चाकू, तलवारीचा वार करीत तिघांकडून सात चोऱ्या

चाकू, तलवारीचा वार करीत तिघांकडून सात चोऱ्या

सांगली -  दुचाकीवरून आलेल्या तिघा चोरट्यांनी चाकू, तलवारीचा वार करत सात ठिकाणी जबरी चोऱ्या केल्याचा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. सांगलीतील शंभर फुटी रोड, पंचशीलनगर आणि कवलापूर (ता. मिरज) परिसरात काल (ता. १४) रात्री ही घटना घडल्याने घबराटीचे वातावरण पसरले आहे. दोन लाख रुपयांचे सात तोळे दागिने, तीस हजारांचे मोबाईलसह  ६० हजारांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. या प्रकरणी शहर, संजयनगर आणि ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. एकाच टोळीचे हे कृत्य असून, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहे. 

घटनाक्रम असा... 
 रात्री साडेनऊची वेळ 
कवलापूरच्या मुख्य रस्त्यावर संतोष मारुती साबळे (वय २९) यांचे जयभवानी नावाचे किराणा मालाचे दुकान आहे. साडेनऊच्या सुमारास दुचाकीवरून तिघे दुकानासमोर आले. त्यातील दोघांनी दुकानात प्रवेश करून श्री. साबळे यांना चाकूचा धाक दाखवला. गल्ल्यातील १६ हजारांची रक्कम घेतली. आरडाओरडा केल्यानंतर श्री. साबळे यांच्यावर तलवारीने वार करण्यात आले. परिसरात अंधार असल्याने एकही व्यक्ती रस्त्यावर नव्हती. त्यानंतर चोरटे पसार झाले. घाबरलेल्या साबळे यांनी तातडीने पोलिसठाणे गाठले. 

 रात्री ११.१० ची वेळ 
फिर्यादी सुधीर शिवलिंग सगरे (वय ४६) यांची सांगलीतील किसान चौकात खानावळ आहे. श्री. सगरे हे रात्री अकराच्या सुमारास शंभरफुटी रस्त्यावरील मेडिकलमध्ये मधुमेहाचे औषध नेण्यासाठी आले होते. त्यावेळी या तिघा चोरट्यांनी त्यांना अडवले. चाकूचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील अडीच तोळ्याची चेन काढून घेतली. त्यानंतर चोरट्यांनी पाकिजा मशीदच्या दिशेने पलायन केले. 

 रात्री ११.३० ची वेळ 
शासकीय रुग्णालय परिसरातील गोमटेश मेडिकलमधील कर्मचारी विद्यासागर महावीर आवटे (रा. त्रिकोणीबाग जवळ) हे साडेअकराच्या सुमारास घरी निघाले होते. त्यावेळी शंभरफुटी रस्त्यावर त्यांना अडविले. त्यांनाही चाकूचा धाक दाखवून खिशातील १२०० रुपये काढून घेऊन सिव्हिलच्या दिशेने पलायन केले. 

 रात्री १२.५ ची वेळ 
साखर कारखाना जवळील संपत चौकातील प्रिया हॉटेलजवळ देशी दारूचे दुकान आहे. तेथील कामगार मंजुनाथ वीरसंगाप्पा धाननवर (वय ३१, रा. पंचशीलनगर) हे तेथील एका खोलीत झोपले होते. त्यावेळी त्यांचा मित्र महेंद्र अरविंद कांबळे (रा. पंचशीलनगर) हेही त्यांच्यासोबत होते. रात्री बारा वाजून पाच मिनिटांनी तिघा चोरट्यांनी त्यांच्या घराचा दरवाजा वाजला. मंजुनाथ यांनी दरवाजा उघडल्यानंतर त्यांना चाकूचा धाक दाखवत तिघेही घरात घुसले. त्यांच्याजवळील दोन तोळ्याची चेन, एक तोळ्याचा  बदाम आणि ४२ हजारांची रक्कम काढून घेतली. महेंद्र यांच्याकडूनही दोन तोळ्याची चेन काढून घेऊन पलायन केले. 

 रात्री १२.१५ ची वेळ 
चोरटे रात्री सव्वा बाराच्या सुमारास पंचशीलनगमध्ये  गेले. त्यावेळी अशोक रंगराव खराडे यांना अडवून त्यांच्याकडून साडेसहा हजाराचा मोबाईल काढून घेतला. श्री. खराडे यांचे किराणा मालाचे दुकान आहे. त्यानंतर दुचाकीवरून येणाऱ्या नीलेश दत्तात्रय ढोवळे यांना चोरट्यांनी अडवले. त्यांच्याकडून २३ हजार ५०० रुपयांचा मोबाईल काढून घेऊन चोरट्यांनी पलायन केले. 

पोलिसांचे पथक रवाना 
एकाच रात्रीत तिघा चोरट्यांनी धुमाकूळ घातल्यानंतर पोलिस प्रशासन खडबडून जागे झाले. रात्रीतच पथके रवाना करत चोट्याची शोध मोहीम सुरू केली. रात्री उशिरापर्यंत चोरट्यांचा माग काढणे पोलिसांना शक्‍य झाले नाही. याप्रकरामुळे शहरात खळबळ उडाली असून  नागरिकांमध्ये धबराटीचे वातावरण पसरले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com