सांगली जिल्ह्यात सहा पेट्रोल पंपांवर इंधन गैरव्यवहार

अजित झळके
सोमवार, 7 ऑगस्ट 2017

सांगली जिल्ह्यात सहा पंपांवर इंधन गैरव्यवहार असून प्रतिलिटरमागे किमान 50 पैशांचा गाळा मारला जात होता, हे स्पष्ट झाले आहे.

सांगली : राज्यातील 95 पेट्रोल पंपांवर इंधन गैरव्यवहार झाल्याची माहिती ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने गेल्या महिनाभरात टाकलेल्या छाप्यातून समोर आली आहे. पेट्रोल यंत्रातील मदर बोर्डमध्ये तांत्रिक बदल करून प्रत्येक 5 लिटर इंधनामागे किमान 30 मिली ते 200 मिलीपर्यंतचा घोळ केला आहे. त्यात सांगली जिल्ह्यातील सहा पेट्रोल पंपांचा समावेश आहे.

25 हजार लिटर पेट्रोलच्या एका टॅंकरमागे किमान 12 हजार 500 रुपये ते 75 हजार रुपयांचा हा गैरव्यवहार आहे. एका पंपावर सरासरी पाच ते सहा दिवसांत एक टॅंकर इंधनाची खपत होते. राज्यातील 95 पंपांवरील एकत्रित गैरव्यवहाराची रक्कम महिन्याकाठी काही कोटींमध्ये जाते. सांगली जिल्ह्यात सहा पंपांवर इंधन गैरव्यवहार असून प्रतिलिटरमागे किमान 50 पैशांचा गाळा मारला जात होता, हे स्पष्ट झाले आहे. प्रति 5 लिटरमागे 200 मिलीचा घोळ झाला, तेथे लिटरमागे 3 रुपयांची लूट सुरू होती.

या गोष्टी अनवधानाने नव्हे तर जाणीवपूर्वक केल्या गेल्या होत्या. 95 पंपांवरील यंत्रामध्ये छेडछाड केली होती. यावर पोलिसांच्या तपासात शिक्कामोर्तब झाले आहे.
ठाण्यातील गुन्हे अन्वेषण विभागाने अभियांत्रिकी शिक्षण घेतलेल्या तरुणांच्या एका टोळीला गेल्या महिन्यात अटक केली होती. त्यांनी अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर यंत्रात तांत्रिक बदल करून इंधन गैरव्यवहाराला मदत केल्याची कबुली दिली होती. त्याआधारे पोलिसांनी राज्यभर छापे टाकले. या काळात 170 पेट्रोल पंपांची तपासणी केली.

Web Title: sangli news petrol pump scam