'ताकारी पेठेच्या वैभवाला धक्‍का लागणार नाही'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

ताकारी - येथील व्यापारी पेठ ही वाळवा तालुक्‍याचे वैभव आहे. ताकारीतून जाणाऱ्या गुहागर-विजापूर या राष्ट्रीय महामार्गामुळे या वैभवाला अजिबात धक्का लागू देणार नाही. ताकारी पेठेतील पक्‍क्‍या बांधकामाची एकही वीट हलणार नाही याची काळजी घेऊ, अशी ग्वाही कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली. 

ताकारी - येथील व्यापारी पेठ ही वाळवा तालुक्‍याचे वैभव आहे. ताकारीतून जाणाऱ्या गुहागर-विजापूर या राष्ट्रीय महामार्गामुळे या वैभवाला अजिबात धक्का लागू देणार नाही. ताकारी पेठेतील पक्‍क्‍या बांधकामाची एकही वीट हलणार नाही याची काळजी घेऊ, अशी ग्वाही कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली. 

ताकारी येथून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गामुळे येथील ग्रामस्थ व व्यापाऱ्यांना नुकसान होणार अशी धास्ती लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर खोत यांनी येथील ग्रामस्थ व व्यापाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी नगराध्यक्ष निशिकांत पाटील, राजारामबापू पाटील दूध संघाचे अध्यक्ष विनायकराव पाटील, प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार सविता लष्करे, राष्ट्रीय महामार्ग (सार्वजनिक बांधकाम)चे उपअभियंता संपत आबदार यांची प्रमुख उपस्थिती होती. 

खोत पुढे म्हणाले,""केंद्रात व राज्यात एकाच विचाराचे सरकार आहे. रस्ते ही विकासाची बाब आहे. मात्र विकासकामे ही लोकांना बाधित करणारी नसावीत तर ती लोकांच्या सुविधेसाठी असावीत अशीच आमची भूमिका आहे.'' 

विनायकराव पाटील म्हणाले,""कमीत कमी जागा अधिग्रहीत करून हा रस्ता व्हावा. आमदार जयंत पाटील यांनाही निवेदन दिले आहे.'' 

निशिकांत पाटील म्हणाले,""हा प्रश्न केंद्र सरकारच्या अखत्यारीतील असल्याने मंत्री खोत यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याशी संपर्क साधून हा प्रश्न मांडला आहे. नक्कीच सकारात्मक तोडगा निघेल.'' 

यावेळी सागर खोत, ताकारी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुहास पाटील, पैलवान संजय पवार, सागर पाटील, शहाजी पाटील, भास्कर कदम, तंटामुक्तीचे अध्यक्ष अशोक पाटील, उपसरपंच कमलाकर भांबुरे, माजी सरपंच शशिकांत पाटील यांच्यासह व्यापारी व ग्रामस्थ उपस्थित होते. एम. व्ही. सुतार यांनी प्रास्ताविक केले. सुहास पाटील यांनी आभार मानले. 

दोन एकेरी रस्ते व्हावेत.... 
ताकारी पेठेतून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी पेठेतून एक व कृष्णा कॅनॉल लगत एक असे दोन एकेरी वाहतुकीचे रस्ते व्हावेत; असा पर्याय सुचविण्यात आला. यावर मंत्री खोत यांनी कृष्णा कॅनॉलची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना तसा नकाशा व प्लॅन इस्टिमेट तयार करण्याच्या सूचना दिल्या. 

Web Title: sangli news sadhabhau khot