खाकी वर्दीचा सांगली जिल्ह्यात धाक संपला!

बलराज पवार
शुक्रवार, 2 मार्च 2018

विशेष पथकाचे काम काय ?
मटका, जुगार आणि दारू अड्डे यावर कारवाईसाठी  पोलिस अधीक्षकांनी विशेष पथक नेमले आहे. शहर आणि जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर हे पथक कारवाई  करते. तेथे छापे घालते, मुद्देमाल, रोकड हस्तगत करते. मुळात हे गुन्हे जामीनपात्र आहेत. मग यासाठी विशेष पथकाची गरज काय ? शिवाय असे पथक गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी का कामाला लावत नाहीत ? असे अनेक प्रश्‍न खाकी वर्दीबाबत शंका निर्माण उत्पन्न करत आहे.

सांगली - शहरात गेल्या आठवड्याभरात घटनांवर नजर टाकली तर शहरात वाटमाऱ्यांचे प्रकार वाढल्याचे दिसते. संजयनगर परिसरासह, शंभर फुटी कोल्हापूर रोड, हरिपूर रोड, स्टॅंड परिसर, त्रिमूर्ती टॉकीजजवळ, मौजे डिग्रज फाटा आणि माधवनगर रोडवरील पश्‍चिम महाराष्ट्र पत्रा डेपो जवळ, मिरज  रोडवर, काळ्याखणीजवळ या सर्व ठिकाणी चाकूचा धाक दाखवून लुटण्याचे प्रकार घडले.

या ठिकाणी रात्रीच्या वेळेस चाकूचा धाक दाखवून लुटण्याचे प्रकार घडलेत. त्यांची नोंद पोलिस ठाण्यात झाली असली तरी त्यांचा  छडा लागलेला नाही. त्यातच काल सायंकाळी भर गर्दीवेळी झालेल्या खुनाने खाकी वर्दीचा धाक संपल्याचेच दिसते.

विशेष पथकाचे काम काय ?
मटका, जुगार आणि दारू अड्डे यावर कारवाईसाठी  पोलिस अधीक्षकांनी विशेष पथक नेमले आहे. शहर आणि जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर हे पथक कारवाई  करते. तेथे छापे घालते, मुद्देमाल, रोकड हस्तगत करते. मुळात हे गुन्हे जामीनपात्र आहेत. मग यासाठी विशेष पथकाची गरज काय ? शिवाय असे पथक गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी का कामाला लावत नाहीत ? असे अनेक प्रश्‍न खाकी वर्दीबाबत शंका निर्माण उत्पन्न करत आहे.

अनिकेत कोथळे प्रकरणात बदनामी झाल्यानंतर पोलिस जोमाने कामाला लागतील अशी अपेक्षा होती. कोरेगाव भीमा दंगलीच्या पार्श्‍वभूमीवर संवेदनशील सांगलीत उमटू पाहणारे पडसाद पोलिसांनी कुशलतेने रोखले. तीन गुंडांच्या टोळ्यांना मोका लावला. मटका टोळ्यांवर हद्दपारीची कारवाई केली. अनेकांना तडीपार करून जिल्हा कारागृहात पाठवले. तरीही गुन्हे थांबले नाहीत.  गुन्हेगारीत नव्याने अनेकजण येत आहेत. त्यांचे रेकॉर्ड नसल्याने तपास होत नाहीत. जुनी माहिती असणाऱ्या गुन्ह्यांचा छडा लागला; पण गेल्या आठवडाभरात शहरात होत असलेल्या वाटमाऱ्यांचा तपास लागत नाही. उलट रस्त्यात अडवून धाक दाखवून लुटण्याचे प्रकार वाढत आहेत.

गेल्या शनिवारी रात्री अकरा-बाराच्या काळात त्रिमूर्ती टॉकीजजवळ, मौजे डिग्रज फाटा आणि माधवनगर रोडवरील पश्‍चिम महाराष्ट्र पत्रा डेपोच्या जवळ अशा तीन ठिकाणी चाकूचा धाक दाखवून तीन तरुणांना लुटण्याचे प्रकार घडले. 
यात मोबाईल, रोकड आणि सोन्याची अंगठी असा सुमारे ७५ हजारांचा मुद्देमाल पळवला. त्याच दिवशी वखारभागात भेळ गाडीवाल्यालाही चाकूचा धाक दाखवून तिघांनी लुटले. मात्र, त्याने फिर्याद दिली नाही. त्या दिवशीच रात्री काळ्या खणीजवळ एकाच्या गळ्यातील चेन हिसडा मारून पळवून नेण्यात आली. तर काल रात्री चार चाकी गाडीतून निघालेल्या एका महिलेस थांबवून लुटले.

ते तिघे कोण?
विशेष म्हणजे या घटनांत तिघेजण तोंडाला रुमाल बांधून एकाच गाडीवरून आले होते. प्रत्येक ठिकाणी तिघेजण कसे ? गाडीचे वर्णन एकच. त्यामुळे या वाटमाऱ्या  एकाच टोळीने केल्या की आणखीही चोरटे यात आहेत हे स्पष्ट नाही. मात्र सांगली शहर, विश्रामबाग, ग्रामीण या सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीत हे प्रकार घडलेत. मात्र, पोलिसांना काहीच धागा मिळालेला नाही हे दुर्दैव.

बीट मार्शल, गस्ती पथक काय करते ?
प्रत्येक पोलिस ठाण्याला बीट मार्शल आणि गस्ती पथक नेमलेत. त्यांनी सतत ठाण्याच्या हद्दीत फिरते राहून गुन्हेगारांची माहिती गोळा करायची असते. मात्र, त्यांच्याकडून काही माहिती मिळत नाही असेच दिसते. सलग घटना घडत असताना बीट मार्शल, डी. बी. शाखेच्या पोलिसांना हे गुन्हेगार सापडत नाहीत. प्रत्येक पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकाला एकेक दिवस जिल्हा गस्तीचे काम असते. त्यांचीही गस्त सुरू असते. इतके सगळे गस्त घालतात तरी वाटमाऱ्या, चेन स्नॅचिंग, खून, घरफोड्या होतात कसे?

पोलिस अधीक्षकांचा अजून ठसाच नाही
स्वतंत्रपणे एखाद्या जिल्ह्याचा कार्यभार सांभाळण्याची  संधी अधीक्षक सुहेल शर्मा यांना मिळाली आहे. त्यांनी पहिल्या दोन महिन्यांत मोका, तडीपारी, हद्दपारीच्या कारवाया करून गुन्ह्यांना आळा बसवण्याचा प्रयत्न चालवला आहे; पण गुन्हे उघडकीस आणण्यात, गुन्हेगारी रोखण्यात अद्याप म्हणावा तसा ठसा उमटलेला नाही. त्यांनी अधिकाऱ्यांना कडक कारवाईचे अधिकार देऊन प्रसंगी पाठीशी राहण्याचा विश्‍वास दिला आहे, परंतु सध्याची वाढलेली गुन्हेगारी पाहता त्यांच्या विश्‍वासाला अजून अधिकारीच उतरलेले नाहीत. एखादा खून उघडकीस आणला म्हणजे गुन्हेगारी थांबत नाही. परंतु वाटमाऱ्या, जबरी चोऱ्या, दिवसा होत असलेल्या घरफोड्या उघडकीस येत नाहीत हे मोठे अपयश आहे.

पक्ष, संघटना  कुठे गायब?
अनिकेत कोथळे प्रकरणात रस्त्यावर उतरून संघर्ष करणारे पक्ष, संघटना शहरात गुन्हेगारी वाढूनही तोंड उघडण्यास तयार नाहीत. वाटमाऱ्या, खून, घरफोड्या वाढलेल्या असताना या संघटना आवाज  उठवत नाहीत. जनतेच्या सुरक्षिततेसाठी आवश्‍यक कायदा सुव्यवस्थेशी आपला काही संबंध नाही, अशा आविर्भात या संघटना आहेत हेसुद्धा आश्‍चर्यजनक आहे.

Web Title: Sangli News Police and crime special