भाजप-सेना युतीसाठी संभाजी पवार प्रयत्नशील

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 मार्च 2018

सांगली - आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेची युती व्हावी, अशी अपेक्षा माजी आमदार संभाजी पवार यांनी व्यक्त केली आहे.

सांगली - आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेची युती व्हावी, अशी अपेक्षा माजी आमदार संभाजी पवार यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी दोन्ही पक्षांच्या नेत्यांना त्याबाबत सल्ला दिल्याची माहिती नगरसेवक गौतम पवार यांनी दिली. पत्रकाराशी बोलताना त्यांनी अशी युती झाली, तरच महापालिकेत प्रथमच  युतीला निर्भेळ सत्ता मिळू शकते असे मतही नोंदवले.

श्री. पवार म्हणाले, ‘‘स्थानिक पातळीवर  भाजपमधील काही मंडळींशी आमचे मतभेद असले तरी वरिष्ठ पातळीवर आमचे आजही संबंध कायम आहेत. त्या संबंधांतूनच आम्ही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना याबाबत कळवले आहे. माजी आमदार पवार यांनी शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्याशीही चर्चा केली आहे. सेनेत मातोश्रीतून आदेश आला, की त्याचे खाली पालन होते. पृथ्वीराज पवार यांनीही शिवेसना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे.

राज्यात आजही केंद्र आणि राज्यात भाजप-सेना सत्तेत आहे. त्यामुळे भाजपसोबत युती हा काही नवा विषय नाही. सहा महिन्यांपूर्वी आम्ही आमदार सुधीर गाडगीळ यांच्याशी आणि नेते मकरंद देशपांडे यांच्याशीही चर्चा केली आहे. सध्या कधी नव्हे ती युतीला चांगली संधी आहे असे सर्वांचेच मत आहे. त्यामुळे युती व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. 

दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीही एकत्र येऊन आघाडी  करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. तथापि युतीबाबतचा अंतिम निर्णय उद्धव ठाकरे घेतील. शिवसेनेशिवाय सत्ता येऊ शकत नाही हे भाजपच्या  जिल्हा परिषद निवडणुकीत लक्षात आले आहे. नंतर एकत्र येण्याऐवजी आधीच युती असावी हे त्यांना नक्की पटेल.’’
 

Web Title: Sangli News Sambhaji Pawar press