‘सदोष मनुष्यवधाची’ वाट पाहताय का?

शंकर भोसले
बुधवार, 6 डिसेंबर 2017

सांगली - सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेचा कारभार सातत्याने वादग्रस्त राहिला आहे. गेल्या तीन वर्षांत शहरात रस्त्यावरील अपघातामुळे सुमारे ३०० जणांचे बळी गेले आहेत. विश्रामबाग परिसर हा तसा उच्चभ्रू वस्तीचा परिसर मानला जातो.

सांगली - सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेचा कारभार सातत्याने वादग्रस्त राहिला आहे. गेल्या तीन वर्षांत शहरात रस्त्यावरील अपघातामुळे सुमारे ३०० जणांचे बळी गेले आहेत. विश्रामबाग परिसर हा तसा उच्चभ्रू वस्तीचा परिसर मानला जातो.

या परिसरातील वीज मंडळ ते गव्हर्न्मेंट कॉलनीकडे जाणाऱ्या मार्गावर असंख्य अडथळे आहेत. याच रस्त्यांच्या मधोमध गेले आठ दिवस जवळ जवळ चार फूट खोलीचे भगदाड  पडले आहे. तरी देखील ना मुकादम ना ओव्हरसियर ना कुणी अभियंता फिरकला नाही. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनीच या ठिकाणी एक बांबू लावून लोकांना  सावध केले आहे. 

सांगली-मिरज रस्त्यावरील खड्ड्यांच्या भोवती रांगोळी घालणारे, खड्ड्यात मेणबत्ती, झाडे लावणे असे अनेक प्रयोग संघटनांनी करून पाहिले. मात्र तरीही महापालिकेची व्यवस्था मुख्य रस्त्यावर पडलेल्या भगदाडाकडे, पडलेल्या खड्ड्याकडे सुद्धा पाहू शकत नाही. इतकी महापालिका आंधळी झाल्याची टीका सर्वच स्तरांतून होत आहे. 

मध्यंतरी सांगलीचे जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांनी खड्ड्यांच्यामुळे नागरिकांचा बळी गेल्यास संबंधित ठेकेदारांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा दिला होता. एवढ्या इशाऱ्यावरून ही त्याच-त्याच कंत्राटदारांकडून  वडाप-वडाप प्रकारची कामे केली जात आहेत. त्यांचा हा रस्ता वीजमंडळ ते गव्हर्न्मेंट कॉलनी, वृंदावन व्हिला मिरजेकडे जाणारा रस्ता त्याचे जिवंत उदाहरण आहे. पालिका क्षेत्रातील रस्त्यांची निकृष्ट कामे नागरिकांनी थांबवलेली आहेत. मात्र सत्ताधाऱ्यांच्याकडून ठेकेदारांचा बचाव केला जात असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. भविष्यात २४ कोटींची रस्त्यांची कामे नुकतीच जाहीर केली आहेत. मात्र त्या रस्त्यांच्या कामातील  दर्जाचा सवाल सर्वच स्तरांतून व्यक्त होत आहे.

आता तरी जिल्हाधिकारी लक्ष देणार का ?
महापालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनाही एका बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी रस्त्यांच्या दर्जाबाबत सूचना केल्या होत्या. सांगलीत जिल्हाधिकाऱ्यांनी वाळू ठेकेदारांच्या मुसक्‍या आवळल्या, पेट्रोल पंपावर छापे टाकले, मात्र रस्ते ठेकेदारांनी केलेल्या निकृष्ट, बोगस कामांवर आपला मोर्चा वळवणार काय, अशी चर्चा सांगलीतून होत असून स्वत ः जिल्हाधिकाऱ्यांनी खड्ड्यांमुळे मृत्यू झाल्यास ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा होणार असल्याचे सांगितेल आहे. मात्र ठेकेदारांनी याची दखल घेतल्याचे दिसत नाही.

Web Title: Sangli News issue of obstacles on road