आघाडीचा चेंडू सांगली राष्ट्रवादी शहराध्यक्षांच्या कोर्टात - जयंत पाटील

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 मे 2018

सांगली - महापालिका निवडणुकीत आघाडी करायची की नाही, याचा निर्णय काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष घेतील. दोघांचे पटले तरच आघाडी होईल, असे सूचक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी येथे केले.

सांगली - महापालिका निवडणुकीत आघाडी करायची की नाही, याचा निर्णय काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष घेतील. दोघांचे पटले तरच आघाडी होईल, असे सूचक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी येथे केले.

येथील डेक्कन मॅन्युफॅक्‍चरिंग हॉलमध्ये राष्ट्रवादी यूथ बुथ आढावा बैठक झाली. अवघ्या काही मिनिटांत बैठक आटोपून जाताना त्यांनी पत्रकारांशीही धावता संवाद साधला. राष्ट्रवादीची काही मंडळी भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा असल्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, ‘‘आमच्या पक्षातले कोण तिकडे जाणार नाही. आमचा पक्ष आणि त्यांचा पक्ष वेगळा आहे. कोणत्या पक्षाचे जाणार ते त्यांनाच माहीत नाही.’’

रेल्वेत शेतकरी भीक मागत असल्याच्या प्रकाराबद्दल ते म्हणाले, ‘‘राज्यात शेतकऱ्यांची दुरवस्था झाली आहे. सरकारला शरम वाटली पाहिजे. मुळात शेतकऱ्यांमध्ये कर्ज फेडण्याची प्रवृत्ती असते. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची गरज आहे. सरसकट कर्जमाफीची घोषणा करून सरकारने अर्धवट कर्जमाफी दिली आहे. त्यामुळे अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत. शेतकऱ्यांच्या दुरवस्थेला सरकारच कारणीभूत आहे.’’

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्रामसिंह कोते-पाटील, संजय बजाज, कमलाकर पाटील आदी उपस्थित होते.

समविचारी पक्षासोबत आम्ही
महापालिका निवडणुकीत काँग्रेसबरोबर आघाडी करणार काय? या प्रश्‍नावर श्री. पाटील म्हणाले, ‘‘आमचे शहर अध्यक्ष आणि काँग्रेसचे शहर अध्यक्ष त्याबाबत निर्णय घेतील. दोघांचे पटले तरच आघाडी होईल. राज्यात समविचारी पक्षाबरोबर आमची आघाडी असेल.’’

Web Title: Sangli News Jayanat Patil comment