सांगलीवाडीतील बेपत्ता व्यक्तीचा खून झाल्याचे स्पष्ट

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 मार्च 2018

सांगली - सांगलीवाडीतून बेपत्ता झालेले सुरेश संगाप्पा सुतार (वय 48, रा. वाटेगावकर प्लॉट) यांचा खून झाल्याचे आज रविवारी सकाळी उघडकीस आले. 

सांगली - सांगलीवाडीतून बेपत्ता झालेले सुरेश संगाप्पा सुतार (वय 48, रा. वाटेगावकर प्लॉट) यांचा खून झाल्याचे आज रविवारी सकाळी उघडकीस आले. 

सुतार यांचा मृतदेह कर्नाटक पोलिसांना विजापूर रोडला बुधवारी (ता. 14) मिळाला. शवविच्छेदन करून पोलीसांनी मृतदेह अद्याप तसाच ठेवला आहे. सांगलीवाडीत विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमात उत्साहाने सहभागी होणारे सुरेश सुतार यांचा अचानक बेपत्ता होणे आणि त्यानंतर खून झाल्याचे उघड होणे या घटनेमुळे सांगलीवाडीत खळबळ उडाली. 

याबाबत अधिक माहिती अशी, सुरेश सुतार सांगलीवाडीतील घरातून 13 मार्चला दुपारी बेपत्ता झाले होते. मात्र परत आले नाहीत. घरातून बाहेर पडण्यापूर्वी कोणाचा तरी फोन आला होता व काम होत असेल तर मी लगेच येतो असे ते म्हणाल्याचे घरातील नातलगांनी सांगितले. त्यांच्या नातेवाईकांनी तसेच परिसरातील तरूणांनी शोध घेतला मात्र पत्ता लागला नाही. त्यानंतर शुक्रवारी (ता. 16) सायंकाळी त्यांच्या नातेवाईकांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दाखल केली.

शहर पोलीस तपास करण्यास वेळ लावत असल्याने नातेवाईकांनी अप्पर पोलीस अधिक्षक शशिकांत बोराडे यांची भेट घेतली. त्यानंतर तपासाला गती आली. दरम्यान सुरेशचे नातेवाईक व मित्र शोध घेतच होते. 

सुरेश यांच्या बेपत्ता होण्यामागे ज्यांच्याबद्दल नातेवाईकांना संशय होता त्या "चांद' नामक व्यक्तीस नातेवाईकांनी शोधून शहर पोलिसांच्या ताब्यात दिले होते. मात्र पुरावा नसल्याचे सांगत शहर पोलीसांनी त्याला सोडून दिले.

दरम्यान, सुरेश सुतार यांचा कर्नाटकातील विजापूर रोडवर खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांचा मृतदेह कर्नाटक पोलिसांना ता. 14 रोजी मिळाला होता. मात्र नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी त्यांनी शवविच्छेदन करुन मृतदेह ठेवला होता. त्यानंतर सांगली पोलिसांकडून बेपत्ता व्यक्तीची माहिती जुळल्यामुळे ती व्यक्ती सुरेश सुतार असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे सुतार यांचा खून झाल्याचे उघड झाल्यावर खळबळ उडाली. 

Web Title: Sangli News Murder in Sangliwadi