‘यूपीएससी’मध्ये स्वागत पाटील, गणेश टेंगले चमकले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 एप्रिल 2018

सांगली - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या आज जाहीर झालेल्या निकालात येथील स्वागत राजकुमार पाटील आणि जत तालुक्‍यातील दरीबडची येथील गणेश महादेव टेंगले चमकले. या दोघांच्या यशामुळे जिल्ह्यातील ग्रामीण ‘टॅलेंन्ट’वर शिक्कामोर्तब झाले.

सांगली - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या आज जाहीर झालेल्या निकालात येथील स्वागत राजकुमार पाटील आणि जत तालुक्‍यातील दरीबडची येथील गणेश महादेव टेंगले चमकले. या दोघांच्या यशामुळे जिल्ह्यातील ग्रामीण ‘टॅलेंन्ट’वर शिक्कामोर्तब झाले.

श्री. स्वागत पाटील यांनी ४८६ वा रॅंक मिळवून यश मिळवले. मूळचे मिरज तालुक्‍यातील कसबे डिग्रजचे असलेले स्वागत यांनी तिसऱ्या प्रयत्नात यशाला गवसणी घातली. कसबे डिग्रज जिल्हा परिषद शाळा ते वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय असा त्यांचा शैक्षणिक प्रवास कौतुकास्पद आहे. जिल्ह्याच्या दुष्काळी जत तालुक्‍यातील दरिबडची येथील गणेश महादेव टेंगले यांनी परीक्षेत देशात ६१० वा क्रमांक मिळविला. त्यांनीही तिसऱ्या प्रयत्नात यश मिळवले. दुसऱ्या प्रयत्नात ते मुलाखतीपर्यंत पोचले. त्यांच्या यशाने दुष्काळी तालुक्‍यातील टॅलेंटवर शिक्कामोर्तब झाले आहे.

होय, महाराष्ट्र प्रगतच आहे !
श्री. स्वागत पाटील म्हणाले, ‘‘मुलाखतीदरम्यान मला प्रश्‍न विचारण्यात आला होता, की महाराष्ट्र प्रगत आहे का? मी उत्तर दिले, ‘होय...’ त्या वेळी त्यांचा पुढचा प्रश्‍न होता- ‘दाभोलकर-पानसरेंच्या हत्या जिथे होतात, ते राज्य प्रगत कसे?’ मात्र मी त्यांना उत्तर दिले, ‘त्यांच्या हत्येविरोधात महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. त्यांचे समाजप्रबोधनाचे कार्य आजही पुढे सुरूच आहे. हे कृत्य करणारे लोक महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करीत नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रच प्रगतच आहे.’ कदाचित माझे हे उत्तर मला यशापर्यंत नेणारे ठरले असावे. मराठी माध्यमातून शिक्षण ही माझी जमेची बाजू होती. विषयांचे परिपूर्ण आकलन मातृभाषेतूनच होते. रट्टा मार पद्धत यूपीएससीत चालत नाही.’’

ध्येय ठेवून मेहनत
श्री. गणेश म्हणाले, ‘‘जतसारख्या दुष्काळी भागातून आल्याने आजूबाजूची परिस्थिती माहिती होती. त्याचा फायदा झाला. घरची परिस्थिती बरी होती. वडील ऊसतोडणी मुकादम आहेत. त्यांच्यासह आई, भाऊ, कुटुंबाचे प्रोत्साहन मिळाले. ऊसतोडणी मजुरांचे प्रश्‍न, दुष्काळी जनतेचे प्रश्‍न माहिती होते. त्यामुळे जिद्दीने अभ्यास केला. एक ध्येय ठेवून तीन वर्षे मेहनत केली. मराठी माध्यमातून शिक्षण घेतले. त्याची सुरवातीस अडचण वाटली; पण नंतर आत्मविश्‍वासाने प्रयत्न केले. त्यामुळे यश मिळाले.’’ 

ग्रामीण, दुष्काळी टॅलेंट चमकले 

स्वागत हा विलिंग्डन महाविद्यालयातील प्रा. राजकुमार पाटील यांचा तो मुलगा आहे. त्यांचा शैक्षणिक प्रवास कौतुकास्पद आहे. चौथीपर्यंतच्या प्राथमिक शिक्षणानंतर ते सांगलीतील कांतीलाल शहा प्रशालेत पाचवीसाठी दाखल झाले. त्यानंतर २०१० मध्ये विलिंग्डनमधून बारावी विज्ञान शाखेतून यश मिळवून वालचंदमध्ये बीटेक, आयटी पदवीसाठी प्रवेश घेतला.

२०१४ च्या बॅचचा पदवीधर असलेल्या स्वागतने अभियांत्रिकी शिक्षणादरम्यानच यूपीएससीचा अभ्यास सुरू केला होता; मात्र खऱ्या अर्थाने पदवीनंतरच रोज सलग दहा दहा तास अभ्यास करून त्यांनी यश प्राप्त केले. 

आई, गृहिणी व वडील प्राध्यापक अशी कौटुंबिक पार्श्‍वभूमी असलेल्या स्वागतच्या यशात मूळचे मिरजेचे असलेल्या आणि सध्या बिहारमध्ये मधुबनी जिल्ह्यात जिल्हाधिकारी असलेल्या कपिल शिरसाठ यांची मोठी प्रेरणा आहे. सात वर्षांपूवी वडिलांनी कपिल यांची भेट घालून दिली आणि त्यादिवशीच स्वागत यांनी ‘यूपीएससी’चा दृढसंकल्प केला. गेल्या वर्षी मुलाखतीपर्यंतचा टप्पा त्यांनी पार केला होता; मात्र त्या वेळी यशाने हुलकावणी दिली. अपयशाने खचून न जाता त्यांनी अखेरीस यशाचे गौरीशंकर गाठलेच.

दुष्काळी जत तालुक्‍यातील दरिबडची येथील गणेश महादेव टेंगले याने आजच जाहीर झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात ६१० वा क्रमांक मिळवून यश मिळवले आहे. गणेशने तिसऱ्या प्रयत्नात हे यश मिळवले. दुसऱ्या प्रयत्नात तो मुलाखतीपर्यंत पोचला होता. त्याच्या यशाने दुष्काळी तालुक्‍यातील टॅलेंटवर शिक्कामोर्तब झाले आहे.

मूळ दरिबडची येथील महादेव टेंगले या ऊसतोडणी मुकादमाचा मुलगा असणाऱ्या गणेशला आई पिरपाबाई आणि वडिलांनी प्रोत्साहन दिले. त्याने दरिबडचीपासून पाच किलोमीटरवरील कुलालवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिली ते चौथीचे शिक्षण घेतले, तर भैरवनाथ हायस्कूलमध्ये दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. सांगली हायस्कूलमध्ये बारावीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर कोल्हापूरमधून केआयटी कॉलेजमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी त्याने घेतली. गेली तीन वर्षे गणेश दिल्लीत यूपीएससीचा अभ्यास करत आहे. दुसऱ्या प्रयत्नात थोडक्‍यात यशाने हुलकावणी दिली. तरी प्रयत्न न सोडता त्याने तिसऱ्या प्रयत्नात यशाला गवसणी घातली. अंतिम परिक्षेसाठी त्याने लोकप्रशासन हा विषय घेतला होता.

Web Title: Sangli News Swagat Patil, Ganesh Tengale success in UPSC