यंदा उसाला तीन हजारांवर ‘एफआरपी’ मिळणार

विष्णू मोहिते
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

सांगली - येत्या गळीत हंगामासाठी ऊस उत्पादकांना चांगला म्हणजे प्रतिटन तीन हजारांवर दर मिळणार आहे. नोव्हेंबरमध्ये कारखान्यांची धुराडे पेटतील. राज्य शासनाचा गाळप हंगाम परवाना आता ऑनलाईन देण्यात येणार आहे. उसाच्या कमरतेमुळे यंदा उसाची पळवापळवी होण्याचीही शक्यता आहे. ती टाळण्यासाठी राज्य शासनाने ऊस अन्य राज्यात पाठवण्यास मनाई केली  आहे.

सांगली - येत्या गळीत हंगामासाठी ऊस उत्पादकांना चांगला म्हणजे प्रतिटन तीन हजारांवर दर मिळणार आहे. नोव्हेंबरमध्ये कारखान्यांची धुराडे पेटतील. राज्य शासनाचा गाळप हंगाम परवाना आता ऑनलाईन देण्यात येणार आहे. उसाच्या कमरतेमुळे यंदा उसाची पळवापळवी होण्याचीही शक्यता आहे. ती टाळण्यासाठी राज्य शासनाने ऊस अन्य राज्यात पाठवण्यास मनाई केली  आहे. सीमाभागातील कारखाने लवकर सुरू झाल्यास सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांतून उसाची पळवापळवी होणार हे निश्‍चित आहे. 

राज्य शासनाने येत्या गाळप हंगामाबाबतचे धोरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. राज्यातील साखर कारखान्यांचे गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू करण्यास परवानगी दिली. साडेनऊ उताऱ्याला २५५० आणि पुढील प्रत्येक टक्‍क्‍यांसाठी २६८ रुपये मिळतील. जिल्ह्याचा सरासरी उतारा १२.२ टक्के आहे. यामुळे यंदा प्रतिटन किमान तीन हजार दोनशे रुपये दर मिळण्यात अडचण नाही. मात्र ऊस क्षेत्र घटल्यामुळे उसाची पळवापळवी होणार हे निश्‍चित आहे. शेजारील राज्यात ऊस गाळपास पाठवण्यावरही राज्य शासनाने बंदी घातली आहे. महाराष्ट्रातून कर्नाटकात सध्याच ऊस तोडणी सुरू झाली आहे. हे लक्षात घेता सीमेवर नाकाबंदी शिवाय पर्याय असणार नाही. सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील साखर  कारखान्यांना याचा फटका बसणार आहे. राज्यातील साखर कारखाने नोव्हेंबरमध्ये सुरू होईपर्यंत कर्नाटकात जाणारा ऊस अडवण्याची तयारी सरकार आणि राज्यातील साखर कारखान्यांवर करायची वेळ आली आहे. 

सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी येत्या गाळप हंगामाची तयारी सुरू आहे.  तोडणी, वाहतुकीचे करार  पूर्ण झाले आहेत. नोव्हेंबरममध्ये हंगाम सुरू करण्याचे नियोजन केले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा उसाचे क्षेत्र किंचित वाढले असले तरी वसंतदादा, दालमिया आणि  जत डफळे कारखाने पूर्ण क्षमतेने चालणार आहेत. त्यामुळे ऊस कमी पडणार आहे. जिल्ह्यात खासगी आणि सहकारी असे एकूण १६ साखर कारखाने आहेत. गत वर्षी ७२ हजार ३५९ हेक्‍टरवरील सुमारे ५२ लाख टन गाळप झाले होते. यंदा उसाचे क्षेत्र गतवर्षीच्या तुलनेत आठ हजार हेक्‍टरनी वाढून ते ८० हजार ४४९ हेक्‍टर झाले आहे. 

जिल्ह्याचा साखर उतारा सरासरी १२.२ टक्के आहे. एक नोव्हेंबरऐवजी १५ पासून कारखाने सुरू झाल्यास उतारा चांगला मिळेल. कर्नाटकातील कारखान्यांकडे जिल्ह्यातील ऊस गाळपास जाण्याचे प्रमाण खूप कमी आहे. त्यांनी गतवर्षीची बिलेही न दिल्यामुळे जिल्ह्यातील कारखान्यांना भीतीची गरज नाही.
- संजय कोले, शेतकरी संघटना

Web Title: sangli news Sugarcane rate