उदंड घोडेबाजार; स्नेहल सावंत, चव्हाण सभापतिपदी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 जून 2017

""मदन पाटील यांच्या हयातीत ज्यांनी मागासवर्गीय समितीत गद्दारी केली अशा कुणालाच मी मतदान करू शकत नाही. मी सूचक असलो तरी पक्षाला उमेदवार उभा करता यावा यासाठी होतो. त्यांना मतदान करणे माझ्या विवेकाविरुद्ध ठरले असते. ही माझी नेते मदन पाटील यांना श्रद्धांजली आहे.'' 
विवेक कांबळे, माजी महापौर 

सांगली - उदंड जाहला घोडेबाजार अशी स्थिती आज मागासवर्गीय समितीच्या सभापती निवडीच्या निमित्ताने दिसून आली. कॉंग्रेस-राष्ट्रवादीत काल रात्रीपासून सुरू असलेल्या डाव-प्रतिडावाअंती अखेर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्नेहल सावंत यांनी बाजी मारली. माजी महापौर विवेक कांबळे यांनी नेत्या जयश्री पाटील, विशाल पाटील, महापौर हारुण शिकलगार अशा सर्वांनाच अंगठा दाखवत स्वतः सूचक असलेल्या कॉंग्रेस उमेदवार सुरेखा कांबळे यांच्याविरोधात राष्ट्रवादीला मतदान केले. गुंठेवारी समितीच्या सभापती कॉंग्रेसच्या शालन चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली. जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील अध्यक्षस्थानी होते. 

कॉंग्रेसचे 6, राष्ट्रवादीचे 4 आणि स्वाभिमानी आघाडीचे 1 असे संख्याबळ असलेल्या मागासवर्गीय समितीत गेल्या तीन वर्षांपासून सौ. सावंत यांनी अचूक "गणित' साधले आहे. स्वाभिमानीचे बाळासाहेब गोंधळे दोन दिवसांपासूनच गायब झाल्याने त्यांचा कौल स्पष्टच होता. माजी महापौर कांचन कांबळे, शेवंता वाघमारे, सुरेखा कांबळे आणि अश्‍विनी कांबळे यांनी यावेळी कॉंग्रेसने ही निवडणूक लढवावीच असा आग्रह धरला. त्यानुसार गेले दोन दिवस चक्रे फिरत होती. महापौरांनीही काल निवडणूक जिंकू, असा निर्धार व्यक्त केला. यात मेख होती ती विवेक कांबळे काय करणार हीच. महापौरांनी त्यांनाच या मिशनचे म्होरके करण्याचा निर्णय घेऊन सुरेखा कांबळे यांच्यासाठी सूचक म्हणून अर्ज दाखल केला. त्याचवेळी काल त्यांना नेत्या जयश्री पाटील यांच्यासमोर हजर करून "शब्द'ही घेतला. महापालिकेच्या राजकारणात नव्याने लक्ष घातलेल्या विशाल पाटील यांनीही आवश्‍यक ती "रसद' पुरवली. ती विवेक कांबळे व राष्ट्रवादीतील एका सदस्यालाही देण्यात आली. कालपर्यंत ठाम असलेल्या विवेक कांबळे यांना आज सकाळी मदन पाटील हयात असताना बाळासाहेब गोंधळे यांच्या झालेल्या पराभवाची आठवण झाली. श्री. कांबळे यांच्याबरोबरच बाळासाहेब गोंधळे यांच्या मदतीने सहा मते घेत स्नेहल सावंत यांनी बाजी मारली. त्यानंतर झालेल्या गुंठेवारी समितीत कॉंग्रेसचे स्पष्ट बहुमत असल्याने शालन चव्हाण यांची निवड बिनविरोध झाली. 

कांबळेंना महापौर केले ही आमची चूकच. 
मागासवर्गीय समितीसाठी विवेक कांबळे यांच्या सूचनेनुसारच उमेदवार देण्यात आला. स्वतः सूचक असलेल्या पक्षाच्या उमेदवाराचा पराभव त्यांनी केला. त्यांचे हे वर्तन त्यांच्या आजवरच्या वृत्तीला साजेसेच आहे. आमचे नेते मदन पाटील यांनी त्यांच्या संपूर्ण राजकारणात कोणती चूक केली असेल तर विवेक कांबळे यांना महापौर केले, अशी टीका महापौर हारुण शिकलगार यांनी केली. 

Web Title: sangli news Snehal Sawant, Chavan Chairman