राष्ट्रवादीची धुरा पुन्हा एकदा सांगलीकडे 

बलराज पवार
सोमवार, 30 एप्रिल 2018

सांगली - प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसची धुरा पुन्हा एकदा सांगलीकडे आली आहे. स्व. आर. आर. पाटील यांनी दोनवेळा प्रदेशाध्यक्ष म्हणून पक्षाची धुरा सक्षमपणे सांभाळली होती. त्यांच्यानंतर आता ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांच्यावर राज्याची धुरा पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी टाकली आहे.

सांगली - प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसची धुरा पुन्हा एकदा सांगलीकडे आली आहे. स्व. आर. आर. पाटील यांनी दोनवेळा प्रदेशाध्यक्ष म्हणून पक्षाची धुरा सक्षमपणे सांभाळली होती. त्यांच्यानंतर आता ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांच्यावर राज्याची धुरा पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी टाकली आहे. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांच्यावर राज्याची जबाबदारी सोपवण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. 

पुण्यात आज झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बैठकीत जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करुन शरद पवार यांनी पुन्हा एकदा सांगलीवर विश्‍वास टाकला आहे. सलग सहा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवणाऱ्या जयंत पाटील यांनी पंधरा वर्ष राज्याचे अर्थ व नियोजन, गृह, ग्रामविकास या खात्यांची जबाबदारी समर्थपणे सांभाळली आहे. एक सुसंस्कृत अभ्यासू नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. 

सन 2014च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला मोठा फटका बसला. आर. आर. पाटील यांचे निधन, छगन भुजबळ यांच्यावरील आरोप, जलसंपदा विभागातील घोटाळा यामुळे गेल्या दोन-तीन वर्षात राष्ट्रवादीची खडतर वाटचाल सुरु असताना त्यांनी विधीमंडळ गटनेतेपदाच्या माध्यमातून आपला ठसा उमटवला आहे. त्यांनी आपल्या अभ्यासपुर्ण भाषणातून राज्य सरकारला गेल्या दोन वर्षात चांगलेच अडचणीत आणले होते. 

पहिली परिक्षा महापालिकेची 
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची पहिली परिक्षा महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने होणार आहे. आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर महापालिकेची निवडणूक त्यांच्या नेतृत्वाखाली होत आहे. पक्षांतर्गत धुसफूस आणि भाजपचे आव्हान या पार्श्‍वभूमीवर आता त्यांना महापालिका जिंकण्यासाठी आपले नेतृत्व कौशल्य पणाला लावावे लागणार आहे. हे आव्हान ते कसे पेलणार याकडे लक्ष आहे. 

आर. आर. आबांची आठवण 
आर. आर. पाटील यांच्याकडे दोनवेळा राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षपदाची धुरा होती. दोन्हीवेळा त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने सन 2004 आणि सन 2009च्या विधानसभा निवडणुकीत यश मिळवले होते. आता तीच विजयी परंपरा पुढील वर्षीच्या निवडणुकीत सुरु ठेवण्याचे आव्हान जयंत पाटील यांच्यासमोर आहे. 

भाजप प्रवेशाची चर्चा बंद 
आमदार जयंत पाटील भाजपमध्ये जाणार अशी चर्चाही गेल्या काही वर्षात अधूनमधून सतत रंगत होती. त्यांचे भाजप नेत्यांशी असलेल्या संबंधांमुळे ते भाजपमध्ये जाणार त्यांना मोठी संधी मिळणार अशा चर्चा वर्षभरापुर्वी रंगत होत्या. त्यालाही आता पुर्णविराम मिळेल. 

Web Title: Sangli News Jayant Patil NCP chief