सांगली - मिरजेचा उलगडला रंजक इतिहास 

संतोष भिसे
मंगळवार, 8 मे 2018

मिरज - मिरजेत पहिला रसगुल्ला कधी आला?, पहिली स्लिपर कधी आली?, पहिलं टपाल तिकीट कधी आलं?, मिरजेतील पहिली पिठाची गिरणी कशी होती?, पहिली डिक्‍शनरी मिरज-सांगलीत कधी आली?, पहिला गॉगल मिरजेत कुणी आणला? या आणि यासारख्या अनेक गंमतीशीर प्रश्नाची उत्तरे रविवारी शाहू व्याख्यानमालेत श्रोत्यांना मिळाली. मिरज इतिहास संशोधन मंडळाचे इतिहास अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर यांनी अस्सल कागदपत्रांच्या आधारे सांगली- मिरज शहराचा मनोरंजक इतिहास उलगडून दाखवला. 

दोन -तीनशे वर्षांत झालेल्या मनोरंजक घटनांचा आढावा कुमठेकर यांनी या व्याख्यानातून घेतला. मिरजेच्या स्मशानभूमीत इतिहासाचा खजिना कसा दडला आहे, हे तेथे दफन केलेल्या नामवंत व्यक्तिच्या समाधीस्थळावरून त्यांनी दाखवून दिले. मिरजेच्या नायकिणींनी लोकमान्य टिळकांना केलेली मदत, नायकिणीच्या वंशावळी, त्यांचं सामाजिक भान, त्यांच्या चालीरिती अशी मनोरंजक माहिती मोडी लिपीतील ऐतिहासिक कागदपत्रांचे अस्सल दाखले देत कुमठेकर यांनी दिली. 

कबाडे शास्त्रींचा गीतारहस्यचा इतिहास

लोकमान्य टिळकांच्याही पूर्वी मिरजेतील कबाडे शास्त्रींनी लिहिलेले गीतारहस्य पुस्तक आणि त्याला खुद्द लोकमान्यांनी पत्र पाठवून दिलेली मान्यता, पैलवानाचं मिरजेत असणारं देशातील एकमेव मंदिर, मिरजेत छापलेली देशातील पहिली भगवद्गीता, मिरजेत झालेले रेडिओवरचे देशातील पहिले थेट प्रक्षेपण अशा नानाविध गोष्टी ऐकताना मिरजकर श्रोत्यांचा ऊर अभिमानाने भरून आला. 

शिलालेख नवसाला पावणारा आणि... 
शिलालेख हे इतिहास अभ्यासाचे अस्सल साधन. पण, मिरजेतला एक शिलालेख तर इतिहास बोलका करतोच, शिवाय नवसालाही पावतो, अशी इथल्या लोकांची श्रध्दा. तर इथला दुसरा एक शिलालेख पाठदुखी बरी करतो, अशी त्याची ख्याती. शहरातील आणखी एका शिलालेखाला एका न्यायालयीन वादात चक्क साक्षीदार म्हणून कोर्टाच्या पिंजऱ्यात उभा राहावे लागले, या आणि अशा अनेक गमतीशीर पण, सत्य अशा गोष्टी कुमठेकर यांनी तत्कालीन कागदपत्रांचे दाखले देत सांगितल्या. सांगलीतील हत्ती रंगपंचमी कशी खेळत?, हत्ती मेल्यानंतर त्यांचा उरूस कसा साजरा होई याचीही माहिती कुमठेकर यांनी दिली. 

Web Title: Sangli News Sangli - Miraj History