‘लॉक’ किया जाए!

अजित झळके
सोमवार, 11 जून 2018

पती-पत्नी नोकरीवर, मुले शाळेत, घराला कुलूप. ते सुरक्षित असेल का? कुणी तोडलं तर नसेल? उगाच रुखरुख लागून राहते. कारण, काय तर ‘कुलूप’ मजबूत असेल का? आता बाजारात शंभराहून अधिक प्रकारची कुलपं आली आहेत. जी तोडणं कठीण नव्हे तर अशक्‍यच, अट मात्र एकच हलका कडी-कोयंडा असता कामा नये. नाहीतर घर पंधरा-वीस लाखांचं अन्‌ कडी-कोयंडा दीड-दोनशेचा वापरला तर ‘कुलूप’ काय करणार?

बनावट चावी, शक्‍यच नाही
सध्या ड्युरो लॉकची चलती आहे. या कुलपाच्या किल्ली बनावट बनवता येत नाही. कारण, त्याला खाची नसून  छिद्रे असतात. ती ‘कॉपी’ करण अशक्‍य. त्यामुळे चावी हरवली तर तुम्हालाही गॅस कटरनेच कुलूप तोडावे लागेल, इतकी मजबुती. त्याची किंमत ५०० ते १३०० रुपये आहे. 

सायरन लॉक
‘मेड इन चायना’ म्हटलं की जरा नाकं मुरडायची, मात्र कुलूप बाजारात चायनामेड ‘सायरन लॉक’ची क्रेझ आली आहे. या कुलपाला बनावट चावी लावली किंवा हातोडा मारून तोडण्याचा प्रयत्न केला तर जोरजोरात आवाज होतो. अट एवढीच, त्यातील सेल वेळच्या वेळी बदलले पाहिजेत. किंमत ५५० ते ७५० रुपये आहे.

नंबरिंग लॉक
चावी ऐवजी नंबरद्वारे कुलूपबंद करण्याची पद्धत तशी जुनी, मात्र घरासाठी मोठ्या आकाराचे कुलूप मिळायचे नाही. आता नंबरवाले मोठे कुलूपही सहज व स्वस्त उपलब्ध होतेय. त्याची किंमत ५५० पासून आहे.

रॉकेट लॉकला आजही पसंती
कुलपाची दांडी दोन्ही बाजूने निघून पूर्ण वेगळी होते, अशा रॉकेट लॉकची कित्येक दशकांपासून विश्‍वासार्हता आहे. ज्येष्ठ मंडळी आवर्जून अशा पद्धतीच्या कुलपाचीच मागणी करतात. 

गोलाकार चावी, विचित्र आकार
बनावट चावीचा धोका लक्षात घेता चपटी चावी न करता गोलाकार चावीची कुलपे बाजारात आहेत. त्यांचा आकार विचित्र असतो, त्यावरील सुरक्षा रेषाही बनावटगिरी करता येऊ नये, इतक्‍या पद्धतशीर असतात. 

शास्त्र अन्‌ कुलूप
कुलूप खरेदीतही काही अंशी श्रद्धा-अंधश्रद्धा आहेच.  कासब, घोडा, बजंरग बली अशा आकारांतील कुलपांना मोठी मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. या कुलपांचा वापर मुख्य दरवाजासाठी होत नसला तरी घरातील कपाटांना ती लावली जातात. त्यांची किंमत १२०० ते २००० रुपये इतकी आहे. 

पूर्वी पोलादी कुलूप, पोकळ किल्ली खूप चालायची. आजही अँटीक कुलूप म्हणून ते खरेदी केले जातात. मजबूत कुलूपांमध्ये असंख्य प्रकार बाजारात आले आहेत. कडी-कोयंडा मजबूत असेल तर या कुलपांनी सहजासहजी तोडणे अशक्‍य आहे.
- वाहीद नजीर शेख,

कुलूप विक्रेते, 
मित्रमंडळ चौक, सांगली

Web Title: Sangli News Lock special story

टॅग्स