पटासाठी शिक्षकांची पायाला भिंगरी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 जून 2017

विद्यार्थ्यांना विविध आमिषे : विद्यार्थी कमी अन्‌ शाळांची संख्या जास्त 
खासगी, इंग्रजीकडे पालक, विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे. झेडपीच्या शाळांतूनही पूर्वीसारखी अनागोंदी राहिलेली नाही. गुढी पाडव्यादिवशीच्या प्रवेशात झेडपीच्या शाळा आघाडीवर असल्या तरीही विद्यार्थ्यांना खेचण्यात शिक्षक आणि प्रशासन कमी पडते आहे. आता प्रत्यक्षात पहिलीच्या वर्गात किती प्रवेश होतात हे पाहणे महत्त्वाचे आहे. प्राथमिक शिक्षकांबद्दलच्या गैरसमजाने पालकच संदिग्ध आहेत. एकाच गावात प्राथमिक, माध्यमिक शाळा असलेल्या गावात पटासाठी शिक्षकांची धावाधाव सुरू झाली आहे.  

सांगली - प्राथमिक, माध्यमिक शाळा १५ जूनपासून सुरू होत आहेत. वार्षिक परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यापासूनच विद्यार्थ्यांचा शोध सुरू झाला आहे. अद्यापही तो सुरूच आहे. 

संस्थाचालकांनी पटाची जबाबदारी शिक्षकांवर टाकली आहे. सरकारने सहा वर्षांपूर्वीच्या बोगस पटपडताळणीमुळे शिक्षक, संस्थाचालकांनी धास्ती घेतलीय. सन २०१५-१६ पासून विद्यार्थ्यांना आधार कार्ड सक्तीने गडबडीला वावच राहिला नाही. विद्यार्थी संख्या कमी अन्‌ शाळांची संख्या दरवर्षी वाढतेय.   

खासगी शाळांकडून प्रवेशावेळी मोफत वह्या-पुस्तके, बसपास, गणवेश, काही दुर्गम भागात सायकली दिल्या जातात. मुलांचा दाखला ताब्यात मिळेपर्यंत पालकांनाही खूश केले जाते. कुटुंबनियोजन, खासगी अनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित शाळांमुळे अडचणी वाढल्या आहेत. इंग्रजी शाळांकडे कल वाढल्याच्या सर्वाधिक फटका जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना बसतोय.

माध्यमिकच्या काही तुकड्याही धोक्‍यात आहेत. विद्यार्थी कमी अन्‌ शाळा अधिक अशीच काहीशी विचित्र स्थिती आहे. नोकरीसाठी माध्यमिक शिक्षकांचीही धावाधाव केल्याशिवाय गत्यंतर नाही.

गेल्या आठ-दहा वर्षांपासून तुकड्या टिकवण्यासाठी भगीरथ प्रयत्न करावे लागताहेत. माध्यमिकच्या दर्जेदार शिक्षणामुळे प्रवेश सहज होतात. विद्यार्थी हायस्कूलमध्ये अन्‌ दाखले मराठी शाळेत असतात. यामुळे शाळांतील गुरुजीत भांडणाचे प्रसंग अनेकदा ओढवलेत. निमशहरे, दहा हजारापुढील गावात मराठी शाळा टिकवण्याचे आव्हान आहे. खासगी शाळांसह स्वयंअर्थसहाय्यित शाळांची संख्या वाढली आहे.

स्वयंअर्थसहाय्यित ५७ शाळांची त्यात भर  पडली आहे. खासगी शाळांना परवानी देऊन शिक्षणाची जबाबदारीच सरकार असल्याचे चित्र आहे. 

आकडे बोलतात...
झेडपीच्या शाळा     १७१०
माध्यमिक शाळा     ६२०
स्वयंअर्थसहायित शाळा     ५७
एकूण सर्व माध्यमाच्या शाळा     २७९९
पाचवीच्या तुकड्या     ३३३९
आठवीच्या तुकड्या     ३६२३

Web Title: sangli news teacher searching to student for school