सांगलीत जागेच्या वादातून हाणामारी; १८ जणांना अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जानेवारी 2018

सांगली - शहरातील खणभागात असलेल्या मकान गल्लीत जागेच्या वादातून दोन कुटुंबात मारामारी झाली. गेल्या काही वर्षांपासून दोन्ही कुटुंबांमध्ये वाद सुरू आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असूनही त्यांच्यात वाद आहेत. त्यातून एकमेकांच्या घरात घुसून मारहाण करण्याचे प्रकार घडले.

सांगली - शहरातील खणभागात असलेल्या मकान गल्लीत जागेच्या वादातून दोन कुटुंबात मारामारी झाली. गेल्या काही वर्षांपासून दोन्ही कुटुंबांमध्ये वाद सुरू आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असूनही त्यांच्यात वाद आहेत. त्यातून एकमेकांच्या घरात घुसून मारहाण करण्याचे प्रकार घडले. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात दोन्ही बाजूकडून परस्पर विरोधी फिर्याद आहे. पोलिसांनी ३९ जणांवर गुन्हा नोंदविला आहे. यातील १८ जणांना अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी अधिक माहिती अशी - मकान गल्लीत रेश्‍मा तसलीम जमादार (वय ३०) या पती, सासू, सासरे, दीर यांच्यासोबत एकत्र राहण्यास आहेत. सिटी सर्व्हे नंबर २७० मध्ये त्यांचे घर आहे. जमादार यांचा बांगडी व्यवसाय असून त्यांचे 
पती इलचकरंजी येथे रेडिएटर मेकॅनिक म्हणून काम करतात. त्यांच्याच जागेत शेजारच्या घरात बिसमिल्ला सलीम देसाई या कुटुंबासह कुळ म्हणून गेली ३० वर्षे राहतात. या दोन्ही कुटुंबात जागेच्या कारणावरून सांगली न्यायालयात दिवाणी दावा सुरू आहे. 

रेश्‍मा जमादार यांनी काल (ता. १६) दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की, शेजारी राहणारे देसाई कुटुंब कोणत्याही कारणावरून भांडणतंटा करतात. ता. १२ जानेवारी २०१८ रोजी रेश्‍मा जमादार सकाळी आठ वाजता घरात मुलास खायला देत होत्या. त्यावेळी बिस्मिल्ला सलीम देसाई, रेहाना साहील लांडगे, साहील रशीद लांडगे, रिझवाना सलीम देसाई, बेबीताई बापू शेवाळे, गौस अस्लम देसाई, सलीम मकतुम देसाई, तौफिक गुलाब दानवाडे, निहाल बापू शेवाळे यांच्यासह १६ जण जमादार यांच्या घरात घुसले. कोर्टाचा निकाल कधी लागायचा तेव्हा लागू दे, आता त्यांना जिवंत सोडायचे नाही असे म्हणत संशयितांनी जमादार यांच्या कुटुंबातील लोकांना लाकडी दांडक्‍याने आणि लाथाबुक्‍क्‍याने मारहाण करण्यास सुरवात केली. घरातील लोकांना शिवीगाळ केली. घरातील महिलांचा विनयभंग केला.

रेश्‍मा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार १६ जणांविरोधात  गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यापूर्वीही ता. १९ ऑगस्ट २०१७ रोजी रात्री साडेनऊ वाजता जमादार कुटुंबाला मारहाण करून घरातील मौल्यवान साहित्य, भांडीकुंडी, बेड असे दीड लाखाचे साहित्य जबरदस्तीने एका छोटा हत्ती गाडीतून चोरून नेले होते. मात्र भीतीपोटी तक्रार दिली नव्हती. असेही तक्रारीत म्हटले आहे. वरील सर्वांना पोलिसांनी अटक केली आहे.

दरम्यान, बिसमिल्ला सलीम देसाई (वय ४५) यांनी  आज दिलेल्या फिर्यादित याकूब अब्दूल जमादार, ईस्माईल अब्दूल जमादार, अजीज ईस्माईल जमादार, तौफिक याकूब जमादार, तस्लीम याकूब जमादार, नौशाद ईस्माईल जमादार, जायदा नौशाद जमादार, रशिदा तौफिक जमादार, रेशमा तस्लीम जमादार यांच्यासह एकूण २३ जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. वरील सर्वांनी २० ऑक्‍टोबर २०१७ रोजी सकाळी १० वाजता देसाई यांच्या घरात घुसून लाकडी दांडक्‍याने मारहाण केली. शिवीगाळ केली. त्यांच्या गळ्यातील एक तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र, सहा हजार रुपये रोख चोरी करून नेले. वरील सर्वांना अटक करण्यात आली आहे.

Web Title: Sangli News land issue 18 arrested