गुंड राकेश कदमला पाठलाग करुन अटक 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

सांगली - शिंदे मळ्याजवळ राहणाऱ्या श्रीनाथ पंडित याचे जुन्या भांडणातून अपहरण केलेला गुंड राकेश मधुकर कदम आणि त्याच्या दोन साथीदारांना गुंडाविरोधी पथकाने चुडेखिंडी-ढालगाव रस्त्यावर पाठलाग करुन अटक केली. त्याच्या ताब्यातून श्रीनाथ पंडित याची सुटका करुन त्याला विश्रामबाग पोलिसांकडे सुपुर्द करण्यात आले.

सांगली - शिंदे मळ्याजवळ राहणाऱ्या श्रीनाथ पंडित याचे जुन्या भांडणातून अपहरण केलेला गुंड राकेश मधुकर कदम आणि त्याच्या दोन साथीदारांना गुंडाविरोधी पथकाने चुडेखिंडी-ढालगाव रस्त्यावर पाठलाग करुन अटक केली. त्याच्या ताब्यातून श्रीनाथ पंडित याची सुटका करुन त्याला विश्रामबाग पोलिसांकडे सुपुर्द करण्यात आले. कदमकडून दोन पिस्टल, जिवंत काडतुसे आणि इतर हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, राकेश कदम (वय 28, रा. हनुमाननगर) याला श्रीनाथ प्रदीप पंडित (वय 19, रा. शंभरफुटी रोड, जुना धामणी रस्ता गुलाब कॉलनी) आणि त्याच्या दोन साथीदारांनी दोन महिन्यांपुर्वी मारहाण केली होती. त्याचा राग मनात धरुन कदमने गेल्या आठवड्यात श्रीनाथ पंडित याचे बाजार समिती परिसरातून अपहरण केले. याबाबत श्रीनाथची आई श्रीमती सुजाता पंडित यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिस कदमच्या मागावर होते. 

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक राजन माने आणि गुंडाविरोधी पथकाचे प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक कदमचा शोध घेत होते. त्यांना संशयित आरोपी राकेश कदम आणि त्याचे साथीदार कवठेमहांकाळ परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन तेथे पेट्रोलिंग करत असताना चुडेखिंडी ते ढालगावर रोडवर कदम त्याच्या साथीदारांसह जात असताना त्यांचा पाठलाग करुन त्यांना अटक केली. राकेश कदम याच्यावर दोन खुनाचे गुन्हे दाखल आहेत. 

यावेळी राकेश कदमसह सनी विजयकुमार सहाणी (वय 20, रा. मंगळवार बाजार, विश्रामबाग) आणि एक बालगुन्हेगार होता. त्यांच्याकडून पथकाने दोन बिगर परवाना पिस्टल, नऊ जिवंत काडतुसे, एक कोयता, एक सत्तूर, एक वात असलेली जिलेटीनची कांडी व दोन हजाराची रोकड असा एकूण दोन लाख 21 हजार 600 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांच्या ताब्यात असलेला अपहृत तरुण श्रीनाथ पंडित याची सुटका करुन त्याला विश्रामबाग पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. 

राकेश कदम आणि त्याच्या साथीदारांविरोधात कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा व स्फोटक पदार्थ अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई महेश आवळे, शंकर पाटील, मेघराज रुपनर, सचिन कुंभार, किरण खोत, सागर लवटे, योगेश खराडे, विमल नांदगावे, सुप्रिया साळुंखे आदींनी केली. 

Web Title: Sangli News Rakesh Kadam arrested