‘त्यांच्या’ आयुष्याला तुम्ही ‘आकार’ द्या...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 ऑक्टोबर 2017

सांगली -  सध्याच्या महागाईत गोरगरीब  कष्टकरी वर्गातील मुला-मुलींचे शिक्षण अधिकच बिकट होतेय. त्यात एखाद्या दुर्दैवी बालकाचे आई किंवा वडील नसतात तेव्हा हे आव्हान अधिकच मोठे. अशा मुलांच्या शिक्षणासाठी आकार फाउंडेशनच्या वतीने शैक्षणिक प्रायोजकत्व स्वीकारणारी विद्यार्थी दत्तक योजना राबवण्यात येत आहे. यंदा पहिल्याच वर्षी समाजातील १३० दानशूरांनी या मुलांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. गरज मोठी असून मदतीचे आणखी हात हवेत. 

समन्वयक सामाजिक कार्यकर्त्या उज्ज्वला परांजपे म्हणाल्या, ‘‘मुलींच्या शिक्षणातील अडचणींचा विचार करून या योजनेसाठी प्राधान्याने त्यांचा विचार केला आहे. त्यासाठी शहर व परिसरातील शाळांकडून सहावी ते बारावीपर्यंत शिकणाऱ्या गरजूंची नावे मागवली होती. त्यानंतर प्रत्यक्ष घरात जाऊन परिस्थितीतीची पाहणी करून लाभार्थी यादी बनवली आहे. मदतीचा पहिला टप्पा म्हणून गेल्या जून-जुलैमध्ये सर्व शैक्षणिक साहित्य, स्टेशनरी, गणवेश देण्यात आले. त्यानंतर दरमहा दैनंदिन साबण, कपडे, प्रसंग परत्वे लागणारे  शैक्षणिक साहित्य, सॅनेटरी नॅपकीन्स दिली जातात.

गेल्या महिन्यात २० मुलींना सायकली देण्यात आल्या. या मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी दरमहा तज्ज्ञांचे मार्गदर्शन वर्ग घेतले जातात. या मुलांना शालेय सहलीचा लाभ  घेता येत नाही म्हणून वार्षिक सहल होईल. यंदा ही सहल येत्या २९ ऑक्‍टोबरला रोहिडा किल्ल्यावर जाणार आहे.’’

त्या म्हणाल्या, ‘‘एका विद्यार्थ्यासाठी पाच हजार रुपये वार्षिक निधी स्वीकारतो. त्या दत्तक मुलाच्या शैक्षणिक प्रगतीचा अहवाल संबंधित पालकास नियमित दिला जातो. शास्त्रीनगरातील सांस्कृतिक सभागृहात दरमहा आम्ही मार्गदर्शन वर्ग भरवतो.

डॉ. अनिल मडके यांच्या गणेशनगरातील जुन्या इस्पितळ इमारतींमध्ये तात्पुरते कार्यालय थाटले आहे. तेथे दररोज दुपारी दोनपर्यंत  संपर्क साधता येतो. मुलांसाठी ग्रंथालय उभे करण्या येत असून त्यासाठी जुने ग्रंथ हवे आहेत. कार्यालयासाठी खुर्च्या, कपाटे, टेबल्स, चटई असे साहित्य हवेच आहे. आणखी वीस सायकलींची मागणी आहे. जुन्या सुस्थितीतील सायकलीही भेट देऊ शकता. दत्तक योजनेसाठी आणखी गरजू मुलांची संख्या मोठी आहे. त्यासाठीही दानशूर व्यक्तींनी पुढे यावे.’’

Web Title: Sangli News Think Positive Act Positive special story