माधवनगर पुलावर मोटारीची दुचाकी धडक, माजी कॅप्टन ठार

बलराज पवार
मंगळवार, 5 जून 2018

सांगली - माधवनगर रेल्वे पुलावर आज सकाळी नऊच्या सुमारास एका भरधाव वेगात जाणाऱ्या मोटारीची दुचाकीला धडक बसली. या अपघातामध्ये एकजण ठार झाला तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. सैन्यातून निवृत्त झालेले माजी कॅप्टन ज्ञानेश्वर लक्ष्मण पाटील (वय 67, रा. सांगलीवाडी) असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर सुरेश तातोबा कांबळे (वय 55, रा. कवठेपिरान, ता. मिरज) हे गंभीर जखमी झाले आहेत.

सांगली - माधवनगर रेल्वे पुलावर आज सकाळी नऊच्या सुमारास एका भरधाव वेगात जाणाऱ्या मोटारीची दुचाकीला धडक बसली. या अपघातामध्ये एकजण ठार झाला तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. सैन्यातून निवृत्त झालेले माजी कॅप्टन ज्ञानेश्वर लक्ष्मण पाटील (वय 67, रा. सांगलीवाडी) असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर सुरेश तातोबा कांबळे (वय 55, रा. कवठेपिरान, ता. मिरज) हे गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी मोटारीचा चालक धीरज वसंत धनवडे (वय 21, रा. राजर्षी शाहू कॉलनी, कसबा बावडा, कोल्हापूर) याला ताब्यात घेतले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, ज्ञानेश्वर पाटील हे गणपती पंचायतन ट्रस्टचे सुरक्षा रक्षक प्रमुख म्हणून काही वर्षे काम करत होते. तत्पुर्वी ते सैन्यातून 20 वर्षापुर्वी कॅप्टन पदावरुन निवृत्त झाले होते. ते सांगलीवाडीत रहात होते. आज सकाळी कवठेपिरान येथील सुरेश कांबळे यांच्यासह एका दुचाकीवरुन (क्र. एमएच 10 टी 6681) माधवनगरच्या दिशेने निघाले होते.

कांबळे हे दुचाकी चालवत होते. सांगली-माधवनगर रस्त्यावरील चिंतामणनगरच्या रेल्वे पुलावर ते आले असताना समोरुन भरधाव वेगातील चारचाकी मोटारीची (क्र. एमएच 09 ईयु 1438) त्यांना धडक बसली. पुलावर वेगात आलेल्या या मोटारीने दुचाकीला समोरुन जोरदार धडक दिली. ही
धडक इतकी भीषण होती की मागे बसलेले ज्ञानेश्‍वर पाटील जागीच ठार झाले. तर सुरेश कांबळे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डोक्‍याला जोराचा मार बसल्याने आणि अतिरक्तस्त्राव झाल्याने पाटील यांचा मृत्यू झाला.

गर्दीच्या वेळी झालेल्या अपघातामुळे घटनास्थळी मोठी गर्दी झाली. दोन्ही बाजूंची वाहतूक बराच काळ विस्कळीत झाली होती. जोरदार धडकेमुळे दुचाकीचा चक्काचूर झाला होता. अपघाताचे दृश्‍य हृदय पिळवटून टाकणारे होते. अपघाताचे वृत्त समजताच घटनास्थळी सांगली शहर, विश्रामबाग आणि संजयनगर पोलिसांनी धाव घेतली. पोलिसांनी चारचाकी मोटार आणि चालक धीरज धनवडे याला ताब्यात घेतले.

मोटर गतीरोधकावर आदळून उडाली
कवलापूर येथील दंत महाविद्यालयात धीरज धनवडेची बहीण शिकत आहे. तिला कॉलेजला सोडण्यासाठी तो आला होता. तिला सोडून तो सांगलीच्या दिशेने येत होता. त्याचे नियंत्रण सुटल्याने गाडी पुलाजवळच्या गतीरोधकावर आदळली आणि काही फूट उडाली. त्याच वेगात गाडीने समोरुन आलेल्या दुचाकीला जोरात धडक दिली.

Web Title: Sangli News one dead in an accident in Mahadvnagar Bridge