जीपीएस गाड्या, सीसीटीव्हीमुळे पोलिस दल होतेय सुसज्ज

बलराज पवार
मंगळवार, 22 मे 2018

सांगली - जिल्हा पोलिस दल आधुनिक सुविधांनी सुसज्ज करण्याकडे पावले टाकली जात आहेत. तीन आठवड्यापुर्वी शहरात 79 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. तर शंभर वाहनांना जीपीएस सिस्टीम बसवण्यात आली आहे.

सांगली - जिल्हा पोलिस दल आधुनिक सुविधांनी सुसज्ज करण्याकडे पावले टाकली जात आहेत. तीन आठवड्यापुर्वी शहरात 79 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. तर शंभर वाहनांना जीपीएस सिस्टीम बसवण्यात आली आहे.
त्यामुळे गुन्हे रोखण्यासाठी, संशयित गुन्हेगार शोधण्यासाठी, घटनास्थळी तातडीने पोहोचण्यासाठी याचा फायदा होणार आहे.
वाहतूक पोलिस बंद होणार सांगली, मिरजेतील प्रमुख चौकांमध्ये बसवण्यात आलेल्या उच्च दर्जाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे वाहतुकीला शिस्त लागू लागली आहे.

वाहनधारकांना दंडपासून वाचण्यासाठी नियम पाळावे लागणार आहेत. नियम मोडलाच तर पोलिसांनी शिट्‌टी मारुन थांबवण्याऐवजी सरळ घरीच दंडाची नोटीस येणार आहे. त्यामुळे
भविष्यात वाहतूक शिस्तीसाठी अनावश्‍यक पोलिस उभे करण्याचे बंद करण्याबाबत पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा विचार करत आहेत. वाहनधारकांनी स्वत: नियम पाळावेत अन्यथा ई चलन नोटीशीचा दंड भरावा असे कामकाज सुरु होण्याची
शक्‍यता आहे.

शंभर वाहनांना जीपीएस वाहतुकीला शिस्त लावत असतानाच पोलिसांच्या वाहनांवर जीपीएस सिस्टीम बसवण्यात आली आहे. सुमारे शंभर वाहनांना अशी सिस्टीम बसवण्यात आल्याने
गस्त घालणाऱ्या पोलिसांना आता गांभीर्याने फिरावे लागणार आहे. जीपीएस बसवण्यात आलेल्या वाहनांमध्ये चार चाकी वाहने 70 आणि 30 दुचाकी आहेत.

दुचाकींना जीपीएस बरोबरच सायरनही लावण्यात येत आहे. यामुळे गर्दीच्या ठिकाणी अथवा इमर्जन्सीच्या ठिकाणी जाताना पोलिसांना तात्काळ पोहोचण्यास याची मदत होणार आहे. बीट मार्शल, गस्ती पथकाची वाहने, बेकर अशा गाड्यांना
जीपीएस बसवल्यामुळे पोलिसदल आणखी सुसज्ज होणार आहे.
गस्त पथकांवर लक्ष या सिस्टीमचा सर्वात मोठा फायदा गस्त घालणारे किंवा बीट मार्शल यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी होणार आहे.

गस्त घालणारा नेमणुकीच्या भागात आहे की नाही, कुठं आहे ते ठिकाण, वाहनाचा वेग, वाहन थांबले असल्यासही त्याची माहिती मुख्यालयातील नियंत्रण कक्षाला मिळणार आहे. त्यामुळे पोलिसांना गस्त घालताना निष्काळजीपणा केल्यास महागात पडणार आहे. या सुविधांमुळे जिल्हा पोलिस दल सुसज्ज आणि सक्षम होण्यास मदत होत आहे.

जीपीएस बसवल्याने गुन्हा घडल्याच्या ठिकाणी, एखाद्या महिलेस, मुलीस मदतीची गरज असल्यास तेथे जवळच असलेले पोलिस, निर्भया पथक जीपीएसद्वारे पाहून घटनास्थळी तात्काळ पाठवण्यास मदत होणार आहे. तणावग्रस्त परिस्थिती
नियंत्रणात आणण्यासाठी या सुसज्जतेमुळे तातडीने जादा कुमक पाठवण्याची सोय होवू शकते. यामुळे गुन्हेगारीस आळा घालण्यास मदत होईल.
-  शशिकांत बोराटे,
अपर पोलिस अधीक्षक

Web Title: Sangli News JPS Motor, CCTV update Police Force