रेल्वेच्या १४ स्थानकांत तिकीट विक्रीचे खासगीकरण

संतोष भिसे
शनिवार, 24 मार्च 2018

मिरज - मिरज- पुणे रेल्वे मार्गावरील चौदा स्थानकांत तिकीट विक्रीचे खासगीकरण करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेने त्यासाठी निविदा मागवल्या आहेत. 

मिरज - मिरज- पुणे रेल्वे मार्गावरील चौदा स्थानकांत तिकीट विक्रीचे खासगीकरण करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेने त्यासाठी निविदा मागवल्या आहेत. 

वाल्हे, जरंडेश्वर, नांद्रे, फुरसुंगी, आळंदी, शिंदवणे, राजेवाडी, आंबळे, दौंडज, सालपा, आदर्की, पळशी, शिरवडे आणि लोणी या स्थानकांतील तिकीट विक्रीचे खासगीकरण केले जाणार आहे. त्यासाठी १६ एप्रिलपर्यंत निविदा दाखल करता येतील. सध्या तेथे स्टेशन मास्तरच तिकीट विक्री करतात. स्थानके छोटी असल्याने वाणिज्य विभागाचे जादा कर्मचारी नाहीत. तीन पाळ्यांत स्टेशन मास्तरच तिकिटांची विक्री करतात. 

केंद्र सरकारच्या खासगीकरणाच्या धोरणानुसार हे काम तीन वर्षांसाठी खासगी व्यक्तीकडे सोपवले जाईल. स्टेशन तिकीट बुकिंग एजंटस्‌ म्हणून नियुक्ती असेल. रेल्वेच्या संगणक यंत्रणेसह अन्य सुविधा त्यांना वापरता येतील. आरक्षित नसलेली तिकिटे विकता येतील. सध्या स्टेशन मास्तर २४ तास उपलब्ध असतात. पण एजंट गाडी येण्यापूर्वी तासभर अगोदर येतील. स्थानकांवर एक्‍स्प्रेस गाड्या फारशा थांबत नाहीत. त्यामुळे २४ तास कर्मचाऱ्यांची गरज नाही, अशी रेल्वेची भूमिका आहे. एजंटांना तिकीट विक्रीनुसार कमिशन मिळेल.

तिकीट खिडक्‍या काही वर्षांत बंद
मिरज-पंढरपूर दरम्यानच्या काही स्थानकांवर खासगी एजंट यापूर्वीच नियुक्त केले गेले आहेत. मिरज स्थानकातही खासगी एजंट, स्वयंचलित यंत्रांद्वारा तिकीट विक्री होते. येथील तिकीट खिडक्‍या काही वर्षांत टप्प्याटप्प्याने पूर्ण बंद करण्याचे रेल्वेचे धोरण आहे.

Web Title: Sangli News Privatization of ticket sales in 14 trains