वाळव्यात दहा वर्षाचा मुलगा कुपोषणाचा शिकार 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 ऑक्टोबर 2017

वाळवा - कुपोषण मुक्तीसाठी प्रशासकीय पातळीवर अनेक प्रयत्न होत असले तरी प्रत्यक्ष कुपोषितांपर्यंत किती फायदा होतो असा प्रश्‍न पडावा अशी स्थिती आहे. समृध्दीचा डामडौल असणाऱ्या वाळव्यात ऋषिकेश मल्लाप्पा बळकली (वय 10) हा मुलगा कुपोषणाची शिकार बनला आहे.

वाळवा - कुपोषण मुक्तीसाठी प्रशासकीय पातळीवर अनेक प्रयत्न होत असले तरी प्रत्यक्ष कुपोषितांपर्यंत किती फायदा होतो असा प्रश्‍न पडावा अशी स्थिती आहे. समृध्दीचा डामडौल असणाऱ्या वाळव्यात ऋषिकेश मल्लाप्पा बळकली (वय 10) हा मुलगा कुपोषणाची शिकार बनला आहे.

प्रशासकीय डोळेझाक, प्राथमिक आरोग्य केंद्राचे दुर्लक्ष, सामाजिक पातळीवर असलेली अनास्था मुलाच्या कुपोषणाला कारणीभूत ठरली आहे. प्राथमिक शाळेत पाचवीत शिकत असलेल्या ऋृषीकेश अक्षरशः वाळला आहे.  काही वर्षापूर्वी त्याचे कुटुंब कर्नाटकातून येथे मोलमजुरीसाठी आले. वडील शेतमजुर आहेत. आई घरकाम करते. पाच वर्षांपासून तो मुलगा कुपोषणाच्या विळख्यात सापडलाय. कुपोषित बालकांचे सर्व स्तर त्याने ओलांडलेत. त्याला भूक लागत नाही. खाल्लेले पचत नाही, अशी अवस्था आहे. वेळेत उपचार होत नाहीत. कुपोषणाची टक्केवारी वाढत आहे. 

काही वर्षांपुर्वी याच परिसरात एका बालकाचा कुपोषणाने बळी गेला होता. आता याचीही वाटचाल त्याच मार्गावर आहे. ज्या शाळेत तो शिकतो तेथील शिक्षकांनीही काही प्रयत्न केले. मात्र त्यांना मर्यादा आल्या. सध्याची मुलाची शारिरीक स्थिती पाहता तातडीने उपचारांची गरज आहे. परिस्थितीने गांजलेल्या आई-वडीलांकडे वेळ व पैसाही नाही. प्रशासनातर्फे कुपोषणमुक्तीसाठी व्यापक योजना राबवल्या जातात. मात्र खऱ्या कुपोषितांपर्यंत त्या पोहोचत नाहीत, असे वाटण्यासारखी स्थिती आहे. जिल्हा परिषदेच्या महिला बालविकास विभागान सातत्याने कुपोषणमुक्तीच्या सतत घोषणा केल्या, मात्र त्या तोकड्या ठरताहेत. 

तातडीने उपचाराची गरज 

ऋृषिकेशची उंची वयाच्या मानाने समाधानकारक आहे. वजन मात्र अगदीच कमी आहे. त्यामुळे तातडीने उपचारांची गरज आहे. प्रशासकीय पातळीवर हालचाली झाल्या पाहिजेत. प्राथमिक आरोग्य केंद्राची यंत्रणा सुस्त आहे. रुग्ण, उपचार, औषध या त्रिसुत्रीपेक्षा वैद्यकीय अधिकाऱ्यांसह सर्वच यंत्रणा इतर उपद्‌व्यापात गुंतलेली असते. आरोग्य केंद्रातर्फे भागवार होणारे सर्वेक्षण तकलादू आहे. अन्यथा केंद्रापासून 100 मीटरवर असलेल्या ऋुषिकेशची माहिती या केंद्राला यापूर्वीच झाली असती. 

Web Title: sangli news Ten years old boy malnutrition victim