दुधाचे ग्रहण सुटता सुटेना

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 जून 2018

शेतीपूरक व्यवसायाचे एक साधन दुग्ध व्यवसायावरील ग्रहण सुटता सुटेना अशी स्थिती आहे. दहा महिन्यांपासून दूध दर घसरण ऐन उन्हाळ्यातही थांबलेली नाही. घटत्या दराच्या फटक्‍याने शेतकरी हतबल झाला. प्रतिलिटर २७ रुपये दर कागदावरच आहे. प्रत्यक्षात १८-२० रुपये दरावर बोळवण केली जातेय. उत्पन्न व चारा, खाद्याचा  मेळ जमवणे अवघड बनले आहे. आज (१ जून) जागतिक दूध दिन आहे. त्यानिमित्त...

शेतीला जोड व्यवसाय म्हणून शेतकरी, शेतमजूर दुग्धोत्पादनासाठी पशुपालन करतात. महागाई वाढली. मात्र त्यामानाने दुधाचे दर कमी होताहेत. गतवर्षी शेतकरी संपावेळी दुधाला किमान २७ रुपये दराच्या घोषणेचा सरकारला विसर पडला. 

सध्या दुधाला १८-१० रुपये मिळतात. सरकारने दखल घेतली  नाही, तर शेतकरी देशोधडीला लागेल. व्यवसायाने शेतकऱ्यांना तारले. त्यांनी घरे उभारली. तेच सध्या व्यवसायामुळे कोलमडत आहेत. शेतमाल हमीदराप्रमाणे दुधाचाही विचार करावा. सध्या  दूध धंदा करावा, की नको असा विचार करताहेत. बाजारात जनावरांचे दरही पडलेत.

व्यवसायाचे व्यवस्थापन, चारा नियोजन, विजेचा हिशेब केल्यास सध्याचा दर घाट्याचाच आहे. दूध दरवाढीची चिन्हे  अजून नाहीत. उत्पादन खर्च निघत नाही. जत, आटपाडी, कवठेमहांकाळ दुष्काळी तालुक्‍यांत शेतकऱ्यांनी कष्टाने पशुपालन केले. पाणी, चाऱ्यांची उपलब्धता झाल्यास दुग्धव्यवसाय वाढीला वाव आहे. 

मी रोजगार मिळवण्यासाठी दूध व्यवसाय सुरू केला. माझ्याकडील पाचपैकी चार जनावरे दुभती आहेत. सध्याच्या दराप्रमाणे पाचशे चाळीस रुपये होतात.  जनावरे, चारा, खुराकावर पाचशेपेक्षा जास्त खर्च होतो. मजुरी, कष्ट तर मातीमोलच होतेय.
- रवींद्र शिंदे,
कांचनपूर. 

संघांसमोर अतिरिक्त दुधाची समस्या आहे. खासगी व्यावसायिक दर तातडीने कमी करतात. सरकारचे फार नियंत्रण नाही. सांगलीच नव्हे तर दूध मुख्य व्यवसाय बनलेल्या बहुतांश जिल्ह्यांच्या अर्थकारणावर परिणाम झाला आहे. प्रभावी उपाय एकच काढावा लागेल, तो म्हणजे दुधाचे ग्राहक वाढले पाहिजेत. 
- विनायकराव पाटील,
माजी अध्यक्ष, ‘महानंदा’

जिल्ह्यातील दूध संघ
राजारामबापू, वसंतदादा, फत्तेसिंगराव नाईक, चितळे, शेतकरी, डोंगराई, हुतात्मा, हणमंतराव पाटील, यशवंत, शिराळा, सोनहिरा, थोटे, विटा  

Web Title: Sangli News milk purchase issue