महालक्ष्मी एक्‍सप्रेसमध्ये उंदरांचा उपद्रव; प्रवाशांच्या बॅगा, नोटा कुरतडल्या

संतोष भिसे
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

मिरज - मुंबईहून-कोल्हापुरला आज पहाटे आलेल्या महालक्ष्मी एक्‍सप्रेसमध्ये उंदरांच्या टोळीने धुमाकूळ घातला. प्रवाशांच्या बॅगा कुरतडल्या. कपडे कुरतडले. इतकेच नाही तर नोटांही फाडल्या आहेत. स्लिपर आणि वातानुकुलीत बोगींमध्ये उंदरांच्या या हंगाम्याने प्रवाशांचा डोळ्याला डोळाही लागला नाही. 

मिरज - मुंबईहून-कोल्हापुरला आज पहाटे आलेल्या महालक्ष्मी एक्‍सप्रेसमध्ये उंदरांच्या टोळीने धुमाकूळ घातला. प्रवाशांच्या बॅगा कुरतडल्या. कपडे कुरतडले. इतकेच नाही तर नोटांही फाडल्या आहेत. स्लिपर आणि वातानुकुलीत बोगींमध्ये उंदरांच्या या हंगाम्याने प्रवाशांचा डोळ्याला डोळाही लागला नाही. 

आज सकाळी मिरजेत उतरलेल्या प्रवाशांनी जडावलेल्या डोळ्यांनी उंदरांची कर्मकहाणी पत्रकारांना सांगितली. रात्रभर झोपेचे खोबरे झाल्याने त्यांनी रेल्वे प्रशासनाच्या नावाने खडे फोडले. रेल्वेमध्ये उंदरांचा उपद्रव प्रवाशांसाठी नवा नाही; पण महालक्ष्मी एक्‍सप्रेसारख्या काही प्रतिष्ठेच्या आणि महत्वाच्या गाड्यांमध्ये रेल्वे प्रशासन विशेष दक्षता घेते. प्रवाशांना उंदरांचा त्रास होऊ नये, यासाठी निगुतीने काळजी घेते. काल रात्री मात्र प्रशासनाच्या कामकाजाचे धिंडवडे काढण्याचे उंदरांनी जणू मनावरच घेतले होते. स्लिपर बोगींत रात्रभर त्यांनी प्रवाशांना सळो कि पळो करुन सोडले.

अनेक प्रवाशांना पहाटे गाडीतून उतरल्यावरच उंदरांचा हा कारनामा समजला. काही प्रवाशी उंदराच्या धिंगाण्याबद्दल ऐकून होते; त्यांनी महत्वाचा ऐवज बॅगेत कोंबून वरच्या बर्थवर ठेवण्याचा शहाणपणा दाखवला होता. तो मात्र बचावला. 

प्रवाशीच जबाबदार 
एका रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले कि, रेल्वे डब्यांत तीन ते सहा महिन्यांतून एकदा पेस्ट कंट्रोल केले जाते. उंदीर आणि झुरळांचा नायनाट केला जातो. पुन्हा उंदीर येण्यासाठी प्रवाशीच जबाबदार आहेत. प्रवाशांच्या बेशिस्तीमुळे उंदरांना डब्यात खाण्याचे पदार्थ मुबलक प्रमाणात मिळतात. शेंगाच्या टरफलांपासून पिझ्झाच्या तुकड्यांपर्यंत आणि लाडू-चिवड्यांपासून फळांफळावळांपर्यंत मेजवानी मिळते. डब्यात सर्वत्र खाद्यदार्थ विखुरलेले असतात. प्रवासी स्वच्छतेची ऐसी कि तैसी करतात; त्यामुळे उंदीर सोकावतात. आम्ही कितीजरी काळजी घेतली तरी प्रवाशांच्या सहकार्याविना सारे व्यर्थ आहे.

Web Title: Sangli News Rat In Mahalaxmi Express