कोथळे मृत्यू प्रकरणात ‘सीडीआर’मधील संभाषणांचे विश्‍लेषण होणार

कोथळे मृत्यू प्रकरणात ‘सीडीआर’मधील संभाषणांचे विश्‍लेषण होणार

सांगली - अनिकेत कोथळे याचा शहर पोलिस ठाण्याच्या कोठडीत झालेल्या मारहाणीत मृत्यू झाला, त्या रात्री संशयितांच्या फोन कॉल डिटेल्सची माहिती गोळा करण्यात येत आहे. यात संशयितांशी संपर्क केलेल्यांचे जवाब नोंदविण्याचे काम सुरू आहे.  काहीजणांचे जवाब सीआयडीने घेतले. त्यांनी संपर्क का केला? कशासाठी केला? याची माहिती घेऊन त्यांचा या घटनेशी काय आणि कसा संबंध आहे का? याचे विश्‍लेषण करण्यात येत आहे.

शहर पोलिस ठाण्याच्या कोठडीत अनिकेत कोथळेचा पोलिसांच्या अमानुष मारहाणीत मृत्यू झाला. दीड महिन्यापूर्वी झालेल्या या घटनेदिवशी संशयितांना कुणी फोन केले, संशयितांनी कुणाकुणाला फोन केले, याचे सीडीआर सीआयडीने ताब्यात घेतले आहेत. त्यावरून फोन कॉल्सची माहिती काढण्यात येत आहे. घटनेनंतर किंवा त्याच्या पूर्वी संशयितांना कुणी फोन केले, त्या सर्वांचे जवाब नोंदवण्यात येत आहेत. आज काहीजणांचे जवाब पोलिसांनी नोंदविले. 

घटनेनंतर जवळच्या नातेवाईकांना, अधिकाऱ्यांना संशयितांनी फोन केले होते. त्याची माहिती घेऊन त्या सर्वांचे जबाब नोंदवण्यात येणार आहेत. त्यांचे काय संभाषण झाले, त्याचा घटनेशी संबंध होता काय याचे विश्‍लेषण करण्यात येणार आहे. त्यातून नव्याने काही साक्षीदार तयार होण्याची तसेच या गुन्ह्याचा संदर्भ लावण्यासाठी नवीन मुद्दे मिळण्याची शक्‍यता आहे.

संशयितांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

अनिकेत कोथळेच्या पोलिस कोठडीतील मृत्यू प्रकरणी सर्व 
संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्यात आली. सर्व संशयितांना कोल्हापूरच्या कळंबा कारागृहातून आज सांगलीत आणण्यात आले होते.

शहर पोलिस ठाण्याच्या कोठडीत असताना पोलिसांच्या मारहाणीत अनिकेत कोथळे याचा मृत्यू झाल्याप्रकरणी बडतर्फ उपनिरीक्षक युवराज कामटे याच्यासह अनिल लाड, अरुण टोणे, नसरुद्दीन मुल्ला, राहुल शिंगटे आणि झाकीर पट्टेवालेच्या न्यायालयीन कोठडीचा आज अखेरचा दिवस होता. त्यांना दुपारी बाराच्या सुमारास कोल्हापूरहून सांगलीत आणले. न्यायालयासमोर हजर केले असता न्यायाधीशांनी त्यांना १ जानेवारी २०१८ पर्यंत १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी वाढवून दिली. पंधरा दिवसांपूर्वी या सर्वांना न्यायालयात हजर केले होते. त्या वेळी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. आजही मोठा बंदोबस्त न्यायालयाच्या आवारात ठेवला होता.

गुन्हा अन्वेषण विभागाच्या अधीक्षकांकडून आढावा

सीआयडीचे अधीक्षक श्रीकांत पाठक यांनी आज सांगलीत येवून अनिकेत कोथळे मृत्यू प्रकरणाच्या तपासाचा बैठकीत आढावा घेतला. त्यांनी तपास अधिकारी अप्पर अधीक्षक नरेंद्र गायकवाड यांच्यासह अधिकाऱ्यांची बैठक घेतली. शहर पोलिस ठाण्याला भेट देवून माहिती घेतली.

अनिकेत कोथळेस कोठडीत झालेली मारहाण, त्याचा मृत्यू आणि मृतदेह आंबोलीत नेऊन जाळण्याच्या घटनेचा तपास सीआयडी करीत आहे. बडतर्फ उपनिरीक्षक युवराज कामटे याने कोथळेचा मृत्यू झाला असतानाही तो आणि भंडारे यांनी पोलिस कोठडीतून पलायन केल्याची फिर्याद दिली. या बनावट पलायन प्रकरणाचा तपासही सीआयडी नव्याने करीत आहे. या दोन्ही प्रकरणांच्या तपासाचा आढावा आज श्री. पाठक यांनी घेतला. त्यांनी अप्पर अधीक्षक नरेंद्र गायकवाड, उपाधीक्षक मुकुंद कुलकर्णी यांच्यासह सायंकाळी शहर पोलिस ठाण्यास भेट दिली. पोलिस कोठडी, डीबी रूमची पाहणी केली. त्यांनी बनावट पलायन फिर्यादीबाबतही माहिती घेऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या प्रकरणाला आता दीड महिना झाला आहे. फॉरेन्सिक लॅबचे काही रिपोर्ट येणे बाकी आहेत. श्री. पाठक यांनी ‘सीडीआऱमधील संभाषणांच्या विश्‍लेषणाबाबतही अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com