बनावट दुधाचा ‘फॅमिली’ बिझनेस

बनावट दुधाचा ‘फॅमिली’ बिझनेस

सांगली - बनावट दुधाद्वारे लोकांना विष पाजण्याचा काळाबाजार हा डोर्ली (ता. तासगाव) येथील बबन देशमुख याचा ‘फॅमिली’ बिझनेस असल्याची माहिती पुढे आली आहे. बबनचा भाऊ बाळासाहेब याला अन्न व औषध प्रशासनाने दोन वर्षांपूर्वी बनावट दूधप्रकरणी ८० हजारांचा दंड केला होता. लाखो रुपयांचे बनावट दूध बनवले तरी किरकोळ दंड भरून तो सुटल्याने बबनने या काळ्या धंद्याची सूत्रे हाती घेतली. आता त्याला गजाआड करून अन्नात विष कालवणाऱ्यांना प्रशासन दणका देणार का, याकडे लक्ष असेल. 

डोर्ली येथे बनावट दूध निर्मितीची विष फॅक्‍टरी अन्न विभागाने उघडकीस आणली. ‘सकाळ’ने या प्रकरणाची पोलखोल केली. ‘साम’ वाहिनीवर सकाळपासून या विषयावर हल्लाबोल केला गेला. त्यामुळे प्रकरण चांगलेच तापले आहे. राज्य पातळीवर या विषयाने पुन्हा एकदा मुलांना दूध पाजतोय की विष, असा प्रश्‍न विचारला जातोय. राज्याच्या आयुक्त पल्लवी दराडे यांनी त्याची दखल घेतली असून प्रकरणाची सखोल चौकशी करून कडक कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. वरिष्ठ अन्न सुरक्षा अधिकारी डी. एच. कोळी यांच्यासह अनिल पवार व सतीश हाक्के, तानाजी कवळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. या विभागाचे सहायक आयुक्त एस. बी. कोटगिरे यांनी या प्रकरणात कडक कारवाई केली जाईल, असे सांगितले.  

दरम्यान या प्रकरणाची पाळेमुळे शोधताना डोर्लीतील देशमुख बंधूंनी डेअरीच्या आडाने चालवलेला बनावट दूध धंदा चांगलाच फोफावत निघाल्याची माहिती समोर आली आहे. बबनच्या भावाने हा धंदा सुरू केला. त्याच्यावर कारवाई झाली होती, हेही गावात ठाऊक नव्हते. तो थंड झाल्यावर बबनने सूत्रे हातात घेतली. त्याच्या घरातून व्हाईट पावडर, सूर्यफूल तेल, मिल्क पावडर असा साठा जप्त करण्यात आला आहे. बबनने भावाकडूनच बनावट दूध निर्मितीची पद्धत शिकली होती. त्यामुळे झटपट पैसा कमावण्यासाठी त्याने बनावट दुधाचा धंदा सुरू केला. त्यातून तो लाखो रुपयांची कमाई करत होता. 

तासगाव परिसरातील दूधउत्पादक धास्तावले
तासगाव - ऐन दिवाळीच्या तोंडावर डोर्ली येथे बनावट ‘‘दूध बनविण्याचा’’ कारखाना शोधून काढल्याने उत्पादक धास्तावले आहेत. तासगावसह दूध भेसळीचा गोरखधंदा करणारे व्यावसायिक असून त्यांना शोधून त्यांच्यावर कारवाईची अपेक्षा अन्न आणि औषध प्रशासनाकडून केली जात आहे. 

काही वर्षांपूर्वी कुमठे येथेही असाच प्रकार अन्न आणि औषध प्रशासनाने उघडकीस आणला होता, त्याचे पुढे काय झाले हे गुलदस्त्याच आहे. मात्र बनावट दूध तयार करण्याचे धंदे कमी अधिक प्रमाणात सर्वत्र सुरू असल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे. दूध संकलन केंद्र सुरू केल्यानंतर सायकलवरून दूध संकलन करणारा अवघ्या काही दिवसांत दूध संकलन केंद्र चालक चारचाकी गाडीतून फिरताना दिसतो. यामागचे इंगित काय हे आता उघडकीस आले आहे.  

बनावट आणि भेसळयुक्‍त दूधच नव्हे तर दुधापासून बनविण्यात येणाऱ्या पदार्थांमध्येही ‘झोल’ करण्याचे काम काही डेअऱ्यामध्ये सुरू आहे. तासगाव येथील एका डेअरीबाबत अन्न आणि औषध प्रशासनाकडे याबाबत अनेकदा तक्रारी करूनही याची दखल घेतली जात नाही. 

दुग्धजन्य पदार्थ बनविण्यासाठी साधे स्वच्छतेचे नियमही पाळले जात नाहीत. एका डेअरीला तर नावच नाही पण तेथे दूध आणि दूधपासूनचे सर्व पदार्थ पॅकबंद मिळतात. बासुंदी, खवा यासारखे पदार्थ बनविताना त्यामध्ये काय मिसळले जाते हे शेवटपर्यंत ग्राहकाला समजत नाही. विशेष म्हणजे हे वर्षानुवर्षे बिनदिक्‍कतपणे सुरू आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने याकडेही लक्ष द्यावे अशा अपेक्षा नागरिकांमधून व्यक्‍त होत आहेत.

‘चेक नाका’ काय कामाचा?
बबन देशमुख ज्या दूध डेअरीकडे दूध घालत होता, तेथे बनावटगिरी तपासणी केलीच जात नाही. हे दूध केंद्र त्या भागात सुपरिचित आहे. त्यामुळे बबनचे फावले. त्याचे पाचशे लिटर बनावट दूध पंधरा हजार लिटरच्या टॅंकरमध्ये मिसळल्याननंतर त्यातील बनावटगिरी शोधता येत नाही. त्यामुळे बबनच्या या काळ्या धंद्यात आणखी कुणी सहभागी होते का, याचा तपास आता महत्त्वाचा ठरणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com