जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाला अस्वच्छतेचा विळखा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

सांगली - मिरज रोडवरील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचं मोठं स्वागत झालं. प्रशस्त इमारत जिल्ह्यातील एक देखणी इमारत म्हणून ओळखली जाऊ लागली. मात्र त्याचवेळी १०८ वर्षे ज्या इमारतीनं जिल्ह्याचा महसुली कारभार पाहिला, ती इमारत आज केवळ दोनच महिन्यांत दुर्लक्षित झाली. आता ती अस्वच्छतेच्या विळख्यात सापडली आहे. अनेक आंदोलनं, जल्लोष, महत्त्वाच्या बैठका पाहिलेल्या या इमारतीकडे आता कुणाचंच लक्ष नाही.

सांगली - मिरज रोडवरील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचं मोठं स्वागत झालं. प्रशस्त इमारत जिल्ह्यातील एक देखणी इमारत म्हणून ओळखली जाऊ लागली. मात्र त्याचवेळी १०८ वर्षे ज्या इमारतीनं जिल्ह्याचा महसुली कारभार पाहिला, ती इमारत आज केवळ दोनच महिन्यांत दुर्लक्षित झाली. आता ती अस्वच्छतेच्या विळख्यात सापडली आहे. अनेक आंदोलनं, जल्लोष, महत्त्वाच्या बैठका पाहिलेल्या या इमारतीकडे आता कुणाचंच लक्ष नाही.

सांगलीच्या राजवाड्यातील महसूल विभागाची इमारत आजही त्यावर १९०९ मध्ये असलेला आकडा आणि त्यावर रेव्हेन्यू बिल्डिंग असं लिहिलेलं दिसतं. पण आता तेथे केवळ गेल्या शंभर वर्षांतील कारभाराच्या स्मृतीच बाकी आहेत. या इमारतीत ब्रिटिश काळातील महसुली व्यवहार चालत होता. स्वातंत्र्यानंतरही हीच इमारत जिल्ह्याची मुख्य महसुली इमारत झाली. जिल्ह्याच्या स्थापनेपासून या इमारतीत जिल्हाधिकारी कार्यालय होते. सांगलीच्या भुईकोट किल्ल्याचा हा भाग असणारी ही दगडी इमारत आजही खणखणीत आहे. जिल्ह्याची प्रमुख महसुली कार्यालये, जिल्हाधिकारी, प्रमुख विभागांचे उपजिल्हाधिकाऱ्यांची कार्यालये येथे होती.

अनेक आंदोलने पाहिली
जिल्ह्यातील कोणतीही आंदोलने, मोर्चे, उपोषण याच इमारतीसमोर व्हायची. अनेक मोठे मोर्चे, आंदोलने या इमारतीने पाहिली आहेत. काही वर्षांपूर्वीच अल्पबचत भवनचे नूतनीकरणही झाले. जिल्ह्यातील दुष्काळात झालेली आंदोलने आणि महापुराचीही ही इमारत साक्षीदार आहे. मात्र आज या इमारतीला कुणी वाली नाही, अशी अवस्था आहे. आज या इमारतीकडे कुणी फिरकतही नाही.

इमारतीत अस्वच्छता
या इमारतीमधून सर्व कार्यालयांचे स्थलांतर झाले. आता तेथे काही खोल्यांत कपाटे मोडलेल्या अवस्थेत आहेत. तर पहिल्या मजल्यावर व्हरांड्यात कचरा झाला आहे. काही खोल्यांत फायली, कागद विखरून पडले आहेत. इमारतीत अस्वच्छता अनेक ठिकाणी दिसून येते. गेल्या दोन महिन्यांत तेथे स्वच्छता झाली नसल्याचे जाणवते.

वायफायचा फायदा कुणाला?
दोन वर्षांपूर्वी येथे नागरिकांसाठी वायफाय सेवा सुरू करण्यात आली. ही सेवा आजही कार्यालयाचे स्थलांतर झाल्यानंतरही सुरू आहे. त्यामुळे येथे अनेक तरुण, विद्यार्थ्यांचे टोळके वायफायचा लाभ घेताना कट्ट्यावर बसलेले दिसतात. कार्यालय बंद झाल्यानंतर वायफाय सुविधाही बंद करणे आवश्‍यक होते. पण ती बहुतेक नागरिकांच्या सोयीसाठी सुरू ठेवली असावी, असे वाटते.

नव्या कार्यालयांचे काय झाले?
जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व कार्यालयांचे स्थलांतर झाल्यानंतर ही इमारत इतर शासकीय कार्यालयांना देण्याबाबत चर्चा झाली आहे. काही कार्यालयांना जागा ठरवूनही दिल्या आहेत; मात्र अद्याप ही कार्यालये या इमारतीत आणण्यात आली नाहीत. भाड्याच्या जागेतील शासकीय कार्यालये या इमारतीमध्ये आणण्याचा प्रयत्न आहे. परंतु ती स्थलांतरित न झाल्याने जुनी इमारत धूळ खात पडून आहे.

Web Title: sangli news old collector office uncleaned