पतंगराव-संजयकाका ‘फिक्‍सिंग’चा नया दौर

पतंगराव-संजयकाका ‘फिक्‍सिंग’चा नया दौर

नागठाणे येथे बालगंधर्व पुरस्कार वितरण सोहळ्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम आणि भाजपचे खासदार संजय पाटील यांनी एकमेकांचे कौतुक करत भविष्यात सहकार्य भावनेचे आदान-प्रदान केले. त्यातून ‘दुश्‍मन का दुश्‍मन दोस्त’ या न्यायाने कदम-पाटील ‘राजकीय फिक्‍सिंग’चा नया दौर साकारताना दिसू लागला आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून ‘मूळ भाजप’ची सुरू असलेली रणनीती संजय पाटील यांच्यासाठी चक्रव्यूह ठरतेय. देशमुख-कदम यांच्यातील संघर्षही टोकाला गेला असून भाजप देशमुखांना चांगलेच बळ देत आहे. अशा वेळी या सलगीतून दोघांनीही देशमुख यांना व पर्यायाने ‘भाजप नीती’लाही बोचकरण्याचा प्रयत्न केला आहे.

लोकसभा निवडणुकीला दोन, तर विधानसभेला अडीच वर्षांचा अवधी आहे. वरकरणी हा मोठा काळ वाटत असला तरी राजकीय मशागतीसाठी तो कमी आहे. जिल्ह्यातील राजकीय पटलावर कुठल्याच पक्षात आलबेल नाही. दीर्घकाळाने सत्तेबाहेर गेलेल्या काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफुशीची परंपरा कायम आहे. राष्ट्रवादीतील आर. आर. समर्थक आणि जयंत पाटील समर्थकांतील संघर्ष अधेमधे उफाळत असतो. या दोन्ही पक्षांतील बलवान नेते आपल्याकडे खेचून ‘बाहुबली’ झालेल्या भाजपमध्येही आता चांगलीच ‘भाऊगर्दी’ झालेली आहे. राज्य पातळीवर एकाही नेत्याला विशेष काही काम दिले गेलेले नाही. त्यामुळे सारे जिल्ह्यात रमलेत. एकमेकांच्या पायात पाय अडकवण्यात धन्यता मानत आहेत. आपले संस्थान सुरक्षित राहिले पाहिजे, त्यात कुणाची ढवढाढवळ नको, अशी स्पष्ट भूमिका समोर येतेय. त्यात मूळ भाजपची ताकद दाखवण्याचा सपाटाच लागला आहे. आयातांनी इथं यावं, आमच्या विचारानं राहावं, असा स्वच्छ संदेश त्यांच्यापर्यंत एव्हाना पोचला आहे. नसेल तर पक्षातील ‘चतुर’ त्यांची कोंडी करायला पुढे धावताना दिसताहेत. 

भाजपांतर्गत घडामोडींत सध्या कडेगावचे माजी आमदार, भाजप जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख केंद्रस्थानी आले आहेत. एकीकडे त्यांनी पारंपरिक राजकीय विरोधक पतंगराव कदम यांना अंगावर घेतले. जिल्हा बॅंकेत आमदार मोहनराव कदम यांच्या जबरदस्त विधानानंतर त्यांचे चुलत बंधू, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी रान उठवले. मोहनरावांचे पुतळे जाळले. काँग्रेसने विश्‍वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली पलटवार करत मोर्चा काढला. कनेक्‍शन असो वा नसो, या पार्श्‍वभूमीवर विश्‍वजित यांच्या पुण्यातील कार्यालयावर आयकरचे छापे पडले. त्याने वातावरण अजून तापले आहे. दुसरीकडे देशमुखांचा पक्षांतर्गत संजय पाटील यांच्याशी छत्तीसचा आकडा झाला आहे. ‘त्या’ वादानंतर दोघांनी पक्ष वेगळे आणि वाद वेगळा, असा सार्वजनिक ठिकाणचा वावर ठेवला असला तरी ‘शॉर्ट सर्किट’चा अनुभव पदोपदी येतोय. लोकसभेतील ऐतिहासिक विजयानंतर संजय पाटील जिल्हा भाजपच्या ड्रायव्हिंग सीटवर विराजमान झाले. त्यांचा वरचष्मा वाढला. त्यांचे कार्यकर्ते भाजप ‘चालक’ झाले. त्यामुळे मूळ भाजपवाल्यांची अस्वस्थता उघडपणे दिसत होती. या चमूने देशमुख-पाटील वादाच्या संधीचा फायदा घेतला नसता तरच नवल. त्यांनी देशमुखांना भाजपची राज्य पातळीवरची ताकद मिळेल आणि संजय पाटील यांची कोंडी होईल, अशी व्यवस्थाच तयार करून ठेवली आहे. 

या परिस्थितीत नागठाणेतील कार्यक्रमात समान बाणांनी घायाळ पतंगराव आणि संजय पाटील एका व्यासपीठावर आले. या आधी या दोन्ही नेत्यांत कलगीतुरा रंगत आला होता. पतंगरावांनी ‘मोदींच्या गोमुत्राने पवित्र झालेले’ अशा शेलक्‍या शब्दांत संजय पाटील, विलासराव जगताप यांच्यावर शरसंधान साधले होते. मोहनराव कदम यांनी दोन वर्षांपूर्वी वसंतदादा कारखाना कामगारांच्या सभेत संजय पाटील यांना कोपरखळ्या हाणल्या होत्या. विश्‍वजित कदम तासगावच्या मैदानात उतरून ‘तासगावातील राजकीय गुंडगिरी मोडून काढू’, अशी गर्जना करत आलेत. हे दोन नेते मतांच्या राजकारणात फारसे आमने-सामने आले नसले तरी त्यांच्यात सख्य नव्हते. संजय पाटील यांनी तर वेळोवेळी दिवंगत आर. आर. पाटील, पतंगराव, जयंतराव यांच्या मॅच फिक्‍सिंगचे दाखले दिले होते. नागठाणेतील कालच्या समारंभाने या राजकीय संबंधांनी नवी कलाटणी मिळाल्याचे मानले जाते. पतंगरावांनी ‘संजयकाका आता भाजपमध्ये असले तरी ते आमचेच आहेत. तो कामाचा माणूस आहे’, असे प्रमाणपत्र दिले. ‘तरुणाईने त्यांना डोक्‍यावर घेतले असून कितीही मोठे झाले तरी त्यांचे पाय जमिनीवर आहेत’, असे कौतुकही केले. संजय पाटील यांनी पतंगरावांच्या कार्यकर्तृत्वावर कौतुक सुमनांची वृष्टी केली. ‘‘कदमसाहेब कर्तबगार आहेत. हा जिल्हा कर्तबगार लोकांची पूजा करतो. त्यांनी भान ठेवून योजना आखल्या आणि बेभान होऊन राबवल्या. मोठे विश्‍व उभे केले,’’ असे कौतुक केले. पतंगरावांनी या साऱ्यावर कळस चढवताना ‘‘संजयकाका चांगल्या माणसांच्या सान्निध्यात राहा’, असा मौलिक सल्ला देत हात पुढे केला. हा हात पक्षविरहीत मैत्रीचा असल्याचे राजकीय भाकीत आता वर्तवले जाऊ लागले आहे. त्याला कसे वळण दिले जाते, त्याचे काँग्रेस आणि भाजपच्या राजकीय गणितांवर काय परिणाम होतील, हे काळच सांगेल. कारण पतंगरावांना जवळ करताना संजय पाटील यांना पतंगराव विरोधकांना दुरावण्याचा धोका निश्‍चित आहे. त्यामुळे ही वाट कशी वळण घेते, देशमुखांची कोंडी करायला ही मैत्रीची भाषा कामी येऊ शकेल का, याकडे लक्ष असेल.

कशाला उद्याची बात ?
पतंगराव कदम यांनी भविष्यात लोकसभा निवडणुकीत उतरण्याचे संकेत दिले आहेत. काँग्रेसची सांगली लोकसभा मतदारसंघातील सद्यस्थिती पाहता ते घडू शकते. खासदार संजय पाटील भाजपचे लोकसभेचे उमेदवार असतील, असे आजघडीला गृहीत धरायला हवेच. तसे झाल्यास पतंगराव व संजय पाटील कदाचित आमने-सामने असतील, तरीही त्यांनी ही भूमिका का घेतली, असा प्रश्‍नच साहजिकच मनात येतो. अर्थात, राजकारणात घडीला काटा बदलत असतो. त्यामुळे ‘कशाला उद्याची बात’, म्हणत त्यांनी आजचे अंगावर आलेले संकट शिंगावर घेण्यासाठी हात गुंफण्याचे संकेत दिले असावेत, असा तर्क आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com