सांगलीत चोरट्यांचा धुमाकुळ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 नोव्हेंबर 2017

वर्दीतील क्रौर्याने सध्या राज्यभर अब्रूचे धिंडवडे निघालेल्या शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. ठाण्यापासून हाकेच्या अंतरावरील गणपती पेठेतील सहा दुकाने चोरट्यांनी फोडली. आकाशवाणीजवळ एकाला चोरट्यांनी बेदम मारहाण करत लुटले. तर काल दुपारी खणभागतील फ्लॅट फोडून चोरट्यांनी मुद्देमाल लंपास केला. 

सांगली - शहर पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावरील गणपती पेठेतील सहा दुकाने मध्यरात्री चोरट्यांनी फोडली. एका माळेतील ही दुकाने फोडून त्यातील सुमारे पंचवीस हजार रुपयांची रोकड तसेच 35 किलो बदाम लंपास असा पन्नास हजाराचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. दुकानाचे कुलूप तोडून चोरी झाल्याने प्राथमिक तपास पुढे आले आहे. मध्यरात्री अडीचच्या दरम्यान हा प्रकार घडल्याचा अंदाज आहे. 

शहरातील फुटकळ भुरट्या चोऱ्यांनी नागरिक त्रस्त आहेत. शहरातील कायदा सुव्यवस्थेचे पुरते धिंडवडे निघाले असता चोर सोडून तिसऱ्यालाच अडकवण्याचे शहर पोलिसांचे कारनामे उघडकीस आले असताना आता पुन्हा एकदा गणपती पेठेतील सहा दुकाने फोडण्यात आली. दुकानांमध्ये फारशी रोकड अथवा किंमती ऐवज नव्हता. ही दुकाने हार्डवेअर, घाऊक किराणा व भुसार, कापूर, सुका मेव्याची आहेत. त्यातील संजय महादेव पंड्या यांच्या एम. व्ही. पंड्या किराणा दुकानातून वीस हजार रुपये आणि 25 किलो बदामाचे पॅकबंद पोते तसेच सुट्या स्वरुपातील दहा किलो बदामाचे पोते गायब केले आहे.

अभयकुमार पारेसा हुक्केरी हे नारळ व्यापारी असून त्यांच्या दुकानातून दहा रुपांयाची नाणी चोरट्यांनी लंपास केली. एम. युसुफ अँड कंपनी या कापूर दुकानातून पाचशे रुपये नेले आहेत. तर के. पी. पासड यांच्या हार्डवेअर दुकानातून हजार रुपये लांबवले आहेत. अन्य दुकानात चोरीचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती समोर आहे. 

दरम्यान, आज सकाळी शहर पोलिस उपाधीक्षक दीपाली काळे, शहर पोलिस ठाण्याचे निरिक्षक रवींद्र शेळके यांनी भेट दिली. श्‍वानपथक मागवण्यात आले. तपासाचा माग काढण्याचा प्रयत्न झाला. शहर पोलिस ठाण्याचा सारा परिसर वर्दळीचा आणि व्यापार पेठेचा आहे. या परिसरात सराफ कट्टा परिसरात, कर्नाळ रस्त्यावर, आमराईजवळ पोलिस चौक्‍या आहेत. कर्नाळ व आमराई जवळची चौकी गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहे. शहरातील गस्तही आता रोडावली आहे. वर्दळीच्या भागात सीसीटीव्ही बसवण्याच्या घोषणाही पोकळ ठरल्या आहेत. अशा घटना घडल्यानंतर पुन्हा या साऱ्या उपायांची केवळ चर्चा होते. आज सकाळीही जिल्हाधिकारी विजयकुमार काळम पाटील यांनी वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसोबत या सर्व मुद्यांची चर्चा केली. 

सीसीटीव्ही फोडले, केबल कापल्या 
चोरीच्या प्रकारानंतर पोलिसांनी तत्काळ परिसरातील काही दुकानदारांच्या सीसीटीव्हीचे चित्रकरण पाहिले. त्यात चोरटे तोंडाला बांधून दुचाकीवरुन आल्याचे समजते आहे. मात्र चोरी झालेल्या दुकानातील सीसीटीव्ही फोडले असून काही ठिकाणी केबल कापण्यात आल्या आहेत. 

इथे झाली चोरी 
* नारळ व्यापारी अभयकुमार पारेसा हुक्केरी - हजार ते पंधराशे रुपये चोरी - सीसीटीव्ही फोडले 
* सह्याद्री आटा चक्की (संदीप पांडुरंग पाटील) - चोरीचा प्रयत्न 
* गोकुळदास मुलचंद अँड कंपनी (रवा, मैदा व्यापारी) चोरीचा प्रयत्न 
* के. पी. पासड हार्डवेअर (प्रताप पासड) - हजार ते पंधाराशे रुपये चोरी 
* ड्रायफूड मर्चंट (संजय महादेवप्रसाद पंड्या) - वीस हजार रुपये आणि 25 किलो बदामाचे पॅकबंद पोते तसेच सुट्या स्वरुपातील दहा किलो बदामाचे पोते गायब (सीसीटीव्हीची केबल कापली) 
*कापूर व्यापारी एम. युसुफ अँड कंपनी - पाचशे रुपयांची चोरी 

आकाशवाणी केंद्राजवळ एकास मारहाण करुन लुटले 

आकाशवाणी केंद्राजवळील संदीप मदन करजगार (वय 32) या तरुणास चोरट्यांनी मारहाण करुन लुटले. त्यांच्याकडून सोन्याची अंगठी, रोख रक्कम आणि मोबाईल असा चाळीस हजारांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला. मध्यरात्री अडीचच्या सुमारास हा प्रकार घडला. शहर पोलिसांत सहा चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

अधिक माहिती अशी, संदीप करजगार हे एका औषध कंपनीत विभागीय व्यवस्थापक म्हणून काम करतात. काल सकाळी ते कमानिमित्त सोलापूरला गेले होते. तेथून मध्यरात्री अडीच वाजता ते सांगली बसस्थानकावर आले. आकाशवाणी केंद्राच्या मागील बाजूस त्यांचा फ्लॅट असल्याने त्यांनी रिक्षा केली. परंतू रिक्षा चालकाने आकाशवाणी केंद्राजवळच सोडणार असल्याचे सांगितले. तेथून ते रात्री पायी घरी निघाले होते. त्यावेळी दबा धरुन बसलेल्या तिघांनी त्यांना अडवले. दमबाजी करण्यास सुरवात केली. त्यावेळी मोटारसायकलवरुन आणखी तिघे तिथे आले. त्यांनी संदीप करजगार यांच्याकडे पैशाची मागणी केली. नकार दिल्याने दगडाने मारहाण केली. जखमी झालेल्या करजगार यांच्याकडून चोरट्यांनी सोन्याची अंगठी, रोख रक्कम आणि मोबाइल घेवून पलायन केले. आरडाओरडा करेपर्यंत चोरट्यांनी सांगलीच्या दिशेने पलायन केले.

दरम्यान, जखमी करजगार यांना मिरजेतील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. आज सकाळी शहर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार सहा अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. 

खणभागातील फ्लॅट फोडला; 65 हजारांचा मुद्देमाल लंपास 

खणभागातील ड्रीम पॅराडाईज अपार्टमेंटमधील फ्लॅट चोरट्यांनी फोडला. काल दुपारी अडीजच्या सुमारास हा प्रकार घडला. चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा 65 हजारांचा मुद्देमाल लंपास केला. याबाबत सविता विनोद शिंदे (वय 37) यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. 

अधिक माहिती अशी, सविता शिंदे या आपल्या मुलासह खणभागातील ड्रीम पॅराडाईज अपार्टमेंटमध्ये रहतात. श्रीमती शिंदे या एका स्कूल बसवर कामाला असल्याने त्या घरातून बाहेर पडल्यानंतर दुपारी साडेचार वाजता घरी येतात. चोरट्यांनी पाळत ठेवून काल दुपारी अपार्टमेंटमध्ये प्रवेश केला. कुलूप तोडून घरात घुसले. त्यावेळी कपाटात ठेवलेले सव्वा चार तोळ्याचे सोन्याचे दागिने आणि रोख दहा हजार असा 65 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. 

दरम्यान, श्रीमती शिंदे या दुपारी साडेचार वाजता घरी आल्यानंतर तुटलेले कुलूप पाहून चोरी झाल्याचा प्रकार निदर्शनास आला. त्यानंतर त्यांनी तत्काळ शहर पोलिसांना कळविले. पोलिसांनी पंचनामा करुन अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंद केला. 

Web Title: Sangli News six theft incident in Ganesh Peth