लोक मोदींना कंटाळल्याने शिवसेनाच सक्षम पर्याय - खासदार कितीकर

संतोष भिसे
सोमवार, 30 एप्रिल 2018

मिरज - मोदींना आणि कमळाला लोक कंटाळले आहेत; आगामी निवडणुकीत त्यांना जवळ करणार नाहीत, अशी स्पष्टोक्ती शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर यांनी केली.

मिरज - मोदींना आणि कमळाला लोक कंटाळले आहेत; आगामी निवडणुकीत त्यांना जवळ करणार नाहीत, अशी स्पष्टोक्ती शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर यांनी केली. केंद्रात आणि राज्यात आम्हाला कोणाच्याही मदतीची गरज नाही; स्वबळावर सत्ता हवी आहे, असेही ते म्हणाले.

येथील बालगंधर्व नाट्यगृहात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. उपनेते नितीन- बानुगडे पाटील, जिल्हा संघटक संजय विभुते, आनंदराव पवार उपस्थित होते. 

गेल्या 15 एप्रिल रोजी सांगलीतील मेळाव्यात अत्यल्प संख्येने कार्यकर्ते पाहून भडकलेल्या खासदार किर्तीकर यांनी दोन्ही जिल्हा संघटकांच्या हकालपट्टीची भाषा केली होती. पंधरा दिवसांत दुसरा मेळावा घेऊन यशस्वी करुन दाखवण्याचे आवाहन केले होते; ते सार्थ ठरवत आज शिवसेना कार्यकर्त्यांनी बालगंधर्व नाट्यगृह भरुन गेले.

त्याचे कौतुक करत किर्तीकर म्हणाले, कोणाच्याही हकालपट्टीचा किंवा स्विकार करण्याचा अधिकार मला नाही; तो फक्त कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनाच आहे.

आजच्या गर्दीने प्रामाणिपणे काम केले तर महापालिकेवर भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. शिवसेनेला राज्यात स्वबळावर सत्ता हवी आहे. त्यासाठी राज्यभरातील 288 मतदारसंघांत बुथबांधणीचे काम दोन महिन्यांत पुर्ण होईल. सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांतील सव्वीस जागांची जबाबदारी माझ्यावर आहे.

सध्या या ठिकाणी आठ आमदार आहेत; येत्या विधानसभेत त्याचे सोळा करायचे आहेत.

विधानसभा मतदारसंघासाठी संपर्क नेत्यांची नियुक्ती -

  • सांगली - राम सावंत,
  • मिरज -  दत्तात्रय माने
  • पलुस - ज्ञानेश्‍वर कवाळे
  • इस्लामपुर - मंगेश शिंदे
  • खानापुर -अशोक साळवे
  • शिराळा -  आनंद भेडले  

श्री. किर्तीकर म्हणाले, मिरजेत गतवेळी थोडक्‍यात अपयश आले; पुढचा आमदार सेनेचा असेल. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची अंतर्गत रचना बदलली आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघावर बारकाईने लक्ष आहे. मोदींना कंटाळलेल्या लोकांपुढे शिवसेनेचा ताकदवान पर्याय आहे; पक्षाला ताकद देण्याचे काम तुम्ही कार्यकर्तेच करणार आहात. गतवेळचे सांगलीचे आकडे चांगले नाहीत; पण यावेळी प्रयत्न करु. 

मिरज पॅटर्न शहराच्या विकासासाठी असेल असे वाटले होते; पण तो स्वतःच्याच कल्याणासाठी असल्याचे स्पष्ट झाले आहे. ऐतिहासीक मिरज शहराचा विकास होऊ शकला नाही. मिरजेला सर्वाधिक पदे मिळूनही कामे झाली नाहीत. हा शिक्का पुसायची संधी निवडणुकीने दिली आहे.

- नितीन- बानुगडे पाटील, उपनेते

सध्याच्या भाजप सरकारने कोठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा असे म्हणायची वेळ आणली आहे. शिवसेनेने फक्त विकासासाठीच सोबत दिली. एकाही नेत्यावर भ्रष्टाचाराचा डाग नाही. पक्षाचे हिंदुत्व राष्ट्रीय हितासाठीचे आहे. जातपात न मानणारा एकमेव पक्ष आहे. अनेक पदाधिकारी मुस्लिम आहेत. या ताकदीवरच आगामी विधानसभेत भगवा झेंडा स्बबळावर फडकेल. मुख्यमंत्री सेनेचा असेल., असेही बानुगडे पाटील म्हणाले.  

शहर प्रमुख चंद्रकांत मैगुरे, विशालसिंग रजपुत, शेखर्‌ माने, रावसाहेब घेवारे, तानाजी सातपुते, शंभुराज काटकर, संजय काटे, दिगंबर जाधव, सुनिता मोरे, पप्पू शिंदे, गजानन मोरे, अमोल पाटील, प्रदीप कांबळे, बजरंग पाटील, महादेव मगदुम आदी उपस्थित होते 

उमेदवार लादणार नाही
बानुगडे-पाटील म्हणाले, महापालिका निवडणुकीसाठी उमेदवार लादणार नाही. प्रत्येक प्रभागासाठी समिती नेमू; त्यांच्या अहवालानुसार उमेदवारी दिली जाईल. 

चंद्रकांत पाटील गप्प का ?
किर्तीकर म्हणाले, चंद्रकांत पाटील यांना मी काल उत्तर दिले आहे. माझ्या प्रश्‍नावर ते गप्प का राहतात ? मी एवढे बोलूनही उत्तर का देत नाहीत ?

Web Title: Sangli News MP Gajanan Kirtikar comment