रवासात एनर्जी ड्रिंक, चॉकलेट व पाणी हाच आहार घेतला. वारंवार पाणी पित राहिलो. एनर्जी ड्रिंक व चॉकलेटमुळे शरीराला थकवा आला नाही. २४५३ किलोमीटर प्रवासाठी १८० लिटर पेट्रोल लागले. मी हा जरूर विक्रम केला पण बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड याची छाननी करत आहे. ते जेव्हा प्रमाणपत्र देतील तेव्हा अधिकृत विक्रम जाहीर होईल. 
- मानसिंग देसाई

Web Title: Sangli News Islampum - Kanyakumari - Islampur within 24 hours