चांदोलीत यंदा वाघ दिसलाच नाही

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 जून 2018

सांगली - सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दोन वर्षांपूर्वी पाच वाघांचे अस्तित्व आढळल्याचा अहवाल राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन समितीने जाहीर केला होता. यंदा मात्र चांदोलीच्या जंगलात एकही वाघ दिसला नसल्याची माहिती पुढे आली आहे. अर्थात काही तांत्रिक अडचणींमुळे कॅमेरा ट्रॅप आणि पाऊलखुणा आढळल्या नसाव्यात, अशी माहिती आहे. वाघांनी आपला अधिवास राधानगरी जंगलाकडे हलवला असावा, असाही काही तज्ज्ञांचा अंदाज व्यक्त करत आहेत.   

सांगली - सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दोन वर्षांपूर्वी पाच वाघांचे अस्तित्व आढळल्याचा अहवाल राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन समितीने जाहीर केला होता. यंदा मात्र चांदोलीच्या जंगलात एकही वाघ दिसला नसल्याची माहिती पुढे आली आहे. अर्थात काही तांत्रिक अडचणींमुळे कॅमेरा ट्रॅप आणि पाऊलखुणा आढळल्या नसाव्यात, अशी माहिती आहे. वाघांनी आपला अधिवास राधानगरी जंगलाकडे हलवला असावा, असाही काही तज्ज्ञांचा अंदाज व्यक्त करत आहेत.   

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघ आहेत तरी का? तेथे वाघ नाहीतच, असे वक्तव्य शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नाईक यांनी रविवारी जिल्हा नियोजन समितीच्या भर बैठकीत केले. श्री. नाईक यांचे विधान खुंदलापूरच्या रस्ते कामातील अडथळ्यांमुळे संपापाने होते, परंतु त्यानिमित्ताने सह्याद्रीतील वाघांचे अस्तित्व या विषयाला वाचा फुटली आहे. ३० जानेवारी २०१८ रोजी जिल्हाधिकारी विजयकुमार काळम यांनी चांदोलीत बैठक घेतली होती. त्यावेळी काही नेत्यांनी चांदोलीत वाघ किती आहेत? असा प्रश्‍न विचारला होता. त्यावर सह्याद्री व्याघ्र राखीवच्या उपसंचालक डॉ. विनिता व्यास यांनी ‘वाघांच्या अस्तित्वाविषयी जाहीर बोलता येत नाही’, असा खुलासा केला होता.

वाघांचा अधिवास सुरक्षित ठेवण्याला वन विभागाचे प्राधान्य असले तरी या परिसरात संरक्षित क्षेत्राबाहेर काही हालचालींमुळे वन्यजीवांचा अधिवास सुरक्षित आहे का? असा सवाल वेळोवेळी या क्षेत्रातील जाणकारांनी केला आहे. विशेषतः खनिकर्मावर बोट ठेवले जातेय. दुसरीकडे वाघांच्या अस्तित्वाचा कानोसा घेताना किमान चांदोली परिसरात यावर्षी वाघांचे अस्तित्व दिसले नाही, हेही उघड झाले आहे. त्याचा अर्थ वाघ नाहीत, असा घेता येणार नाही, असेही जाणकारांनी स्पष्ट केले. अर्थात खुंदलापूर रस्त्याच्या प्रश्‍नाची सोडवणूक करण्याबरोबरच आता चांदोलीत वाघ आहे की नाही, हा प्रश्‍नही सोडवण्याची जबाबदारी वन आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पावर येऊन पडली आहे.  

प्रचंड जंगल, अनंत अडचणी
सह्याद्री व्याघ्र प्रकल्प सांगली, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी पट्ट्यांत लांबपर्यंत पसरला आहे. हा प्रकल्प डोंगर, दऱ्या, घाट, धरण अशा नैसर्गिक असमतोल असलेल्या भागात आहे. चांदोली, कोयना, राधानगरी धरणांमुळे भरपूर पाणीसाठा आहे. विशिष्ट पाणवठ्यावर पाणी प्यायला वाघ येतीलच असे नाही. दुसरी बाजू पाऊलखुणांची. या परिसरातील जमीन घट्ट आहे, त्यात फार कमी पाऊलखुणा उमटतात. किमान विष्ठा तरी आढळली आहे का, या प्रश्‍नाचे उत्तर मात्र ‘नाही’, असे आहे. त्यामुळे ‘टायगर कहाँ है’ या प्रश्‍नाचे उत्तर यंदा तरी ‘लपला आहे’ एवढेच देता येईल.

 

Web Title: Sangli News Tiger not seen in Chandoli