म्हैसाळ योजनेचे भवितव्य अंधकारमय

अनिल पाटील
रविवार, 18 फेब्रुवारी 2018

सलगरे - थकबाकी वसुलीच्या फेऱ्यात अडकले म्हैसाळ योजनेचे भवितव्य अंधारमय होत आहे. थकबाकी वसुलीसाठी अधिकारी गावागावांत फिरत आहेत. मात्र गावातून ते रिकाम्या हाताने परत येत आहेत.

सलगरे - थकबाकी वसुलीच्या फेऱ्यात अडकले म्हैसाळ योजनेचे भवितव्य अंधारमय होत आहे. थकबाकी वसुलीसाठी अधिकारी गावागावांत फिरत आहेत. मात्र गावातून ते रिकाम्या हाताने परत येत आहेत. शेतकऱ्यांकडून पैसे भरण्यास प्रतिसाद मिळत नाही. प्रतिसाद न मिळाल्यास मिरज पूर्व भागासह, कवठेमहाकांळ, जत, सांगोला या तालुक्‍यांना वरदान ठरणारी म्हैसाळ योजनेचे भवितव्य अंधकारमय झाले आहे.

माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्याकडे आपली आमदारकी पणाला लावून मिरज पूर्व भागासह चार तालुक्‍यांना सुजलाम्‌-सुफलाम्‌ करणारी म्हैसाळ योजना मंजूर करण्यासाठी माजी आमदार विठ्ठल (दाजी) पाटील यांनी अथक प्रयत्न केले होते. त्यांच्या या प्रयत्नानंतर माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनीही युतीच्या सत्ता कालावधीत म्हैसाळच्या कालवे खोदाईपासून ते दुष्काळी भागाला पाणी मिळेपर्यंत प्रयत्न करीत आहेत. मात्र टप्प्याटप्प्याने महागाईचा उद्रेक होईल तसे या योजनेचा खर्च वाढत गेला. म्हैसाळ ते जतपर्यंतच्या पंप हाऊसवरील बांधकाम, विद्युतमोटरी, अधिकारी विश्रामगृह यावर मोठ्या प्रमाणावर खर्च झाला. या योजनेमागील शुक्‍लकाष्ठ काही संपता संपेना झाले आहे.

उन्हाळ्याची चाहूल लागली की म्हैसाळच्या पाण्यासाठी टाहो फोडण्यास सुरुवात होते. शेती आणि पिण्याच्या पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण होत असताना शेतकरी पाणीपट्टी भरण्यासाठी पुढे येत नाहीत. शासनस्तरावरूनही वसुलीसाठी स्वतंत्रपणे पाणी संस्थांचे नियोजन होताना दिसत नाही.

सध्या वसुलीसाठी प्रत्येक पंपहाऊसवरील क्षेत्राप्रमाणे गावागावांत दोन-तीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करून पाणीपट्टी वसुलीसाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र शेतकऱ्यांकडून काही पाणीपट्टी भरण्यास प्रतिसाद मिळत नाही. अधिकारीवर्ग रिकाम्या हातानी परत येत आहेत. गावातील ग्रामपंचायत, लोकप्रतिनिधी यांच्यातर्फे वसुलीसाठी प्रयत्न करण्यात येत असले तरी वसुलीस प्रतिसाद मिळत नाही. प्रत्येक वर्षाला कोट्यवधी रुपयांची थकीत वीज बिलाचा प्रश्न ऐरणीवर येत असल्याने म्हैसाळ योजनेचे भवितव्य अंधःकारमय झाले आहे.

पाण्याची पातळी खालावली
सलगरे परिसरातील पाणी पातळी खालावली आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या उद्‌भवण्याची शक्‍यता आहे. सलगरे आणि चाबुकस्वारवाडी, कदमवाडी या गावांना जलस्वराज्य प्रकल्पातून काढलेल्या पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरी म्हैसाळच्या पाचव्या टप्प्यानजीक आहेत. या विहिरीतूनच या गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे. मात्र दिवसेंदिवस उन्हाळ्याची चाहूल वाढत असल्यामुळे विहिरीतील पाण्याने तळ गाठल्याने या गावातील पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्‍यता आहे.

अजून १२ कोटींची आवश्‍यकता
म्हैसाळ योजनेची आजपर्यंत वीज बिलाची थकबाकी ३७ कोटींवर गेली आहे. त्यापैकी शासनाने टंचाई निधीतून साडेपाच कोटी रुपये महावितरण विभागाकडे वर्ग केले आहे. तरी अजून १२ कोटी रुपये वीज बिल भरल्याशिवाय उन्हाळी आवर्तन सुरू होण्याची साशंकता निर्माण झाली आहे. दरम्यान म्हैसाळचे पाणी तातडीने सुरू करण्यासाठी मिरज पूर्व भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मोटारसायकल रॅली काढून लवकरात लवकर पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली.

Web Title: Sangli News Mhaisal lift irrigation Scheme issue