"सेकंड इनिंग'मध्येही कबड्डीचाच ध्यास... 

(संकलन - घनश्‍याम नवाथे)
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

कबड्डीमहर्षी बुवा साळवी यांचे अत्यंत विश्‍वासू सहकारी आणि नावाजलेल्या खेळाडूंचा पट काढण्यात माहीर असलेल्या रामभाऊ घोडके यांनी राजकारणातही ठसा उमटविला. कबड्डीसाठी वाहून घेतलेले रामभाऊ "सेकंड इनिंग'मध्ये जिल्हा कबड्डी संघटनेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन राज्य कबड्डी संघटनेने त्यांना "कृतज्ञता' पुरस्कार देऊन गौरविले. 

रामभाऊंचा जन्म 1949 मध्ये मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. कबड्डीची आवड लक्षात घेऊन रामभाऊ आणि त्यांचे बंधू वसंतराव घोडके यांनी तरुण भारत व्यायाम मंडळातून सुरवात केली. दोन भावांनी कबड्डीत नावलौकिक निर्माण केला. 1965 मध्ये आझाद व्यायाम मंडळाची स्थापना केली. 1972 मध्ये राज्याच्या प्रातिनिधिक संघात रामभाऊंची निवड झाली. जिल्हा, राज्य आणि अखिल भारतीय स्तरावर कबड्डीत अनेकदा अजिंक्‍यपद पटकावून दिले. हॅट्ट्रिक साधली. वैयक्तिक सुवर्णपदके आणि सन्मान मिळविला. 1979 मध्ये नागपूरच्या अखिल भारतीय महापौर सुवर्णकरंडक स्पर्धेत अजिंक्‍यपद मिळविले. 1980 मध्ये मध्य प्रदेशातील अखिल भारतीय सुवर्णकरंडक स्पर्धेत अजिंक्‍यपद मिळविले. जिल्ह्याला प्रथमच सलग दोन वेळा सुवर्णपदक मिळवून दिले. 

मुंबई, पुण्यातील चढाईपटूंचे त्या वेळी वर्चस्व होते. परंतु, खाली वाकून ताकदवान खेळाडूंचा पट काढून पकडण्याचे रामभाऊंचे कौशल्य अतुलनीय होते. "पट काढावा तर रामभाऊंनी'च असे सांगितले जायचे. पट काढण्याबरोबर चढाईपटू म्हणून त्यांनी लौकिक मिळविला. कबड्डी खेळणे थांबविल्यानंतर त्यांनी मैदान मात्र कधीच सोडले नाही. राजकारणाचे मैदानही चांगलेच गाजविले. तत्कालीन नगरपालिकेत 1985 मध्ये नगरसेवक म्हणून "एंट्री' केली. नगराध्यक्ष म्हणून त्यांना संधी मिळाली. महापालिकेतही त्यांनी कारकीर्द गाजवली. कबड्डी व कुस्ती खेळाडूंना दत्तक घेण्याची योजना राज्यात प्रथमच राबविण्यात पुढाकार घेतला. 

राजकारणात गेल्यानंतरही त्यांची कबड्डीची आवड कमी झाली नाही. राज्य कबड्डी संघ निवड समिती सदस्य, प्रशिक्षक, पंच शिबिर, राज्य संघाचे सराव शिबिर आणि विविध स्पर्धांच्या आयोजनात ते उत्साहाने सहभागी होतात. आझाद व्यायाम मंडळाच्या माध्यमातून विविध खेळांनाही ते प्रोत्साहन देतात. कबड्डीसाठी वाहून घेतलेल्या रामभाऊंच्या कार्याची दखल राज्य कबड्डी संघटनेने घेतली. "कृतज्ञता' पुरस्कार देऊन त्यांना नुकतेच गौरविले. राज्य संघटनेत कार्यवाह, उपाध्यक्ष म्हणून संधी मिळाली. सध्या ते जिल्हा संघटनेचे अध्यक्ष म्हणून पूर्वीच्याच उत्साहाने काम करतात. आजवरच्या वाटचालीविषयी ते म्हणतात, ""मला राजकारणीपेक्षा कबड्डी खेळाडू म्हणूनच सर्वजण ओळखतात. खेळातूनच मला राजकारणात काम करण्याची क्षमता व प्रेरणा मिळाली.'' 

Web Title: sangli news Kabaddi