आज शामरावनगर रडतंय, उद्या इतरांची वेळ

शेखर जोशी
रविवार, 17 सप्टेंबर 2017

सांगली - कारभाऱ्यांचं पाप, नागरिकांना ताप, अन्‌ बुडणाऱ्या नगरांना मुरुमाचा आधार... ही कहाणी आहे शामरावनगरची. स्वर्ग, नरक संकल्पना भारतीयांसाठी परलोकीच्या. सांगलीकरांना मात्र नरक अनुभवण्याची इथेच संधी. शामरावनगराचे काय भरीत झालेय हे या शहरातील प्रत्येक सजग नागरिकाने पाहिले पाहिजे. हा धोका केवळ शामरावनगरपुरता मर्यादित नाही. भविष्यात शहरातल्या सर्वच उपनगरांसाठी ही धोक्‍याची घंटा आहे.
 

सांगली शहरात सध्या स्वच्छता पंधरवडा सुरू आहे. पालकमंत्र्यांच्या हस्ते त्याचा प्रारंभ झाला. त्यावरून मानापमान नाट्यही सुरू आहे. पालकमंत्र्यांनी एक करावे सांगली शहराला स्वच्छ शहरांच्या स्पर्धेतूनच वगळावे. अगदी महापालिकेला स्मार्ट सिटीच्या परीक्षेला बसायलासुद्धा अपात्र ठरवले पाहिजे. ‘स्वच्छ शहर’, ‘हागणदारीमुक्‍त शहर’ अशा काही गोष्टींसाठी पुरस्कार देणाऱ्या पुरस्कार समित्यांना सांगलीला असा काही पुरस्कार देताना शरमच वाटली पाहिजे. सारेच बोगस. कोणत्या तरी समित्या या शहरात येतात आणि न फिरताच प्रमाणपत्रे वाटून सोपस्कार पूर्ण करतात. खरे शामरावनगर पाहून त्यांनी केवळ सांगलीसाठी ‘उत्कृष्ट नरक निर्मिती’ असे पुरस्कार द्यायला हवा. याच धर्तीवर राज्यभर असे पुरस्कार द्यावेत. देशात बुलेट ट्रेन आणणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही इथल्या व्यथेची दखल घेऊन एक पत्र धाडलं... एवढीही संवेदनशीलता इथल्या पालकमंत्र्यांना, आमदार-खासदारांना दाखवता येत नाही. हे महापालिकेच्या कारभाऱ्यांचं पाप म्हणून ते अंग झटकून टाकू शकत नाहीत. त्यावर मुरूम टाकून सारी आपली पापे झाकू पाहत आहेत.

शामरावनगरमधील अशा बिनडोक उपाययोजनांमुळे भविष्यात शंभर फुटी, धामणी रस्ता ते गव्हर्न्मेंट कॉलनीपर्यंतच्या शामरावनगरलाही धोका आहे. गेली वीस वर्षे हा नरक विस्तारत गेला...पावसाळा आला की हजारो ट्रक मुरूम पडून इथले रस्ते उंच झाले, ठेकेदार मालामाल आणि सामान्य जनता खड्ड्यांत गेली. आमदार जयंत पाटील यांच्यासारखे अभियंते असलेले नेते महापालिकेत विरोधी पक्ष म्हणून काम करतात. त्यांच्या कार्यकर्त्यांनी विरोधक म्हणून तरी निदान येथे चाललेल्या माकडचेष्टांवर तोंड उघडायला पाहिजे होतं. एकदा मुख्यमंत्र्यांना ड्रेनेज घोटाळ्याच्या चौकशीचे पत्र त्यांनी दिले, पण नंतर अंडरस्टॅंडिंग समित्यांत वर्णी लावून सारेच गप्प झाले. भाजपला निवडणूक होईपर्यंत जेवढी काही शहरात बोंबाबोंब होईल तेवढी हवीच आहे. ती म्हणे त्यांची निवडणूक स्ट्रॅटेजी आहे. तुमच्या साठमारीत लोकांचा जीव जातो आहे याचे भान ठेवा.

कोणी एक ठेकेदार ड्रेनेज योजना अर्धवट असताना बिले खिशात घालून नामानिराळा कसा होतो ? आयुक्तांपासून वरच्या सचिवांपर्यंत ही बोंबाबोंब कशी लपून राहते. या सर्वांवर नेत्यांचे मौन हे सारेच संताप आणणारे आहे. कदाचित उद्या निवडणुकीच्या रणधुमाळीत शामरावनगरचे व्हेनिस करू, अशी घोषणासुद्धा काही महाभाग करतील... पण कोणी काही आव आणला तरी शामरावनगरमधील लोकांचा प्रवास खड्ड्यांतून खड्ड्यांकडेच चालला आहे. याच पद्धतीने येथील ड्रेनेज आणि मुरूम टाकण्याचे काम अहोरात्र चालले तरी पावसाळ्यात मोफत होड्या पुरवण्याचाच ठेका येथे महापालिकेला भविष्यात द्यावा लागणार आहे. कदाचित मुरूम पुरवणारे ठेकेदार निर्लज्जपणे नाव पुरवण्याची कंत्राटे घेतील. कमिशनमुळे नेते मालामाल होतील. 

भविष्यात येथे रस्ते उंच आणि घरे खुजी होतील... पाऊस आणि मुरूम हे इथले समीकरण तहहयात सुरू राहील. तळी, नाले बुजवून पाडलेल्या स्वस्तातल्या प्लॉटमध्ये स्वत:ची कमाई लोकांनी येथे घातली आहे. त्यांना फसविणारेच आता ‘एक चेहरे पे कई चेहरे’ लगाकर कारभारी झालेत. त्यांनी येथे गाळेही काढलेत आणि खिसेही भरलेत. या नरकयातनात लोकांचा विश्‍वास कारभाऱ्यांवर नाही तर मुरुमावर आहे. आमच्या गल्लीत मुरूम तेवढा पडू दे, असा नवस लोक येथे करू लागले आहेत. मुरूम पडेल यासाठी दलालांच्या विनवण्या करू लागली आहेत. सध्या ज्या पद्धतीने येथे ड्रेनेजचे काम आणि पाईप टाकून पाणी काढण्याचे उद्योग चालले आहेत, ते पाहता इथल्या प्रश्‍नांचा झोल सध्या असलेल्या कारभाऱ्यांच्या हयातीतही सुटणारा नाही.

दिवसेंदिवस जटील होत असताना याचा फटका शहराच्या भविष्यातील विकासालाच बसणार आहे. जेव्हा पाऊस पडणार तेव्हा येथे नरकयातना सुरू होणार...नागरिक त्रस्त होणार आणि नगरसेवक आंदोलनाची नौटंकी पार पाडणार...मग मुरूम पडणार..हे सारं रहाटगाडगं या नगराच्या मुहूर्तमेढेपासून सुरू आहे. भविष्यात ते शंभरफुटीपासून ते खरे क्‍लब आणि वृंदावन व्हिलापर्यंत अगदी मिरजेला जाऊन टेकलेल्या सांगलीच्या सर्व परिसराला विळख्यात घेऊ शकतं! हा धोका लक्षात घेऊन शामरावनगरला बुडताना पाहून गप्प बसण्यापेक्षा यासाठी सर्व नागरिकांनी सजग होऊन येथे ठोस उपायांसाठी दबाव तयार करायला हवा. शहरातील तज्ज्ञ अभियंत्यांच्या संघटनेने पुढे येऊन यावर  प्रशासनाला उपाययोजना सुचवल्या पाहिजेत. त्यासाठी ‘सकाळ’चा कृतिशील पुढाकार असेल.

तुमच्या सूचना द्या
शामरावनगरच्या प्रश्‍नांबाबत मार्ग काढण्यासाठी शहरातील अभियंते, वास्तुरचनाकारांच्या संघटनेने पुढाकार घ्यावा. तज्ज्ञ नागरिकांनीही सूचना द्याव्यात. याबाबत ‘सकाळ’च्यावतीने लवकरच चर्चासत्र आयोजित करण्यात येईल. आम्ही हे मुद्दे ऐरणीवर आणू इच्छितो. आपण सारे त्यासाठी पुढे या !
संपर्क ईमेलः sansakal@gmail.com

Web Title: sangli news problems in shamraonagar