तासगावात सन्नाटा

रवींद्र माने
बुधवार, 11 एप्रिल 2018

तासगाव - ‘ये सन्नाटा क्‍यूं छाया है भाई...’ या ‘शोले’ चित्रपटातील संवादाची आठवण व्हावी, अशी राजकीय शांतता आठ दिवसांपासून आहे. सध्याही शहरात तीच स्थिती आहे.

तासगाव - ‘ये सन्नाटा क्‍यूं छाया है भाई...’ या ‘शोले’ चित्रपटातील संवादाची आठवण व्हावी, अशी राजकीय शांतता आठ दिवसांपासून आहे. सध्याही शहरात तीच स्थिती आहे. शहरातील सर्वक्षेत्रात सुखैनैव संचार करीत सतत हस्तक्षेप करणारे कार्यकर्ते, वाळू तस्कर, तथाकथित ठेकेदार यांच्यासह बहुतांशी अनेक ‘म्होरके’आठ दिवसांपासून अघोषित हद्दपारीवर आहेत.  या राजकीय पोकळीमुळे शहरवासीयांनी अक्षरशः सुटकेचा नि:श्‍वास सोडला.

पोलिसांवर केलेल्या हल्ल्याचे पडसाद इतके तीव्र उमटतील, असे पोलिसांची कपडे फाडणाऱ्याना कार्यकर्त्यांना स्वप्नात सुद्धा वाटले नसेल. इतकी निरव शांतता सध्या तासगाव शहरातील राजकीय गोटात आहे. खाकीचा धाक काय असतो? हे तासगावकरांना दिवंगत नेते माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील गृहमंत्री असतानाही पहायला मिळाला नव्हता. इतका धाक सध्या पहावयास मिळत आहे.

पोलिसांवर हल्ला झाल्यापासून आणि बाबासाहेब पाटील यांच्या सारख्या बड्या कार्यकर्त्यांवर पोलिसी कारवाई झाल्यानंतर पालिकेतील एखाद दुसरा नगरसेवक वगळता सर्वजण आठ दिवस गायब आहेत. त्यांच्या समर्थकांकडून ते सहलीवर गेल्याचे सांगितले जाते. त्यांच्याशिवाय यापूर्वी रेकॉर्डवर असलेले पण आता नेते म्हणून वावरणारे, बस स्थानकावरील पाकीटमारीपासून नवराबायकोच्या भांडणापर्यंत हस्तक्षेप करणारे, जुगार अड्डे चालवणारे, वाळूतस्कर, बॅंकांचे संचालक, भाजपचे माजी पदाधिकारी या साऱ्यांशिवाय शहरातील एखादा राजकीय कार्यक्रम  पार पडू शकत नसे. या साऱ्यां मंडळींचे फोन सध्या स्विच ऑफ आहेत.

पोलिसांवर हल्ला केलेल्या ७० जणांत आपला नंबर  आहे काय ? याच्या धास्तीनेच अनेकजण पळून गेलेत. पोलिसांच्या कारवाईची भीती इतकी जबरदस्त होती, की पोटनिवडणुकीच्या मतदानावेळीही बूथवर स्थानिक  एखादा दुसरा कार्यकर्ता वगळता परगावचेही कार्यकर्ते फिरकले नाहीत. 

भाजपच्या धरणे आंदोलनाकडेही शहरातील कार्यकर्त्यांनी पाठ फिरवल्याचे पहिल्यांदाच दिसले. नेहमी पोलिस ठाण्यात कोणत्या गुन्ह्यात किती जणांवर कोणती कलमे लावायची याच्या सूचना देणाऱ्यांवरच अर्धा डझनहून अधिक कलमे लागल्याने शहरात पसरलेला सन्नाटा सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

तीन गुन्हे, १३९ संशयित
तासगाव पालिकेच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारातील वादानंतर झालेल्या राडा प्रकरणी तीन गुन्हे दाखल  आहेत. पोलिसांवर हल्ला करून पाच पोलिस जखमी केल्याप्रकरणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह ७७ जणांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. त्यात आतापर्यंत चार जणांना अटक झाली आहे. नगरसेवक बाबासाहेब पाटील यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांत राष्ट्रवादीच्या ३५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तर राष्ट्रवादीच्या तानाजी पवार यांनी भाजप कार्यकर्त्यांविरोधात दाखल केलेल्या गुन्ह्यांत २७  जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Sangli News Tense situation in Tasgaon