अनुभवा अनुभूती...रेड प्लॅनेट, रेड मून युती

अनुभवा अनुभूती...रेड प्लॅनेट, रेड मून युती

आज रात्री खग्रास चंद्र ग्रहण घडणार आहे. ते शतकातील सर्वांत दीर्घकाळ दिसणारे असेल. त्याचा पर्वकाळ ३ तास ५५ मिनिटे तर खग्रास अवस्था १ तास ४३ मिनिटांची असेल. जेव्हा सूर्य-पृथ्वी-चंद्र एका सरळ रेषेत येतात तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडते चंद्रग्रहण घडते. आज चंद्र त्याच्या भ्रमण कक्षेत पृथ्वीपासून सर्वात दूरच्या बिंदुवर असेल. त्याचे बिंब नेहमी पेक्षा थोडे लहान भासेल. तो पृथ्वीच्या सवलीतून नेहमीपेक्षा जास्तवेळ प्रवास करताना दिसेल. रात्री ११.५४ ला चंद्र पृथ्वीच्या गडद सावलीत प्रवेश करेल. हळूहळू काळे होत जाणारे त्याचे बिंब एक वाजता पूर्णपणे ग्रासलेले दिसेल. यालाच खग्रास अवस्था म्हणतात. ती पहाटे २.४३ ला संपेल. हळूहळू ग्रहण सुटू लागेल. ३.४९ ला गडद सवलीतून चंद्र पूर्णपणे बाहेर पडेल तेंव्हा ग्रहण संपेल.

गडद सावलीत प्रवेश करण्यापूर्वी चंद्र पृथ्वीच्या विरळ सावलीत शिरतो ती वेळ (रात्री १०.४४) आणि शेवटी जेव्हा विरळ सावलीतून बाहेर पडतो ती वेळ (पहाटे ४.५८). हाच वेधकाळ. पृथ्वीभोवतीच्या वातावरणामुळे वक्रीभवन होऊन सूर्यप्रकाशाचा काही भाग (infrared Ray’s) चंद्रावर पडल्याने खग्रास 
अवस्थेत चंद्रबिंब पूर्णपणे नाहीसे न होता लालसर, तपकिरी दिसते. यालाच रेडमुन किंवा ब्लडमुन म्हणतात.

केवळ डोळ्यांनी दिसणारे पाचही ग्रह (बुध, शुक्र, मंगळ, गुरु, शनी.) सध्या सूर्यास्तानंतर आकाशात दिसत असल्याने आजची रात्र ही खगोलप्रेमींसाठी पंच पक्वान्नांची मेजवानीच. प्रतियुतीत असलेला मंगळ ग्रह आज आपल्यापासून केवळ साडेपाच कोटी कि. मी. दूर आहे. या दशकातील हे सर्वात कमी अंतर असेल. त्यामुळे मंगळ नेहमीपेक्षा बराच मोठा दिसतोय. आज त्याचे रेडमुनच्या युतीतील दर्शन अशिया ते पूर्व आफ्रिका खंड असे अर्ध्यापेक्षा जास्त पृथ्वीवरून पाहता येईल. 

पाश्‍चिमात्य लोक अशा खगोलीय आविष्कारांचा शास्त्रीय अभ्यास करतात. आनंदही लुटतात. आपल्याकडील परिस्थिती उलटी आहे. नैसर्गिक घटनांमागील शास्त्रीय ज्ञानाचा अभाव आणि गैरसमजुतींचा प्रभाव समाजात जास्त दिसतो. ‘ग्रहण म्हणजे सावल्यांचा खेळ. त्याचा जीवसृष्टीवर वाईट परिणाम होत नाही. पृथ्वी व चंद्राच्या गतीचे गणित मांडून ग्रहणाबद्दलची अचूक भाकीते वर्तवता येतात, असे आर्यभट्टांनी पाचव्या शतकातच सांगितले आहे.  दीड हजार वर्षांनंतरदेखील सुशिक्षित स्त्रिया ग्रहण पाळतात हे खगोलशास्त्राच्या परंपरेला लाजिरवाणेच. अंधश्रद्धा, गैर समजुती सोडून देऊन सर्वांनी ग्रहणाचा आनंद जरूर लुटावा.
...........

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com