शुभम सोहोलीत उतरलाच नाही..!

रवींद्र मोहिते
रविवार, 14 जानेवारी 2018

वांगी - औंधहून जीपगाडी भरधाव कुंडलकडे निघाली होती. वाटेत सोहोली गाव लागले. वस्ताद सुनील मोहिते, सहकारी मल्ल विनय चन्ने गाडीतून उतरून घरी गेले... शुभम घार्गे त्याच गावचा... पण, तो उतरला नाही... तो कुंडलला जायला निघाला, पण वाटेतच त्याच्यावर काळाने घाला घातला. 

वांगी - औंधहून जीपगाडी भरधाव कुंडलकडे निघाली होती. वाटेत सोहोली गाव लागले. वस्ताद सुनील मोहिते, सहकारी मल्ल विनय चन्ने गाडीतून उतरून घरी गेले... शुभम घार्गे त्याच गावचा... पण, तो उतरला नाही... तो कुंडलला जायला निघाला, पण वाटेतच त्याच्यावर काळाने घाला घातला. 

मल्ल शुभम घार्गे हा सोहोली (ता. कडेगाव) येथील असून, शेतकरी कुटुंबातील होतकरू मल्ल. वडील  अंकुश व चुलते प्रकाश प्रसिद्ध मल्ल. बालवयातच शुभमला कुस्तीचे धडे मिळाले. कुस्तीची परंपरा कायम राखण्यासाठी तो लहानपणापासून कुस्तीकडे आकर्षित झाला होता. कुस्तीचे शास्त्रशुद्ध धडे घेण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून कुंडल येथील क्रांती तालीम मंडळामध्ये दाखल झाला होता.

\बलदंड शरीरयष्टी असलेल्या शुभमने कुस्तीत अल्पावधीतच नाव कमावले होते. अनेक मैदाने मारली होती. त्याचा दबदबा बनला होता. १९ व्या वर्षी तो लांब पल्ला गाठणार, असे भाकीत वर्तवले जात होते. 

कुंडल येथे क्रांती तालीम मंडळामध्ये सुनील मोहिते हे सोहोली गावचे वस्ताद आहेत. शुभम कुंडलमध्ये गेल्या तीन वर्षांपासून कुस्तीचा सराव करीत होता. काल औंध येथील कुस्तीमैदान संपलेनंतर तो रात्री सोहोली येथे जीपमधून सहकारी मल्लांसह आल्यानंतर वस्ताद सुनील मोहिते व अन्य एक मल्ल विनय चन्ने असे दोघे  जीपमधून उतरून घरी गेले. शुभम हा घरी न जाता आपल्या सहकाऱ्यांसमवेत जीपमधून कुंडलला निघाला असता वांगी गावच्या हद्दीत झालेल्या अपघातात त्याच्यावर काळाने घाला घातला. तो शांत संयमी व मनमिळावू असल्याने त्याचा राज्यभर कुस्तीक्षेत्रासह  सर्वत्र मोठा मित्र परिवार आहे. त्याच्या अकाली जाण्याने सोहोली गावावर व त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. सोहोली येथे आज बंद पाळून व गावकऱ्यांनी त्याला श्रद्धांजली वाहिली. त्याच्या पश्‍चात आई-वडील व लहान भाऊ साहील असा परिवार आहे.

Web Title: Sangli News Subham Soholi no more