माजी महापौर बागवान, नायकवडींसह चौघांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 जुलै 2018

मिरज - प्रभाग क्रमांक सहामधील उमेदवार अतहर नायकवडी व माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांना मते द्यावीत यासाठी मतदारांना पैसे वाटणाऱ्या एकास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली. शिवकुमार मलकाप्पा जिगजिनी (वय ४८ रा. अथणी) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

मिरज - प्रभाग क्रमांक सहामधील उमेदवार अतहर नायकवडी व माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांना मते द्यावीत यासाठी मतदारांना पैसे वाटणाऱ्या एकास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली. शिवकुमार मलकाप्पा जिगजिनी (वय ४८ रा. अथणी) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

या कारवाईत नायकवडी यांच्या प्रचार कार्यालयाशेजारील एका खासगी घरातून ५६ हजार ८०० रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. यासंदर्भात पोलिसांनी  भाग क्रमांक सहामधील उमेदवार बागवान, नायकवडी, नरगीस सय्यद आणि रझिया काझी या चारीही उमेदवारांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. 

आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पोलिस मुख्यालयातील स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई केली. त्या वेळी शिवकुमार मलकाप्पा जिगजिनी हा मतदारांना पैशांचे वाटप करून त्यांच्या मतदार यादीतील नावासमोर खुणा करताना रंगेहाथ सापडला. या ठिकाणी मतदान यंत्राची काही मॉडेलही ठेवली होती. या मॉडेलवर उमेदवारांच्या नावासमोरील बटण दाबण्याचे प्रात्यक्षिकही करून दाखवले जात होते.

कारवाईसाठी पोलिसांचे पथक या ठिकाणी येताच कार्यालयात बरीच पळापळ झाली. अनेक कार्यकर्ते आणि मतदार पळून गेले. पोलिसांना मतदारांना नेमके कोणत्या ठिकाणाहून पैशांचे वाटप केले जात होते, त्या ठिकाणची पक्की माहिती मिळाल्याने पोलिसांनी तातडीने शेजारच्या घरात जाऊन शिवकुमार जिगजिनी याला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडील ५६ हजार ८०० रुपयांची रोख रक्कमही जप्त केली. यासंदर्भात अझरुद्दीन महमंद सलीम पिरजादे या स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिस कर्मचाऱ्याने शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Sangli News Sangli-Miraj- Kupwad corporation election special