मोरणा जलाशयाच्या प्रदुषणास जबाबदार व्यक्तीवर व्हावी कारवाई - मानसिंगराव नाईक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 मार्च 2018

शिराळा - शिराळा शहरासाठी मोरणा धरणाच्या जलाशयातून पाणीपुरवठा केला जातो. हे पाणी काही दिवसांपासून दूषित झाले आहे. आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. धरणात येणारे पाणी कशामुळे दूषित होते त्याची उकल करून दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी केली. 

शिराळा - शिराळा शहरासाठी मोरणा धरणाच्या जलाशयातून पाणीपुरवठा केला जातो. हे पाणी काही दिवसांपासून दूषित झाले आहे. आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. धरणात येणारे पाणी कशामुळे दूषित होते त्याची उकल करून दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी केली. 

जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालणे गरजेचे आहे. शिराळकरांचे आरोग्य धोक्‍यात येणार नाही, याची  खबरदारी घ्यावी. ठोस कार्यवाही व कारणमीमांसा न झाल्यास नाईलाजाने आंदोलनाचा मार्ग अवलंबावा  लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. 

शिराळा शहरानजीक मोरणा धरणातील पाण्याची प्रत्यक्ष पाहणी माजी आमदार नाईक यांनी केली. नगराध्यक्षा सुनंदा सोनटक्के, उपनगराध्यक्ष कीर्तीकुमार पाटील, माजी सरपंच देवेंद्र पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजयराव नलवडे, नगरसेवक विश्वप्रतापसिंग नाईक यांची उपस्थिती होती.

श्री. नाईक म्हणाले, ‘‘काही दिवसांपासून अशुद्ध व दूषित पाणीपुरवठा सुरू आहे. नागरिकांच्या तक्रारीही येत आहेत. आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. रुग्णसंख्येत वाढ होत आहे. जलाशयातील पाणी दूषित होते? याचा शोध घेतला पाहिजे. जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी व तहसीलदारांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करावी. चौकशी करून उपाययोजना करावी. 
तातडीने उपाययोजना न झाल्यास सर्व नगरसेवक उपोषण करतील.’’ 

नगराध्यक्ष सोनटक्के म्हणाल्या, ‘‘जलाशयाची पाहणी करावी यासाठी जिल्हाधिकारी विजय काळम यांची भेट घेऊन माहिती दिली आहे.  नगरसेवक संजय हिरवडेकर, गौतम पोटे, प्रतिभा पवार, सुजाता इंगवले, बसवेश्वर शेटे, राजेंद्र निकम, आदींसह नागरिक उपस्थित होते.

दूषित पाणी पुरवठ्याबद्दल आंदोलन करू - नाईक 
शिराळा शहराला काही दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सत्ताधारींनी गांधारीची भूमिका घेतली आहे. मुख्याधिकारी व संबंधित विभागाने योग्य ती पावले उचलावीत; अन्यथा दूषित पाणी प्रश्नाबाबत कार्यकर्त्यांसमवेत नगरपंचायतीसमोर तीव्र आंदोलन करणार आहे, असे निवेदन भाजपचे गटनेते अभिजितसिंह नाईक यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिले आहे. त्यांनी म्हटले आहे, अनेक वर्षांपासून सत्ताधारींकडून पाणी शुद्धीकरण जलकुंभातील वाळू बदललेली नाही. पाणी शुद्धीकरण यंत्रणेबाबत योग्य ती खबरदारी घेतली नाही.  सत्ताधाऱ्यांचा नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. तातडीने कार्यवाही न झाल्यास नगरपंचायतीसमोर तीव्र आंदोलन करणार आहे.

Web Title: Sangli News Morna Dam water pollution issue