इस्लामपूरात आढळला पोवळा जातीचा साप

शांताराम पाटील 
शुक्रवार, 18 मे 2018

इस्लामपूर - येथील गुरुदत्त कॉलनी, राजारामनगर परिसरात राहणाऱ्या मधुकर पाटील यांच्या घराजवळ दुर्मिळ असा पोवळा साप आढळला आहे.

इस्लामपूर - येथील गुरुदत्त कॉलनी, राजारामनगर परिसरात राहणाऱ्या मधुकर पाटील यांच्या घराजवळ दुर्मिळ असा पोवळा साप आढळला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, गुरुवारी रात्री मधुकर यांच्या पत्नीस प्रथम हा साप दिसला. त्यांचा मुलगा सुरज पाटील हा सर्पमित्र असल्यामुळे त्यांनी या सापाची कल्पना त्यास दिली. सुरज घटनास्थळी दाखल झाला. तेव्हा तो साप नेहमीपेक्षा वेगळा असल्याचे आढळले. यापूर्वी अशा प्रकारचा साप त्यांनी कधीच पाहीला नव्हता. यासाठी सुरजने तो साप स्वतः न पकडता त्यांचे मार्गदर्शक, महाराष्ट्र ॲनिमल रिट्रायविंग असोसिएशनचे प्राणी मित्र विकास माने यांच्याशी संपर्क साधला. माने यांनी तात्काळ पाटील यांच्या घराकडे धाव घेतली व सापास एका बाटलीमध्ये पकडून निर्मनुष्य ठिकाणी सोडले.

हा साप दुर्मिळ असून इस्लामपूर परिसरामध्ये याची पहिलीच नोंद आहे. हा साप विषारी असतो, याची लांबी 54 सेंटीमीटरपर्यंत वाढते. याच्या शरीराचा रंग तपकिरी असून डोके व मान काळी असते. तसेच शेपटीवर दोन काळे आडवे पट्टे असतात. पोटाचा रंग लाल असतो. लांबट सडपातळ शरीर व मऊ खवले असतात. हा साप निशाचर आहे. याला डिवचले तर हा शेपटी वरती करून खवल्यांचा लाल रंग दाखवतो. हा साप मुख्यतः जमिनीत, दगडांखाली किंवा वाळलेल्या पानांखाली वास्तव्य करतो.

हा साप महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम बंगाल, तामिळनाडू व कर्नाटक या राज्यात आढळत असल्याची नोंद आहे. या सापाची मादी वाळलेल्या पानांखाली किंवा दगडाच्या सपाटीत 2 ते 7 अंडी घालते, अशी माहिती प्राणीमित्र विकास माने यांनी दिली.

Web Title: Sangli News Povala Snake found in Islampur