अन्यायकारक करवाढीविरोधात इस्लामपूरात राष्ट्रवादीचे आंदोलन

धर्मवीर पाटील
सोमवार, 19 मार्च 2018

इस्लामपूर - सत्ताधारी फक्त फोटोसेशन करणारे आहेत, यांच्याकडून विकास होणार नाही. आपणाला नाईलाजास्तव ही पाच वर्षे सोसावी लागणार आहेत, अशी नाराजी व्यक्त करत हिम्मत असल्यास त्यांनी सत्तेतून अनुदान आणावे, असे आव्हान माजी नगराध्यक्ष विजय पाटील यांनी आज येथे दिले.

इस्लामपूर - सत्ताधारी फक्त फोटोसेशन करणारे आहेत, यांच्याकडून विकास होणार नाही. आपणाला नाईलाजास्तव ही पाच वर्षे सोसावी लागणार आहेत, अशी नाराजी व्यक्त करत हिम्मत असल्यास त्यांनी सत्तेतून अनुदान आणावे, असे आव्हान माजी नगराध्यक्ष विजय पाटील यांनी आज येथे दिले.

शहरातील नव्या मालमत्ताधारकांना १०० टक्के कर भरून अपील करण्याच्या निर्णयाचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आज पालिकेच्या आवारात लाक्षणिक उपोषण केले. त्यावेळी ते बोलत होते. अन्यायकारक करवाढीचा धिक्कार असो, फेकुगिरी करणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा निषेध असो, सत्ताधारी हुकूमशाहीचा निषेध असो, मालमत्ता धारकांना न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

श्री. पाटील म्हणाले, "दीड वर्षात विशेष अनुदानाचा रुपया आला असेलतर गाव सोडतो. फक्त फोटोसेशन सुरू आहे. सत्ता त्यांचीच आहे तर अनुदान आणावे, जनतेवर बोजा कशासाठी? जयंत पाटील स्वतः लक्ष घालून अनुदान आणत होते. त्यातून कोट्यवधी रुपयांची कामे केलीत. फक्त फोटो काढणारे मिळालेत, त्यामुळे नाईलाज आहे. आपणाला हे ५ वर्षे सोसावे लागेल."

नागरिकांत असंतोष आहे. जनतेने विश्वासाने नगराध्यक्षपद दिले पण त्यांनी विश्वासघात केला आहे. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर त्यांना खुर्च्या काढून घेऊन पालिकेचा ताबा घेऊ."

- विजय पाटील, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी

फेकू नगराध्यक्षांचा मनमानी कारभार

शहाजी पाटील म्हणाले, "नगराध्यक्ष खोटे बोलत आहेत. निवडणुकीत साठेनगरात गेल्यावर वाढीव घरपट्टी कमी करण्याचे आश्वासन देऊन मत मागितले आणि आज ही बाब प्रशासनाचा भाग असल्याचे सांगत आहेत. फेकू नगराध्यक्षांचा मनमानी कारभार सुरु आहे."

नागरिकांवर अन्याय होणार नाही. कायद्यातील तरतुदींचा आधार घेऊन वसुली होईल. अपील समितीची भूमिका निर्णायक असेल. त्यानुसार अंमलबजावणी होईल.
- दीपक झिंजाड,
 मुख्याधिकारी

खंडेराव जाधव म्हणाले, "अनुदान नाही, निधी नाही त्यामुळे शहरात विकासकामे ठप्प आहेत. कर वसूल करा मग विकास करा अशी वेळ गेल्या तीस वर्षात आमच्यावर आली नाही. आमदार जयंत पाटील यांनी नेहमी साथ दिली. भाजपने घोषणा केल्या पण निधी दिला नाही. केवळ घोषणा आणि लबाडी सुरू आहे. नागरिकांना शंभर टक्के रक्कम भरावी लागणे दुर्दैवी ठरेल."

चिमन डांगे म्हणाले, "दिलेली आश्वासने न पाळल्याने आमच्यावर आंदोलनाची वेळ आली आहे. प्रशासनाला दोष देऊन सत्ताधाऱ्यांनी जबाबदारी झटकू नये."

सध्या सत्तेत असलेल्यांनी मागे एकदा आवाहन करून कराची रक्कम भरू दिली नाही. आता त्यांची केंद्रात, राज्यात आणि पालिकेत सत्ता आहे. हिम्मत असेल तर 'त्या' १२५० लोकांना त्यांनी अपिलात सवलत देऊन दाखवावी, असे आव्हान आनंदराव मलगुंडे यांनी दिले.

माजी नगराध्यक्ष अरुणादेवी पाटील, रोझा किणीकर, कमल पाटील, विशाल सूर्यवंशी, संग्राम पाटील, विलास भिंगार्डे, अलका शहा, पुष्पलता खरात, उषा मोरे, भूषण शहा, शंकर चव्हाण, सुश्मिता जाधव यांची भाषणे झाली. उपनगराध्यक्ष दादासो पाटील, सुभाष सूर्यवंशी, भगवानराव पाटील, सदानंद पाटील, नगरसेवक बकस मुल्ला, जयश्री पाटील, संगीता कांबळे, जयश्री माळी, सविता आवटे, सचिन कोळी, जुबेर खाटीक, सुनीता सपकाळ आदी उपोषणात सहभागी झाले.

 

Web Title: Sangli News NCP agitation against hike in tax In Islampur