पत्रके भिरकावत सभेत हमरीतुमरी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

सांगली - प्राथमिक शिक्षक सहकारी बॅंकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळाची परंपरा कायम राहिली. गोंधळातही सभेचे कामकाज 25 मिनिटे चालले. गेल्या वर्षीच्या अहवालाचे वाचन सुरू असतानाच विरोधकांच्या गोंधळाला सुरवात झाली. त्यातच अध्यक्षांनी चालू वर्षीच्या अहवालाचे वाचन सुरू ठेवले. सभासदांनी विचारलेल्या प्रश्‍नांना उत्तरे दिली. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आणि सत्ताधारी समर्थकांनी बाजूने मंजुरीच्या घोषणा दिल्या. टाळ्यांनी दीनानाथ सभागृह दणाणले. थोरात गटाने बॅंक कारभाराविरोधात काढलेली पत्रके सभेत भिरकावली. शिक्षक संघाने फलक फडकावला. 

अध्यक्षांनी व्यासपीठावरून विरोधकांवर शेरेबाजी करून चांगलीच बॅटिंग केली. सभेचे कामकाज संपल्याचे जाहीर केल्यानंतर विरोधी संचालक व सत्ताधारी संचालकांत ध्वनिक्षेपक घेण्यावरून हमरीतुमरी झाली. सभेसाठी मोठा पोलिस बंदोबस्त होता. सभा संपल्यानंतर सभागृहाबाहेर सत्ताधारी, विरोधक समर्थकांनी परस्परविरोधी घोषणा दिल्या. 

बॅंकेचे अध्यक्ष शिवाजी पवार यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. आदरांजली आणि प्रतिमापूजन झाले. "सीईओ' बाळासाहेब कोले यांनी गेल्या वर्षीच्या अहवालाचे वाचन केले. त्या वेळीच शिक्षक संघाचे विकास शिंदे, मुकुंद सूर्यवंशी यांनी सत्ताधाऱ्यांविरोधात फलक फडकावला. विरोधात घोषणांना सुरवात केली. अध्यक्ष श्री. पवार यांनी तुम्ही सभा सुरू होण्यापूर्वीच कशासाठी गोंधळ घालताय, असा प्रश्‍न विचारून सभा शांततेत आणि कितीही वेळ चालविण्याची तयारी असल्याचे जाहीर केले. चालू वर्षीच्या अहवालाचे वाचन अध्यक्षांनी सुरू केल्यावर थोरात गटाचे सभासद सभागृहातील मधल्या पोर्चमध्ये आले. त्यांना पोलिसांनी अडविले. येथूनच घोषणाबाजीला पुन्हा सुरवात झाली. त्यातच अध्यक्षांनी सभेपुढील एकेक विषय वाचून मंजुरी घेतली. सभासदांच्या लेखी प्रश्‍नांना उत्तरेही दिली गेली. उपाध्यक्ष सुनील गुरव यांनी आभार मानले. त्यानंतर राष्ट्रगीत सुरू करण्यात येणार, तोपर्यंत बॅंकेतील थोरात गटाचे संचालक विनायकराव शिंदे यांनी अध्यक्ष श्री. पवार यांच्या हातातील ध्वनिक्षेपक घेण्याचा प्रयत्न केला. सदाशिव पाटील व शिंदे यांच्यात हमरीतुमरी झाली. वंदे मातरम्‌ सुरू झाल्याने तातडीने गोंधळ संपला. हरिबा गावडे यांनी सूत्रसंचालन केले. 

अध्यक्षांची विरोधकांवर कुरघोडी... 
अध्यक्ष श्री. पवार यांनी विरोधकांवर कुरघोडी केली. मांडलेल्या ठरावांना विरोधकांनी समर्थन दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले. अनेकदा ते स्वतःच ठराव मांडत आणि टाळ्यांत मंजुरी द्या म्हणायचे. बॅंक प्रगतीबाबत ते म्हणाले, की बॅंकेत पारदर्शी कारभार आहे. विरोधकांनो, चांगला कारभार ऐकायला शिका. 1.86 कोटी नफा अन्‌ चार टक्के लाभांश जाहीर केला. अज्ञानामुळे अस्तित्व टिकविण्यासाठीच्या विरोधकांच्या टीकेवर पवार यांनी हल्ला केला. 

थोरात गटाची समांतर सभा 
बॅंक सभा झाल्यानंतर थोरात गट शिक्षक संघाने सभागृहाबाहेर समांतर सभा घेतली. त्या वेळी विनायकराव शिंदे म्हणाले, की सत्ताधाऱ्यांनी सभाच घेतली नाही. त्याविरोधात आम्ही सहकार खात्याकडे तक्रार करणार आहोत. सत्ताधाऱ्यांनी सभेतून पळ काढला. 

बॅंकेचा नफा बोगस 
बॅंकेचा नफा बोगस असल्याची टीका शिक्षक संघाचे विकास शिंदे, मुकुंद सूर्यवंशी यांनी केली. संगणक दुरुस्ती, किरकोळ खर्चावर त्यांनी आक्षेप घेतला. पोलिस बंदोबस्तात सभा घेऊन सभासदांना बोलण्यापासून रोखल्याची टीका त्यांनी केली.

Web Title: sangli news Teacher bank meeting