पलूस-कडेगाव मतदारसंघाची पोटनिवडणूक २८ मे रोजी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

सांगली - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार पतंगराव कदम यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक आज जाहीर झाली. येत्या २८ मे रोजी मतदान, तर ता. ३१ ला मतमोजणी आहे. कडेगावचे प्रांत डॉ. विजय देशमुख निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. आचारसंहिता संपूर्ण जिल्ह्यात लागू झाली आहे. 

येथून सन २०१४ च्या निवडणुकीत पतंगराव कदम विजयी झाले होते. त्यांचे गेल्या महिन्यात निधन झाले. रिक्त जागेसाठी निवडणूक होईल. १० जानेवारी २०१८ रोजी जाहीर मतदार यादीनुसार येथे एकूण २ लाख ६५ हजार ३०१ मतदार आहेत. त्यात १ लाख ३५ हजार ६६३ पुरुष, १ लाख २९ हजार ६३५ महिला आहेत. इतर तीन मतदार आहेत. ५८७ सैनिकही आहेत.

पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून पतंगराव कदम यांचे चिरंजीव, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्‍वजित यांची उमेदवारी निश्‍चित मानली जाते. गेल्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी स्वतंत्र लढली असली तरी येथून राष्ट्रवादी लढणार नाही, हे जवळपास स्पष्ट आहे. भाजप काय भूमिका घेणार, याकडेच लक्ष असेल. भाजपचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख गेल्या निवडणुकीत लढले.

या वेळीही ते इच्छुक असतील. बदलत्या समीकरणांत त्यांचे चुलतबंधू, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुखही चर्चेत आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत नव्या आखणीचा विचार होऊ शकेल; मात्र पोटनिवडणुकीत भाजप काँग्रेसला पुढे चाल देईल, असे संकेत आहेत. या संदर्भात जिल्हास्तरीय बैठकीत कार्यकर्त्यांची मते जाणून घेऊ. तो अहवाल प्रदेशला पाठविण्यात येईल. त्याआधारे निर्णय होईल, असे भाजपतर्फे सांगण्यात आले.

Web Title: Sangli news Palus-Kadegaon constituency byelection