अनधिकृत होर्डिंग्जवरून इस्लामपूर पालिकेत वादावादी

धर्मवीर पाटील
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

इस्लामपूर - अनधिकृत होर्डिंग्ज व डिजिटल विषयावर इस्लामपूर नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज सत्ताधारी विकास आघाडी आणि विरोधक राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांच्यात जोरदार वादावादी झाली.

इस्लामपूर - अनधिकृत होर्डिंग्ज व डिजिटल विषयावर इस्लामपूर नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज सत्ताधारी विकास आघाडी आणि विरोधक राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांच्यात जोरदार वादावादी झाली.

प्रशासनाने पालिकेला मिळणारे उत्पन्न विचारात घेऊन निश्चित धोरण ठरविण्याची सूचना करूनही दोन्ही बाजूंनी एकमेकांची 'मापे' काढण्यात नगरसेवक गुंतले. सत्ताधारी गटाचे पक्षप्रतोद विक्रम पाटील आणि नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यातही शाब्दिक चकमक उडाली.

विषयपत्रिकेतील तेराव्या क्रमांकाच्या डिजिटल फलक विषयावर धोरण ठरविण्याच्या विषयावर शिवसेनेचे शकील सय्यद यांनी डिजिटलमुक्त शहर करण्याची मागणी केली. नो डिजिटल झोनमध्येच जाणीवपूर्वक डिजिटल लावली जात असताना हे कसे शक्य आहे? असा प्रतिप्रश्न डांगे यांनी केला. विक्रम पाटील यांनी नगराध्यक्षांना शब्दांत पकडत 'निवडणुकीत आपण हे शहर डिजिटलमुक्त करण्याची घोषणा केली होती, त्याचे काय झाले?' असा प्रश्न विचारला. त्यावर पालिकेला मिळणारे उत्पन्न विचारात घेऊन डिजिटल आवश्यक असल्याचे मत मांडत अनधिकृत भागातील डिजिटल कारवाईचा मुद्दा रेटला.

दरम्यान राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष शहाजी पाटील यांनी शहरात सध्या सर्वात जास्त डिजिटल सत्ताधारी विकास आघाडीचेच असल्याची टीका केली. त्यावर आघाडीच्या वैभव पवार, अमित ओसवाल, आनंदराव पवार यांनी त्यांच्यावर धावून जात प्रत्यारोप सुरू केले. शहाजी पाटील यांच्यावर आरोप होताच 'माझे एकही डिजिटल नाही' असे ठामपणे त्यांनी सांगितले. या वादावादीत मूळ विषय बाजूलाच राहिला आणि नगराध्यक्ष पाटील यांनी थोड्या वेळेसाठी 'ब्रेक' घेतला. शेवटी मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी केलेल्या सूचनांचे पालन करून नियमावली ठरविण्याचा निर्णय झाला. नो डिजिटल झोनची अंमलबजावणी करण्याचे ठरले.

Web Title: Sangli News Islampur Nagarpalika General meeting